रामनाथी (फोंडा), ५ ऑक्टोबर – येथील श्री रामनाथ देवस्थानात आश्विन शुक्ल दशमी या दिवशी ५ ऑक्टोबरला सीमोल्लंघन कार्यक्रम आणि दसरोत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. सायंकाळी सीमोल्लंघनाचे प्रतीक म्हणून देवालयानजीक असलेल्या डोंगरावरील शमीच्या पेडापर्यंत (पारापर्यंत) श्री रामनाथदेवाच्या उत्सवमूर्तींची सुवर्णाच्या पालखीतून आणि श्री कामाक्षीदेवीच्या उत्सवमूर्तीची चांदीच्या पालखीतून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.
ब्रह्मवृंदांनी शमीच्या वृक्षाचे, आपट्याच्या वृक्षाचे तसेच शस्त्रांचे पूजन करून सर्व भाविकांसाठी शुभसंकल्प केला आणि प्रार्थना केली. त्यानंतर सोने लुटण्याचा पारंपरिक कार्यक्रम झाला. या सीमोल्लंघन कार्यक्रमात देवस्थानचे पदाधिकारी, सेवेकरी, कुळावी आणि भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सनातनच्या आश्रमातील साधकांनी श्रींचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.
डोंगरावरील पेडाकडे जाण्याचा मार्ग येथील सनातनच्या आश्रमाच्या भूखंडातून जातो. या पालखी मिरवणुकीच्या मार्गावर सनातनच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे भाविकांचे स्वागत करणारा फलक लावण्यात आला होता आणि देवाची सेवा म्हणून भाविकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात आले.
रामनाथी येथील श्री रामनाथदेव, श्री गणपति, श्री सातेरीदेवी, श्री कामाक्षीदेवी आणि कवळे येथील श्री शांतादुर्गादेवी यांच्या चरणी सनातनच्या वतीने प्रार्थना !
सनातन संस्थेचे व्यवस्थापकीय विश्वस्त श्री. वीरेंद्र मराठे आणि त्यांच्या धर्मपत्नी सौ. वृंदा मराठे यांनी रामनाथी येथील श्री रामनाथदेव, श्री गणपति, श्री सातेरीदेवी, श्री कामाक्षीदेवी आणि कवळे येथील श्री शांतादुर्गादेवी यांचे दर्शन घेतले. श्री. वीरेंद्र मराठे यांनी श्री रामनाथाला श्रीफळ अर्पण केले. या वेळी सौ. वृंदा मराठे यांनी श्री कामाक्षीदेवी, श्री सातेरीदेवी आणि श्री शांतादुर्गादेवी यांची साडी अर्पण करून ओटी भरली. या वेळी उभयतांनी सनातनच्या राष्ट्र अन् धर्म कार्यासाठी, तसेच ‘आगामी आपत्काळात साधकांचे रक्षण व्हावे आणि लवकरात लवकर हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी’, यासाठी सर्व देवतांच्या चरणी प्रार्थना करून आशीर्वाद घेतले.
अनुभूती
मंदिरातील पुरोहितांनी सनातनच्या वतीने श्री शांतादुर्गादेवीला गार्हाणे घातल्यावर देवीच्या चरणांजवळील एक फूल खाली पडले. यातून प्रार्थना देवीपर्यंत पोचून तिने आशीर्वाद दिल्याची अनुभूती आली. – सौ. वृंदा वीरेंद्र मराठे