जीवनवाहिनी असलेल्या लोकलगाडीचे दसर्‍यानिमित्त कल्याण आणि डोंबिवली रेल्वेस्थानकांत प्रवाशांकडून पूजन !

ठाणे, ५ ऑक्टोबर (वार्ता.) – प्रतिदिन प्रवाशांना कामाच्या ठिकाणी वेळेत घेऊन जाणार्‍या नेहमीच्या लोकलगाड्यांची डोंबिवली आणि कल्याण रेल्वेस्थानकांत ४ ऑक्टोबर या दिवशी सकाळी झेंडूच्या फुलांच्या माळा लावून, तसेच लोकलगाडीत आरती आणि भजने गाऊन प्रवाशांनी पूजा केली. दसर्‍यानिमित्त ५ ऑक्टोबर या दिवशी कार्यालयांना सुट्टी असून लोकलगाडीचा प्रवास होणार नसल्याने प्रवाशांनी दसर्‍याच्या आदल्या दिवशी लोकलगाडीची वाहनदेवता या भावाने पूजा केली.

लोकलगाडीच्या खिडक्या, दरवाजे यांना दर्शनी भागात फुलांच्या माळा लावण्यात आल्या होत्या, तसेच डब्यांमध्ये चारही बाजूंनी झेंडूच्या फुलांच्या माळा लावण्यात आल्या होत्या. लोकलच्या मोटारमनची गंध, अक्षता लावून चालक म्हणून पूजा करण्यात आली. सजावट झाल्यानंतर लोकलच्या समोर आणि डब्यात नारळ वाढवून, पेढे वाटून दसर्‍याचा आनंद साजरा करण्यात आला. महिला डब्यांतही महिला उत्साहाने या उपक्रमात सहभागी झाल्या होत्या. लोकलगाडी चालू होताच देवीच्या आरत्या म्हणत, तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येईपर्यंत प्रवासी देवीचा जागर करत, भजने करत प्रवास करत होते. तर बर्‍याच आस्थापनांना दसर्‍यानिमित्त सुट्टी असल्याने कामगारवर्गाने सरस्वतीपूजन आणि हत्यारांचे पूजन ४ ऑक्टोबर या दिवशीच केले.