बनावट कागदपत्रांद्वारे महारेराची नोंदणी करणार्‍या ५२ विकासकांची नोंदणी रहित !

मुंबई – बनावट कागपदपत्रांच्या आधारे महारेराची (‘महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटी’ – महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण) नोंदणी करणार्‍या ५२ विकासकांची नोंदणी महारेराने तात्पुरती रहित केली आहे.

कल्याण-डोंबिवली शहरात अनधिकृत बांधकाम करणार्‍या विकासकांविरोधात कारवाई होत नसल्याने ही बांधकामे वाढत आहेत. अनधिकृत बांधकामांना महारेरा नोंदणीद्वारे आळा बसेल, असे जनतेला वाटत होते; मात्र आता ही नोंदणीच बनावट कागदपत्राद्वारे करण्यात आल्याची याचिका उच्च न्यायालयात प्रविष्ट करण्यात आली आहे. पालिकेच्या पडताळणीत ६८ बांधकाम अनुमत्या बनावट कागदपत्रांद्वारे देण्यात आल्या. त्यानुसार पालिकेने ६५ विकासकांविरोधात गुन्हे नोंद केले. ५२ विकासकांची सूची महारेराला सादर केली होती. सूचीची छाननी करत महारेराने ५२ विकासकांची नोंदणी तात्पुरती रहित केली. विकासकांची सूची संकेतस्थळावर प्रसिद्ध करत त्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या. नोटिशीनुसार त्यांची सुनावणी होणार आहे. या सुनावणीत दोषी आढळल्यास संबंधित विकासकाची नोंदणी कायमस्वरूपी रहित करण्यात येण्याची शक्यता आहे.

संपादकीय भूमिका

कागदपत्रांची छाननी न करता बांधकामाची अनुमती देणे आणि महारेरा नोंदणी करणे, ही कामे करणार्‍या अधिकार्‍यांवरही कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी कठोर कारवाई केली, तरच या गोष्टींना आळा बसेल !