मूळचे दुर्ग (छत्तीसगड) येथील सनातनचे १८ वे संत पू. चत्तरसिंग इंगळे यांच्या देहत्यागानंतरचा आज बारावा दिवस आहे, त्या निमित्ताने…
‘२९.९.२०२२ या दिवशी रात्री ८ वाजता सनातनचे १८ वे संत पू. चत्तरसिंग इंगळे यांनी देहत्याग केला. ते मूळचे दुर्ग, छत्तीसगड येथील होते. मागील काही मासांपासून ते रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात रहात होते. त्यांच्या देहत्यागानंतर केलेले सूक्ष्म-परीक्षण पुढे दिले आहे.
भाग १
१. पू. चत्तरसिंग इंगळेआजोबा यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतांना आलेल्या अनुभूती, त्यांची लक्षात आलेली आध्यात्मिक वैशिष्ट्ये आणि त्यामागील शास्त्र
१ अ. पू. इंगळेआजोबा यांचे पार्थिव ठेवलेल्या खोलीत गेल्यावर शीतलता जाणवणे आणि ‘ॐकार’चा सूक्ष्म नाद ऐकू येणे : पू. इंगळेआजोबा रहात असलेल्या खोलीत जातांना मी एक ते दीड कि.मी. अंतर चाललो होतो. त्यामुळे मला घाम आला होता; मात्र मी पू. इंगळेआजोबा यांचे पार्थिव ठेवलेल्या खोलीत गेल्यावर मला एकदम शीतलता जाणवू लागली आणि ‘ॐकार’चा सूक्ष्म नाद ऐकू आला. पू. इंगळेआजोबा यांचे पार्थिव ठेवलेल्या खोलीत पणती लावलेली असल्याने पंखा चालू नव्हता, तरीही मला अकस्मात् शीतलता जाणवली, हे विशेष आहे. ‘मी एका वेगळ्या लोकात पोचलो’, असे मला जाणवत होते.
१ अ १. पू. इंगळेआजोबा यांचा लिंगदेह जनलोकात स्थिर होणे आणि त्यांच्या पार्थिवाजवळ जनलोकाचे वायूमंडल निर्माण होणे : वरील अनुभूतीतून माझ्या लक्षात आले, ‘पू. इंगळेआजोबा यांचा लिंगदेह स्थूलदेह त्यागून थेट जनलोकात जाऊन स्थिर झाला आहे.’ देह सोडण्याची प्रक्रिया कष्टदायी असते. अनेक जिवांच्या स्थूलदेहासहित मनावरही त्या प्रक्रियेचा परिणाम झाल्याने त्यांचे मन अस्थिर असते. पुढे धर्मशास्त्रात सांगितल्यानुसार मृत्यूनंतरचे सर्व क्रियाकर्म केल्यावर त्या जिवाची वेदना अल्प होऊन त्याचे मन स्थिर होते आणि नंतर त्याला त्याच्या कर्मांनुसार पुढच्या लोकात जाता येते. पू. इंगळेआजोबा संत असल्याने त्यांचा मनोलय झालाच होता. यामुळे त्यांचा लिंगदेह थेट जनलोकातच जाऊन स्थिर झला. पू. इंगळेआजोबा यांचा लिंगदेह जनलोकात असल्याने त्यांच्या पार्थिवाभोवतीही जनलोकाचे वायूमंडल निर्माण झाले.
१ अ २. पू. इंगळेआजोबा यांनी आज्ञाचक्रातून प्राणत्याग केला असल्याने ‘ॐकार’चा सूक्ष्म नाद ऐकू येणे : ‘आध्यात्मिकदृष्ट्या अल्प आध्यात्मिक पातळी असलेल्या जिवांचे प्राण त्यांचे मुख, नाक, कान किंवा इतर द्वारांतून बाहेर पडतात. याउलट ७१ टक्क्यांहून उच्च आध्यात्मिक पातळी असलेल्या जिवांचे प्राण त्यांचे नेत्र, आज्ञाचक्र किंवा सहस्रारचक्र यांतून बाहेर पडतात. पू. इंगळेआजोबा यांची आध्यात्मिक पातळी उच्च असल्याने त्यांचे प्राण आज्ञाचक्रातून बाहेर पडले. किन्नीगोळी, कर्नाटक येथील संत प.पू. देवबाबा सांगतात, ‘‘आज्ञाचक्राचा बीजमंत्र ‘ॐ’ आहे.’’ पू. इंगळेआजोबा यांचे प्राण आज्ञाचक्रातून बाहेर पडल्याने त्यांचे ते द्वार जागृत होऊन ‘ॐकार’ नाद ऐकू आला.
१ आ. पू. इंगळेआजोबा यांच्या पार्थिवाच्या भुवयांच्या वर असलेल्या पांढर्या रंगाच्या पट्ट्याकडे बघितल्यावर मन निर्विचार होणे आणि गालाच्या पिवळसर झालेल्या भागाकडे पाहिल्यावर आनंद होणे : पू. आजोबांच्या भुवयांच्या वर पांढर्या रंगाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्याकडे पाहिल्यावर माझे मन निर्विचार झाले. याच प्रकारे पू. इंगळेआजोबा यांच्या गालावर पिवळसर रंगाची छटा आली आहे. त्याकडे पाहून आनंद जाणवतो.
१ आ १. पू. इंगळेआजोबा यांची व्यष्टी साधना पूर्ण होऊन ते उच्च लोकांमध्ये समष्टी साधना करत निर्गुणाकडे वाटचाल करत असल्याने त्यांच्या कपाळावर पांढर्या रंगाचा पट्टा निर्माण होणे : पू. इंगळेआजोबा यांची आध्यात्मिक पातळी उच्च आहे. या जन्मात त्यांनी व्यष्टी साधना पूर्ण करून आवश्यक तेवढी समष्टी साधनाही केली आहे. यामुळे आता ते भूलोकात पुन्हा जन्म न घेता उच्च लोकांमध्ये जाऊन समष्टी साधना करणार आहेत. समष्टी संतांचे कार्य केवळ भूलोकापर्यंत मर्यादित नसून ते उच्च लोकांमध्येही सूक्ष्मातून कार्य करत असतात. सप्तलोकांच्या (भूलोक, भुवर्लाेक, स्वर्गलोक, महर्लाेक, जनलोक, तपोलोक आणि सत्यलोक यांच्या) पलीकडे निर्गुण असते. समष्टी संतांचे जसजसे उच्च लोकांतील कार्य वाढत जाते, तसतसे त्यांच्यातील निर्गुण तत्त्वात वृद्धी होते. यालाच ‘संतांची निर्गुणाकडे होणारी वाटचाल’ असे म्हणतात. देहत्यागानंतर पू. इंगळेआजोबा यांचे जनलोकातील सूक्ष्मातील समष्टी कार्य चालू झाले आहे. त्यामुळे त्यांच्यातील निर्गुण तत्त्वात वाढ झाल्याने त्यांचे आज्ञाचक्र, म्हणजे भुवयांचा वरच्या भागात पांढर्या रंगाचा पट्टा निर्माण झाला असून तो काही प्रमाणात नाकाच्या भागावरही जाणवत आहे.
१ आ २. पू. इंगळेआजोबा यांनी उन्मनी अवस्थेत देहत्याग केल्याने त्यांच्या गालांवर चैतन्याशी निगडित पिवळसर छटा दिसणे : संत म्हणजे चैतन्याचे मूर्तीमंत रूप ! ६९ टक्के आध्यात्मिक पातळीपर्यंत जिवाच्या मनाचे कार्य चालू असते. यामुळे मृत्यूच्या वेळी त्याच्या मनातील विचारांमुळे साधनेची ऊर्जा काही प्रमाणात व्यय होते. पू. इंगळेआजोबा यांचा मनोलय झाला असल्याने त्यांचे मन कार्यरत नव्हते. ते उन्मनी अवस्थेत होते. संत उन्मनी अवस्थेत देहत्याग करतात, त्या वेळी त्यांचे मन ईश्वराच्या १०० टक्के अनुसंधानात असते. संतांच्या उन्मनी अवस्थेमुळे देहत्यागाच्या वेळी त्यांच्या स्थूलदेहाला काही त्रास न होता लिंगदेह देहाच्या बाहेर पडतो. या अवस्थेत संतांचे मन पूर्णत: ईश्वराच्या अनुसंधानात असल्याने ईश्वराला अपेक्षित अशा वेळेत (क्षणात नव्हे, तर सेकंदात) संत देहत्याग करतात. या अवस्थेत संत आनंद अनुभवत असल्याने त्यांच्या पार्थिवातूनही आनंदच प्रक्षेपित होतो. पू. इंगळेआजोबाही आनंद अनुभवत असल्याने त्यांच्या मनाची आनंदावस्था त्यांच्या पार्थिवाच्या गालावर आलेल्या पिवळ्या छटेतून व्यक्त होत आहे.
(प्रत्यक्षातही पू. इंगळेआजोबा यांच्या सेवेत असणारे साधक श्री. प्रथमेश अहिरे यांनी जेवायला जाण्यापूर्वी पू. आजोबांकडे पाहिले होते, तेव्हा ते जीवित होते. ते जेवून येईपर्यंत पू. आजोबांनी देहत्याग केला होता. या वेळी त्यांनी काही आवाजही केला नाही. यावरून ‘संत त्यांच्या सेवेत असलेल्या साधकांची कशी काळजी घेतात !’, हे लक्षात येते. – संकलक)
१ इ. पू. इंगळेआजोबा यांच्या अर्धाेन्मिलित नेत्रांकडे पाहिल्यावर क्षणार्धात डोळे मिटून ते सूक्ष्मातून ध्यान करतांना दिसणे आणि त्यानंतर मन निर्विचार होऊन ध्यान लागणे : पू. इंगळेआजोबा यांचे डोळे अर्धाेन्मिलित (अर्धे उघडे आणि अर्धे बंद) होते. पू. आजोबांच्या डोळ्यांकडे पाहिल्यावर क्षणार्धात माझे डोळे मिटले गेले. मी डोळे मिटताच मला प्रथम पू. आजोबा हिमालयासारख्या क्षेत्रात ध्यान करतांना दिसले. माझ्या डोळ्यांसमोर हे दृश्य २ ते ५ सेकंद होते. त्यानंतर माझे मन निर्विचार झाल्याचे जाणवून नंतर माझे ध्यान लागले. मी ५ मिनिटे ध्यानावस्थेतच होतो.
१ इ १. पू. इंगळेआजोबा यांनी उन्मनी अवस्थेत देहत्याग केलेला असणे आणि त्यांची ध्यानयोगाच्या माध्यमातून समष्टी साधना चालू झाली असल्याने त्यांच्या डोळ्यांकडे पाहिल्यावर ध्यान लागणे : पू. आजोबांनी उन्मनी अवस्थेत देहत्याग केल्याने त्यांचे डोळे अर्धाेन्मिलित अवस्थेत राहिले. व्यष्टी संत देहत्यागानंतरही उच्च लोकांमध्ये त्यांची प्रकृती आणि योगमार्ग यांनुसार साधना करतात, तर व्यष्टी-समष्टी साधना करणारे संत ईश्वराला अपेक्षित अशा मार्गाने साधना करतात. याचे कारण असे की, व्यष्टी संतांच्या मनावर ईश्वरेच्छेने वागण्याचा संस्कार दृढ नसतो. याउलट व्यष्टी-समष्टी साधना केलेल्या संतांमध्ये स्वेच्छा आणि परेच्छा यांचा त्याग करून ईश्वरेच्छेने वागण्याचा संस्कार दृढ असतो. यामुळे व्यष्टी-समष्टी साधना केलेले संत त्यांच्या योगमार्गानुसार नाही, तर ईश्वराला अपेक्षित अशा योगमार्गानुसार उच्च लोकांमध्ये साधना करतात. पू. इंगळेआजोबा यांचेही असेच आहे. त्यांनी जनलोकात ईश्वरेच्छेनुसार ध्यानयोगाच्या माध्यमातून साधना चालू केली आहे. त्यामुळे त्यांच्या डोळ्यांकडे पाहिल्यावर ‘ते ध्यानावस्थेत आहेत’, असे जाणवले. त्यामुळे प्रथम ते ध्यान करतांना आणि नंतर त्यांच्या चैतन्यामुळे माझे ध्यान लागले.
१ ई. पू. इंगळेआजोबा यांच्या कपाळावर उमटलेल्या ॐ कडे पाहून त्यातून अनेक ॐ बाहेर पडतांना दिसणे आणि शांती जाणवणे : पू. आजोबांच्या कपाळाच्या वरच्या भागावर ‘ॐ’ उमटला आहे. या ‘ॐ’कडे पाहिल्यावर मला ‘त्यातून अनेक ॐ निघत आहेत’, असे दिसले आणि ‘ॐ’कडे बघतांना शांती जाणवली.
१ ई १. पू. इंगळेआजोबा त्यांचे मंद, मध्यम आणि तीव्र अशा सर्व प्रकारचे देवाण-घेवाण हिशोब संपवून ते समष्टी कार्य करणार असल्याने त्यांच्या कपाळावर ॐ उमटणे : प्रत्येक जिवाचे मंद, मध्यम आणि तीव्र अशा ३ प्रकारचे देवाण-घेवाण हिशोब असतात. याच देवाण-घेवाण हिशोबातील काही भाग ‘प्रारब्ध’ म्हणून जिवाला एका जन्मात भोगायला मिळतो. अनेक वेळा साधना करून जीव ९० ते ९५ टक्के देवाण-घेवाण हिशोब नष्ट करतो, तरी त्याचे मृत्यूरूपी तीव्र आणि अटल प्रारब्ध शेष रहाते. यामुळे काही संतांनाही मृत्यूच्या वेळी देहाची पीडा सहन करावी लागते. या संदर्भात पू. इंगळेआजोबांचे वैशिष्ट्य असे की, ‘त्यांनी खडतर साधनेद्वारे या तीव्र प्रारब्धावरही मात केली.’ यामुळे कसलीही वेदना न होता (न भोगता) त्यांचा उन्मनी अवस्थेत देहत्याग झाला. पू. आजोबांचे मंद, मध्यम आणि तीव्र, असे सर्व प्रकारचे देवाण-घेवाण हिशोब संपले असून आता ते समष्टी कार्य करणार असल्याचे दिसते. यामुळे त्यांच्या पार्थिवावर ‘ॐ’, म्हणजे समष्टी नाद उमटलेला असून त्यातून चैतन्य प्रक्षेपित होत आहे.
१ उ. पू. इंगळेआजोबा यांच्या तोंडवळ्याकडे बघितल्यावर ‘ते झोपले आहेत’, असे जाणवणे आणि ‘त्यांच्या तोंडवळ्याकडे बघत रहावे’, असे वाटून भाव, चैतन्य, आनंद आणि शांती जाणवणे : मला आणि तिथे उपस्थित असलेले साधक श्री. किसन राऊत, श्री. विजय लोटलीकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) आणि श्री. प्रथमेश यांना पू. आजोबांच्या तोंडवळ्याकडे बघून ‘ते शांत झोपले आहेत’, असे वाटले. ‘त्यांच्या तोंडवळ्याकडे सतत बघत रहावे’, असे मला वाटत होते. पू. आजोबाच्या तोंडवळ्याकडे पाहिल्यावर भाव, चैतन्य, आनंद आणि शांती जाणवत होती.
१ उ १. ‘पू. इंगळेआजोबा यांच्यातील समर्पण भक्तीमुळे त्यांचे अस्तित्व चैतन्यमय झाल्याने त्यांच्याकडे बघत रहावे’, असे वाटणे : ‘तोंडवळा हा मनाचा आरसा आहे.’, अशी इंग्रजी म्हण आहे. मृत्यूसमयी व्यक्तीच्या मनात जसे विचार चालू असतात, तसा तिचा तोंडवळा झालेला असतो. व्यक्तीचा बेशुद्धावस्थेत मृत्यू झालेला असेल, तर तिच्या तोंडवळ्याकडे पुनःपुन्हा पहावेसे वाटत नाही. ‘पू. आजोबांच्या तोंडवळ्याकडे मात्र पुनःपुन्हा पहात रहावे’, असे वाटत होते. याचे कारण ‘पू. इंगळेआजोबांची समर्पण भक्ती’, हे होय. ज्या वेळी भक्त ईश्वराच्या चरणी आपले तन, मन आणि अहं समर्पण करतो, त्या वेळी तो स्वत: ईश्वरस्वरूप म्हणजे चैतन्यमय होऊन जातो. व्यक्तीला शेवटच्या काळात नातेवाइकांच्या समवेत रहाण्याचा थोडा-फार मोह असतोच. पू. आजोबांनी त्या मोहावर मात करून श्री गुरुचरणांशी रहाण्याचा निर्णय घेतला. यांतून त्यांची समर्पणभक्ती लक्षात येते. या प्रकारच्या समर्पणभक्तीमुळे ते स्वत: चैतन्यस्वरूप झाल्याने साधकांना ‘पू. आजोबांच्या तोंडवळ्याकडे पुनःपुन्हा बघत रहावे’, असे वाटत होते.
१ ऊ. पू. इंगळेआजोबांच्या तोंडवळ्याकडे पाहिल्यावर ते काही क्षणांत हसणार असल्याचे जाणवून साधकाच्या तोंडवळ्यावर आपोआप स्मितहास्य येणे : एखादी जिवंत व्यक्ती मनापासून हसत असल्यास तिच्याकडे बघून आपल्यालाही हसू येते. (आपल्या तोंडवळ्यावर हास्य येते.) त्या प्रकारेच पू. इंगळेआजोबांच्या तोंडवळ्याकडे पाहिल्यावर ‘ते काही क्षणांत हसतील’, असे मला जाणवून माझ्या तोंडवळ्यावर आपोआप स्मितहास्य येत होते.
१ ऊ १. पू. इंगळेआजोबांनी आनंद अनुभवत देहत्याग केल्याने त्यांच्या तोंडवळ्यातून प्रक्षेपित होणार्या आनंदामुळे आपोआप स्मितहास्य होणे : पू. आजोबा यांच्या आनंदावस्थेच्या संदर्भात जाणवले की, ‘पू. इंगळेआजोबा यांनी आनंदावस्थेत म्हणजे आनंद अनुभवत देहत्याग केला आहे. त्यामुळे ‘त्यांच्या तोंडवळ्यातूनही आनंद प्रक्षेपित होत आहे आणि काही क्षणांत ते हसणार आहेत’, असे मला जाणवले आणि आनंदाच्या प्रभावामुळे आपोआप त्यांच्या तोंडवळ्यावर स्मितहास्य दिसले.
१ ए. ‘पू. इंगळेआजोबांच्या पार्थिवातून समष्टीसाठी चैतन्य प्रक्षेपित होत असल्याने श्वासोच्छ्वास चालू आहे’, असे जाणवणे : पू. आजोबांच्या पार्थिवाकडे बघितल्यावर ‘त्यांचा श्वासोच्छ्वास चालू आहे’, असे मला जाणवले. ‘पू. आजोबांच्या पार्थिवातून समष्टीसाठी चैतन्य प्रक्षेपित होत असल्याची ही स्थुलातील प्रचीती आहे’, असे मला जाणवले.
१ ऐ. पू. इंगळेआजोबांच्या पार्थिवाच्या पहिल्या दिवसाच्या छायाचित्राच्या तुलनेत दुसर्या दिवसाच्या छायाचित्रात दैवी पालट अधिक आणि सुस्पष्ट दिसणे
१ ऐ १. पू. इंगळेआजोबांची समष्टी साधना चालू असून त्यांचे सद्गुरु पदाकडे मार्गक्रमण चालू असल्याने त्यांच्या पार्थिवाच्या पहिल्या दिवसाच्या छायाचित्राच्या तुलनेत दुसर्या दिवसाच्या छायाचित्रात दैवी पालट अधिक आणि सुस्पष्ट दिसणे : धर्मशास्त्रानुसार मृत्यू झाल्यावर लगेच पार्थिव अग्नीला समर्पित केले पाहिजे. याचे कारण असे की, बहुतांश जीव साधना करणारे नसल्याने त्यांच्या पार्थिवात त्रासदायक वायू भरून त्याचे प्रक्षेपण होते किंवा वाईट शक्ती त्या पार्थिवाचे नियंत्रण घेऊन त्या माध्यमातून लिंगदेहाला त्यांचा दास करू शकतात. हे टाळण्यासाठी लवकरात लवकर पार्थिवाला अग्नि देण्यास सांगितले आहे.
पू. इंगळेआजोबांच्या संदर्भात मात्र याच्या उलट आहे. पू. इंगळेआजोबा यांची आध्यात्मिक पातळी उच्च असून त्यांची सद्गुरुपदाकडे म्हणजे निर्गुणाकडे वाटचाल चालू झाली आहे. मृत्यूनंतर त्यांचा लिंगदेह जनलोकात साधनारत झाल्याने त्याचे स्थूल परिणाम काही प्रमाणात त्यांच्या पार्थिवाच्या माध्यमातून प्रकट होत आहेत. यामुळे पू. इंगळेआजोबांच्या पार्थिवाच्या पहिल्या दिवसाच्या छायाचित्राच्या तुलनेत दुसर्या दिवसाच्या छायाचित्रात दैवी पालट अधिक आणि सुस्पष्ट दिसत आहेत.’
– श्री. निषाद देशमुख (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान) (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३०.९.२०२२, रात्री १२.२१)
या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी या लिंक वर क्लिक करा: https://sanatanprabhat.org/marathi/619203.html
सनातनचे १८ वे संत पू. चत्तरसिंग इंगळेआजोबा यांचे अंत्यदर्शन घेतांना साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती‘२९.९.२०२२ या दिवशी रात्री ८ वाजता सनातनचे १८ वे संत पू. चत्तरसिंग इंगळेआजोबा यांनी देहत्याग केला. १. ‘पू. इंगळेआजोबा यांच्या पार्थिवाकडे पाहिल्यावर ‘ते शांत झोपले असून कोणत्याही क्षणी जागे होतील’, असे मला वाटत होते. मला त्यांच्यामध्ये पुष्कळ चैतन्य जाणवत होते. २. पू. आजोबांच्या भुवयांवरील भाग, गाल आणि कानाची पाळी तेजस्वी दिसत होती. ३. पू. आजोबांचे डोळे अर्धाेन्मिलित होते. त्यांच्या डोळ्यांचा रंग सनातन निर्मित शिवाच्या चित्रातील डोळ्यांच्या रंगाप्रमाणे दिसत होता. ४. मी पू. आजोबांना डोळे मिटून नमस्कार केल्यावर माझी भावजागृती झाली. मी तेथे असेपर्यंत माझ्या शरिरावर रोमांच येत होते. त्या वेळी ‘माझी अंतर्बाह्य शुद्धी होत आहे’, असे मला जाणवत होते. ५. मी पू. आजोबांना डोळे मिटून नमस्कार केल्यावर त्यांच्या आज्ञाचक्रातून मोठ्या प्रमाणात प्रकाश बाहेर पडून तो माझ्या दिशेने येत होता. मी हे सूत्र सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्ते साधक श्री. निषाद देशमुख (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के) यांना सांगितले. तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘पू. आजोबांनी आज्ञाचक्रातून प्राणत्याग केला आहे’, असे मलाही जाणवले.’’ ६. पू. आजोबांचे अंत्यविधी करायला आरंभ झाल्यावर जोरात पाऊस आला.’ – अश्विनी कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.१०.२०२२) |
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |