ऋषिकेश (उत्तराखंड) येथील परमार्थ निकेतनमध्ये ८ आणि ९ ऑक्टोबर या दिवशी होणार ‘नारीसंसद’ !

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत विशारद सुश्री (कु.) तेजल पात्रीकर सहभागी होणार

फोंडा, गोवा – ऋषिकेशमधील (उत्तराखंड) परमार्थ निकेतन येथे ८ आणि ९ ऑक्टोबर या दिवशी ‘नारीसंसदे’चे आयोजन करण्यात आले आहे. ‘लोकसंसदे’चाच एक भाग म्हणून ‘नारीसंसदे’चे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे आयोजन माता ललितादेवी सेवाश्रम ट्रस्ट आणि परमार्थ निकेतन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून केरळचे राज्यपाल आरिफ महंमद खान, उत्तरप्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, केंद्रीय मंत्री श्री. अर्जुन राम मेघवाल आणि उत्तराखंड विधानसभेचे अध्यक्ष ऋतु खंडुरी भूषण आदी उपस्थित रहाणार आहेत. महिलांसाठीच्या या कार्यक्रमात देशभरातून विविध प्रतिष्ठित आणि मान्यवर सहभागी होणार आहेत, अशी माहिती ‘नारीसंसदे’चे कार्यकारी संयोजक तथा वरिष्ठ पत्रकार श्री. रविशंकर तिवारी यांनी दिली. दोन दिवस चालणार्‍या परिसंवादामध्ये विविध विषयांवर मार्गदर्श करण्यात येणार आहे. त्यामध्ये महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या संगीत विशारद सुश्री (कु.) तेजल पात्रीकर ‘आध्यात्मिक विकास आणि नेतृत्व करण्यामध्ये महिलांची भूमिका’ या विषयावर संबोधित करणार आहेत.

सुश्री (कुमारी) तेजल पात्रीकर

रविशंकर तिवारी यांनी पुढे सांगितले की, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पू. स्वामी चिदानंद सरस्वती हे असतील. तसेच विचारवंत श्री. के.एन्. गोविंदाचार्य हेही उपस्थित रहाणार आहेत. या संसदेमध्ये ‘कुटुंब रचना आणि कार्यप्रणाली काय आहे ? आणि ती कशी असावी ?’, तसेच मुक्त संवादामध्ये ‘महिलांसाठी काय चांगले होईल ?’ आणि ‘महिलांचे शिक्षण, आरोग्य आणि पर्यावरण’ या विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे.

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाकडून आभार

‘लोकसंसद’चे श्री. रविशंकर तिवारी आणि ‘परमार्थ निकेतन’ यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाला सहभागी होण्याची संधी दिली. तसेच इंदूर येथील श्री. प्रभुनारायण मिश्रा यांनी कार्यक्रमाच्या आयोजकांना महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाला सहभागी करवून घेण्यासाठी नाव सुचवले. या सर्वांचे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने आभार मानले आहेत.