दुर्ग (छत्तीसगड) येथील पू. चत्तरसिंग इंगळेआजोबा यांच्या देहत्यागानंतरचे सनातनचे सूक्ष्म-ज्ञानप्राप्तकर्ते साधक श्री. निषाद देशमुख यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण

मूळचे दुर्ग (छत्तीसगड) येथील सनातनचे १८ वे संत पू. चत्तरसिंग इंगळे यांच्या देहत्यागानंतरचा आज तेरावा दिवस आहे, त्या निमित्ताने…

‘२९.९.२०२२ या दिवशी रात्री ८ वाजता सनातनचे संत पू. चत्तरसिंग इंगळेआजोबा यांनी देहत्याग केला. ते मूळचे दुर्ग, छत्तीसगड येथील निवासी होते. मागील काही मासांपासून (महिन्यांपासून) ते रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात रहात होते. त्यांच्या देहत्यागानंतर केलेले सूक्ष्म-परीक्षण पुढे दिले आहे. सोमवार, १० ऑक्टोबर या दिवशी सूक्ष्म-परीक्षणाचा काही भाग पाहिला. आज उर्वरित भाग पाहूया.

भाग २

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी या लिंक वर क्लिक करा: https://sanatanprabhat.org/marathi/618751.html

२. पू. चत्तरसिंग इंगळेआजोबा यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतांना त्यांच्या साधनायात्रेच्या संदर्भात ईश्वराने दिलेले ज्ञान

२ अ. धर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे आश्रमानुसार साधना करून संतपद गाठणारे पू. इंगळेआजोबा : पू. इंगळे आजोबांच्या संदर्भात ईश्वराने सांगितले, ‘हिंदु धर्मशास्त्रात ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, संन्यासाश्रम आणि नंतर वानप्रस्थाश्रम या प्रकारे आश्रमानुसार साधना सांगितली आहे. वर्तमान कलियुगात असे आश्रमानुसार साधना करणारे जीव अत्यंत दुर्मिळ असतात. अशा दुर्मिळ जिवांपैकी एक म्हणजे पू. इंगळेआजोबा. पू. इंगळे आजोबांनी ब्रह्मचर्याश्रम आणि गृहस्थाश्रम यांत असतांना व्यष्टी साधना केली, तर वानप्रस्थाश्रमात त्यांनी समष्टी साधना केली. समष्टी साधनेचा एक भाग म्हणून त्यांनी त्यांच्या घरच्या वरच्या माळ्याची रचना सनातनच्या सेवाकेंद्राप्रमाणे केली होती आणि तिथेच ते एकटे राहून नामजप करायचे. जीवनभर आश्रमानुसार साधना करणारे पू. इंगळेआजोबा शेवटच्या क्षणी गुरुचरणांजवळ येऊन मुक्त झाले.

२ आ. उतारवयातही स्वभावदोष आणि अहं यांवर मात करून शीघ्र गतीने आध्यात्मिक उन्नती करणारे पू. इंगळेआजोबा ! : मी उत्तर भारतात सेवेला असतांना वर्ष २०१६ मध्ये ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठणारे अल्प साधक होते. त्यांपैकी पू. इंगळेआजोबा होते. या संदर्भात ईश्वराने सांगितले, ‘उतारवयात साधना करणे कठीण असते; कारण या वेळी स्थूलदेहाची क्षमता न्यून झालेली असते आणि मनावरील संस्कारांचे प्रमाण वाढलेले असते. पू. इंगळेआजोबा यांनी उतारवयात साधनेला आरंभ करूनही प्रथम ६१ टक्के आध्यात्मिक पातळी आणि त्यानंतर संतपद प्राप्त करून उतारवयात साधनेला प्रारंभ करणार्या अनेक जिवांसाठी एक आदर्शच निर्माण केला आहे. त्यांनी उतारवयात ज्या गतीने साधना करून ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली आणि त्यानंतर संतपद प्राप्त केले आहे, ते एक कीर्तीमानच (कौतुकास्पदच) आहे.’

२ इ. ‘त्याग, अव्यक्त भाव आणि प्रीती’ हे गुण प्रधान असलेले पू. इंगळेआजोबा ! : वेगवेगळ्या संतांमध्ये वेगवेगळे गुण असतात. पू. इंगळेआजोबा यांच्यातील प्रधान गुण म्हणजे त्याग, अव्यक्त भाव आणि प्रीती ! सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे स्थुलातून दर्शन झालेले नसतांनाही पू. आजोबांची त्यांच्यावर दृढ श्रद्धा होती आणि तेव्हापासून ते सनातनच्या कार्यासाठी त्याग करायचे. त्यांचे सर्व साधकांवर निरपेक्ष प्रेम होते.

श्री. निषाद देशमुख

२ ई. ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज असलेले पू. इंगळेआजोबा ! : पू. इंगळेआजोबा प्रीतीस्वरूप होते; पण ते साधकांना मानसिक स्तरावर हाताळत नव्हते. ते प्रामाणिकपणे साधकांना त्यांच्या साधनेतील चुका सांगून त्यांच्या स्वभावदोषांची जाणीव करून द्यायचे. यामुळे छत्तीसगड येथील प्रत्येक साधकाला त्यांचा आधार वाटायचा. यातून पू. आजोबा यांच्यात ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज दोन्ही असल्याचे स्पष्ट होते.

२ उ. अंतरंगातून देवाला अनुभवण्याची क्षमता असल्याने प्रथम समष्टी आणि नंतर व्यष्टी साधना करणारे पू. इंगळेआजोबा ! : देवाला अंतरातून अनुभवणार्या जिवाला देव काळानुसार योग्य विचार देऊन त्या काळात आध्यात्मिक उन्नतीसाठी सर्वांत पूरक साधनेचे प्रयत्न करून घेतो. अशा जिवांना काळानुसार साधनेचे महत्त्व कळलेले असते. अशा जिवांपैकी एक होते पू. इंगळेआजोबा ! अनेक वयस्कर साधक अनेक कारणे सांगून समष्टी साधना करत नाहीत. पू. इंगळेआजोबांना समष्टी साधनेचे महत्त्व ज्ञात असल्याने त्यांनी प्रकृती थोडी बरी असतांना साधकांना मार्गदर्शन करण्याची समष्टी साधना, तर पुढे प्रकृती बिघडल्यावर मनातून नामजप करणे इत्यादी व्यष्टी साधना केली. यामुळे अल्प कालावधीत त्यांची शीघ्र गतीने आध्यात्मिक उन्नती झाली.

२ ऊ. गुरूंशी अंतरंगातून एकरूपता साधणारे पू. इंगळेआजोबा ! : गुरूंच्या सगुण रूपाकडून शिकून त्यांच्या अंतरंगाशी एकरूपता साधणे सोपे असते. अधिकतर शिष्यांचा साधनाप्रवास याच प्रकारे होतो; पण अंतरंगातून गुरूंशी एकरूप होऊन नंतर त्यांचे सगुण रूपाच्या माध्यमातून आनंद घेणारे जीव दुर्मिळ असतात. त्यांपैकी एक म्हणजे पू. इंगळेआजोबा ! त्यांची गुरूंशी असलेली एकरूपता आणि आध्यात्मिक नाते पुढील प्रसंगातून स्पष्ट हाते.

एकदा रामनाथी आश्रमात आलेल्या उत्तर भारतातील साधकांच्या समवेत मला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा सत्संग लाभला होता. त्या सत्संगात दुर्ग, छत्तीसगड येथील साधक श्री. हेमंत कानस्कर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) यांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना सांगितले, ‘‘श्री. चत्तरसिंग इंगळे यांनी तुम्हाला नमस्कार सांगितला आहे.’’ (त्या वेळी पू. इंगळेआजोबा संतपदी विराजमान झाले नव्हते.) तेव्हा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले म्हणाले, ‘‘त्यांनाही माझा नमस्कार सांगा. (काही क्षण विचार करून) त्यांना सांगा, ते (पू. इंगळे) संत झाले की, मला कळवा. मी वाट पहात आहे.’’ गुरूंनी शिष्याला त्याचे संतपद घोषित करण्यास सांगितले, हे माझ्या माहितीतील पहिले उदाहरण आहे. नंतर २ – ३ मासांनी पू. इंगळेआजोबा संतपदी विराजमान झाल्याने घोषित करण्यात आले. (एका सोहळ्याद्वारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी अन्य संतांच्या माध्यमातून पू. इंगळेआजोबा यांना ‘संत’ घोषित केले.)

२ ए. ऋषींप्रमाणे आज्ञाचक्रातून प्राणत्याग करणारे पू. इंगळेआजोबा ! : सूक्ष्म-परीक्षणातून ‘पू. इंगळेआजोबांनी आज्ञाचक्रातून प्राणत्याग केला’, असे मला कळले. या संदर्भात ईश्वराने सांगितले, ‘उच्च कोटीचे संत, ऋषी आणि मुनी यांच्यात प्राण रोखून ठेवून उन्मनी अवस्थेत रहाण्याची क्षमता असते. यासाठी ते काही काळ तप करून प्राणांचे नियंत्रण स्वतःकडे ठेवतात आणि योग्य काळ आल्यावर देहत्याग करतात. त्याच प्रकारे पू. इंगळेआजोबांनीही मागील २ – ३ दिवसांपासून तप करून योग्य काळ आल्यावर देहत्याग केला.’ (या संदर्भात पू. इंगळेआजोबांच्या सेवेत असणारे श्री. विजय लोटलीकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) यांनी सांगितले, ‘‘पू. आजोबा एरव्ही पुष्कळ बोलायचे; पण मागील २ – ३ दिवसांपासून त्यांचे बोलणे पुष्कळ अल्प झाले होते. जणू ते मौनात होते.’’

२ ऐ. हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमी यांना धर्मकार्यासाठी आध्यात्मिक बळ देऊन हिंदु राष्ट्र स्थापनेच्या समष्टी कार्यातून ईश्वराशी एकरूप होणारे पू. इंगळेआजोबा : पू. आजोबांच्या पुढच्या साधनाप्रवासाच्या संदर्भात ईश्वराने सांगितले, ‘यापुढे पू. इंगळेआजोबा ध्यानाद्वारे सूक्ष्मातून विविध हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमी यांच्यात शक्तीपात करून त्यांना धर्मकार्यासाठी आध्यात्मिक बळ प्रदान करतील अन् त्यांना साधनेकडे वळवतील. या प्रकारे हिंदु राष्ट्र स्थापनेच्या समष्टी साधनेद्वारे त्यांची आध्यात्मिक उन्नती होत ते ईश्वराशी एकरूप होणार आहेत.’

३. अनुभूती आणि कृतज्ञता

अन्य काही सेवा असल्याने पू. इंगळेआजोबांच्या संदर्भातील सूक्ष्म परीक्षण लिहायला मी रात्री साडेदहा वाजता चालू केले. तेव्हा ‘२ – ३ परिच्छेद लिहून झोपूया’, असा माझा विचार होता; मात्र पू. आजोबांच्या संदर्भात लिहितांना ‘रात्रीचे २ कधी वाजले ?’, हे मला कळलेच नाही. मी दिवसा सेवा करतांना मला जसा उत्साह जाणवतो, तसाच उत्साह मला त्या वेळी जाणवत होता.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे अध्यात्मात कीर्तीमान होणारे आणि ऋषींप्रमाणे चरित्र असलेले पू. इंगळेआजोबा यांच्या संदर्भात मला दोन शब्द लिहिता आले. त्याबद्दल सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि पू. इंगळेआजोबा यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– श्री. निषाद देशमुख (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान) (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३०.९.२०२२, रात्री १.३३)


सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यासाठी श्री. निषाद यांचे प्रश्न आणि त्यांची सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी दिलेली उत्तरे

१. या धारिकेत जेवढ्या वेळा मी ‘पू. इंगळेआजोबा’, असे लिहिले त्या वेळी मला आनंदाची स्पंदने अनुभवता आली. ते सद्गुरु झाले आहेत, यामुळे असे अनुभवायला आले कि लिखाण करतांना एकरूपता झाल्याने असे झाले ?

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : लिखाण करतांना त्यांच्याशी एकरूपता आल्याने सूक्ष्मातील आणखी कळल्याने असे झाले.

२. सूक्ष्म-ज्ञान किंवा सूक्ष्म-परीक्षणाच्या अन्य धारिकांच्या तुलनेत या धारिकेतील श्वेत (पांढरे) पार्श्वभाग अधिक पांढरा जाणवतो. असे आहे का ? असेल, तर निर्गुण तत्त्वामुळे असे आहे का ?

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : हो.

सूक्ष्म परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म परीक्षण’ म्हणतात.