अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा प्रयत्न झाल्यास आंदोलनाची चेतावणी ! – स्वाभिमानी शेतकरी संघटना

कोल्हापूर – राज्यातील शेतकर्‍यांचा विरोध झुगारून अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा प्रयत्न झाल्यास आंदोलन उभारण्याची चेतावणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिली आहे. कणेरी मठ येथील कार्यक्रमासाठी आलेले कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाकडून निवेदन देण्यात आले. महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार यांच्याशी चर्चा केल्याविना निर्णय घेतला जाणार नाही, असे आश्वासन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाला बोम्मई यांनी दिले. महाराष्ट्र सरकारनेही कर्नाटक सरकारशी संवाद साधून उंची वाढवण्यास विरोध करावा, अशी मागणी निवेदनातून केली आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अलमट्टी धरणाची उंची वाढवल्यास लगतच्या भागात पुराची भीती आहे. पुरामुळे हानी होण्याची भीती आहे. नद्यांची पाणी वाहून नेण्याची क्षमता नाही आणि जागतिक तापमानवाढीमुळे असमान पाऊस पडत आहे. त्यामुळे जास्त पाणी आणि पूर यांच्यावरील नियंत्रणावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या सर्वांचा विचार करून अलमट्टीची उंची वाढवण्याचा निर्णय त्वरित थांबवा. या निवेदनात मागील ३ महापुरांची आठवण करून देण्यात आली आहे.