रेल्वेमध्ये काँग्रेसच्या २ आमदारांनी छेड काढल्याचा महिलेचा आरोप

हे षड्यंत्र असल्याचा आमदारांचा दावा !

आमदार सिद्धार्थ कुशवाहा (डावीकडे) आमदार सुनील सर्राफ (उजवीकडे)

रीवा (मध्यप्रदेश) – येथे एका रेल्वे डब्यामध्ये एका महिला प्रवाशाशी गैरवर्तन केल्याच्या प्रकरणी काँग्रेसचे सतना येथील आमदार सिद्धार्थ कुशवाहा आणि कोतमा येथील आमदार सुनील सर्राफ यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही महिला ६ ऑक्टोबरला रेवांचल एक्सप्रेसमधून रीवा रेल्वे स्थानकावरून राणी कमलापती स्थानकावर जात होती.

१. या महिलेने तक्रारीत म्हटले आहे की, रात्री ११.५० च्या सुमारास दोघेही आमदार ती बसलेल्या सीटच्या बाजूला असलेल्या सीटवर बसून जेवण करू लागले. त्या वेळी दोघे बोलतांना शिवीगाळ करत होते. त्या दोघांनीही मद्यप्राशन केले होते. त्यांनी माझ्या खांद्याला स्पर्श करून जेवण केले का ? अशी विचारणा केली. ते माझ्याकडे वाईट दृष्टीने पहात होते. यानंतर मी माझ्या पतीला भ्रमणभाष करून कळवल्यावर त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली, तसेच रेल्वे मंत्र्यांना ट्वीट करून याची माहिती दिली. त्यानंतर काही वेळाने पोलीस आले आणि मला दुसर्‍या ठिकाणी स्थानांतरित केले.

२. याविषयी आमदार सिद्धार्थ कुशवाहा यांनी स्पष्टीकरण देतांना म्हटले की, आम्ही मद्यप्राशन केलेले नव्हते. आम्ही डब्यातील दिवेही लावले नव्हते. आम्ही त्या महिलेला आमची सीट दिली होती.

३. आमदार सुनील सर्राफ यांनी सांगितले की, आम्ही प्रतिदिन या गाडीतून प्रवास करतो. महिलेने तक्रारीमध्ये आमचे नाव आणि मतदारसंघ यांचे नाव लिहिले आहे. तिला याची माहिती कशी मिळाली ? हे एक षड्यंत्र आहे.

संपादकीय भूमिका

पोलिसांनी याची सखोल चौकशी करून जनतेला सत्य सांगावे !