सांगली – सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे वर्ष २०१८-२०१९ आणि वर्ष २०१९-२०२० चे लेखापरीक्षण झालेले नाही. भ्रष्टाचार लपवण्यासाठीच हे लेखा परीक्षण करण्यात आलेले नाही. तरी येत्या १५ दिवसांत लेखापरीक्षण अहवाल सादर न झाल्यास प्रसंगी न्यायालयात याचिका प्रविष्ट करू, अशी चेतावणी ‘स्वतंत्र भारत पक्षा’चे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे यांनी दिली आहे. (अशी चेतावणी का द्यावी लागते ? लेखा परीक्षण न होण्यास कारणीभूत असणार्या उत्तरदायींची चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई होणे आवश्यक ! – संपादक)
या संदर्भात जयपाल फराटे म्हणाले, ‘‘सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाकडून सावळी येथील भूमी खरेदीमध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा, त्याचसमवेत चाकरभरती आणि इतर गोष्टींमध्ये आर्थिक अपहार झाला आहे. त्यामुळे याच्या विरोधात पणन विभागाकडे अन्वेषण करण्याची मागणी केली होती. त्याची नोंद घेत पणन विभागाकडून जिल्हा उपनिबंधकांना अन्वेषण करून अहवाल सादर करण्याचे आदेशसुद्धा देण्यात आले आहेत.’’