देहलीच्या शाळेत ११ वर्षांच्या विद्यार्थिनीवर दोघा विद्यार्थ्यांकडून जुलै मासात सामूहिक बलात्कार !

  • शाळेने घटना दडपली !

  • कारवाई न झाल्याने देहली महिला आयोगाची पोलिसांना नोटीस

नवी देहली – येथील केंद्रीय विद्यालयात जुलै मासामध्ये दोन विद्यार्थ्यांकडून ११ वर्षांच्या विद्यार्थिनीवर शौचालयात झालेल्या सामूहिक बलात्काराच्या प्रकरणी देहली महिला आयोगाने पोलिसांना नोटीस बजावली आहे. पोलिसांकडून याप्रकरणी अहवाल मागवण्यात आला आहे. गुन्हा नोंदवणे आणि आतापर्यंत करण्यात आलेली अटक यांची माहिती द्यावी. हे प्रकरण लपवणारे शाळेचे शिक्षक आणि इतर कर्मचारी यांच्यावर काय कारवाई करण्यात आली आहे ? याविषयीही विचारणा करण्यात आली आहे. शाळेतल्या शिक्षकांनी ही घटना लपवण्याचा प्रयत्न केल्याचा पीडित मुलीचा आरोप आहे. या पीडितेने ४ ऑक्टोबरला याविषयी पोलिसांकडे तक्रार केली. यानंतर केंद्रीय विद्यालय संघटनेच्या स्थानिक कार्यालयानेही या प्रकरणी चौकशीचा आदेश दिला.

महिला आयोगाने दिलेल्या माहितीनुसार जुलै मासामध्ये पीडित मुलगी तिच्या वर्गात जात असतांना ११ वी आणि १२ वीत शिकणार्‍या २ विद्यार्थ्यांना तिचा धक्का लागला. मुलीने त्या मुलांची क्षमा मागितली; पण त्यांनी गैरवर्तन करण्यास चालू केले. यानंतर ते तिला घेऊन शौचालयात गेले. त्यांनी दरवाजाची कडी लावली आणि तिच्यावर बलात्कार केला. जेव्हा तिने तिच्या वर्गशिक्षिकेला याविषयी सांगितले, तेव्हा तिने विद्यार्थ्यांना शाळेतून काढून टाकले आहे, असे सांगत प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला.

संपादकीय भूमिका

इतकी गंभीर घटना होऊनही पोलीस आणि शाळेचे प्रशासन याविषयी निष्क्रीय राहिले, हे संतापजनक आहे. संबंधितांवरही कारवाई झाली पाहिजे !