अमेरिकेमध्ये आता गांजाचा वापर केल्यास कारवाई होणार नाही !

गांजाच्या प्रकरणी कारागृहातील सर्वांची होणार सुटका !  

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (उजवीकडे)

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी एक ऐतिहासिक घोषणा केली आहे. त्यांनी गांजाचा वापर करतांना दोषी ठरवण्यात आलेल्या सहस्रो नागरिकांना निर्दोष ठरवून त्यांची लवकरच कारागृहांतून सुटका करण्यात येईल, असे घोषित केले आहे. जगभरातील अनेक देशांत गांजाचा वापर केल्यास कारागृहात टाकले जाते. अमेरिकेतही हाच कायदा होता; मात्र आता तो रहित करण्यात आला आहे. अमेरिकेत वर्ष १९७० मध्ये गांजाच्या विरोधात कायदा करण्यात आला होता. त्यानुसार आतापर्यंत सहस्रो नागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे.

राष्ट्राध्यक्ष बायडेन म्हणाले की, गांजाची विक्री आणि त्याचा वापर केल्यामुळे दोषी ठरवण्यात आलेले नागरिक कारागृहांत आहेत. त्यांना क्षमा करण्यात आली आहे. यापुढे कुणालाही गांजा जवळ ठेवल्यास अथवा त्याचा वापर केल्यास त्याची रवानगी कारागृहात होणार नाही; मात्र लहान मुलांनी केलेल्या गांजाची तस्करी आणि विक्री यांवर मर्यादा कायम ठेवण्यात आल्या आहेत, असेही बायडेन यांनी स्पष्ट केले.