आदर्श राजा असलेल्या प्रभु श्रीरामासम दैवी गुण असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले !

 सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

‘हिंदु राष्ट्राची स्थापना होण्यासाठी अविरतपणे झटत असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्याविषयी समाजातील काही जणांनाच ठाऊक आहे. त्यांचे वास्तव्य रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात आहे. ‘हिंदु राष्ट्र स्थापन व्हावे’, यासाठी महर्षींच्या आज्ञेने रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात यज्ञयागादि अनुष्ठाने होत असतात. त्या वेळी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची वंदनीय उपस्थिती असते. सहस्रो साधक समाजात जागृती होण्यासाठी विविध उपक्रम आणि आंदोलने करत आहेत. मागील अनेक वर्षे गुरुदेव तर कुठेच जात नाहीत. ते मोठ्या सभेला संबोधित करत नाहीत, तसेच प्रवचन आदी करत नाहीत; मात्र ‘हिंदु राष्ट्र येणार’, असे ते सतत त्यांच्या लिखाणातून साधकांना सांगत आहेत. ‘स्वतःला हिंदु म्हणवून घेणार्‍या ‘असामान्य व्यक्ती’ स्वकर्तृत्वामुळे हिंदु राष्ट्र आणतील आणि भारताला विश्वगुरु करतील’, असे समाजातील व्यक्तींना वाटते. असे असतांना ‘विविध नाडीपट्टींमध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले हे हिंदु राष्ट्राची स्थापना करतील’, असे ऋषीमुनींनी जे लिहिले आहे, ते कसे घडणार ?’, हा प्रश्न साधकांच्या मनात येऊ शकतो. या विजयादशमीला आपण याविषयी जाणून घेऊया.

भगवंताची धर्मसंस्थापनेची लीला घडून येण्यासाठी प्रतीक्षा करावी लागण्याची कारणे

श्री. विनायक शानभाग

१. ‘जोपर्यंत असुरांच्या पापाचा घडा भरत नाही आणि त्यांचे पुण्यबळ क्षीण होत नाही, तोपर्यंत भगवंत वाट पहातो.

२. भक्तांची भक्ती वाढल्यानंतरच देव त्यांच्यासाठी धावून येतो ! : भक्तांची साधना, म्हणजे भक्ती वाढली की, साधना करणारे जिवांना हिंदु राष्ट्राची अनुभूती येणार आहे. भगवंत साधकांची आर्तता आणि भगवंत दर्शनाची ओढ वाढण्याची वाट बघत असतो. अजून साधकांची हाक गजेंद्र आणि भक्त प्रल्हाद यांच्यासारखी त्या भगवंताकडे पोचायची आहे, त्यानंतरच देव साधकांसाठी धावून येणार आहे.

३. चिरंतन आनंद देणार्‍या भगवंताची प्राप्ती होण्यासाठी साधकांना परिश्रम करावेच लागतील ! : परिश्रम केल्याविना यश मिळत नाही. परिश्रम न करता मिळालेले यश अधिक काळ टिकत नाही. वाईट शक्ती साधकांना विविध प्रकारचे त्रास देत आहेत. ते त्रास साधकांना आणखी थोडा काळ सहन करावे लागणार आहेत. त्रास सहन केल्याविना चिरंतन आनंद देणार्‍या भगवंताची प्राप्ती तरी कशी होणार ?

४. प्रतीक्षा केल्यानंतर होणारे भगवंताचे दर्शन आणि मिळणारा त्याच्या आशीर्वादाचा आनंद निराळाच असणे : सध्याचा काळ ‘प्रतीक्षा आणि परीक्षा’ यांचा आहे. प्रतीक्षेनंतर होणारे भगवंताचे दर्शन आणि त्याच्या आशीर्वादाचा आनंद निराळाच असतो. ईश्वराला धर्मसंस्थापना करण्यासाठी वेळ लागत नाही. ज्याप्रमाणे श्रीकृष्णाने केवळ १८ दिवसांमध्ये एवढे मोठे महाभारत युद्ध पूर्ण केले, त्याच श्रीकृष्णाला हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी वेळ लागणार नाही. ३ वर्षांत पूर्ण होणारे कार्य भगवंत आवश्यकतेप्रमाणे ३ मास, ३ आठवडे किंवा ३ दिवस या कालावधीत पूर्ण करूही शकतो.

५. भगवंताच्या परीक्षेत उत्तीर्ण होणारे जीवच खर्‍या अर्थाने हिंदु राष्ट्रासाठी सिद्ध होणार असणे : भगवंत सध्या एवढेच पहात आहे, ‘तो जे हिंदु राष्ट्र आणणार आहे, त्यासाठी माझे साधक सिद्ध आहेत ना ? त्यांची ईश्वरावरील श्रद्धा किती आहे ? ते कठीण प्रसंगांत देवाचा धावा करतात ना ? प्रतीक्षा करतांना त्यांचा संयम सुटत नाही ना ? बस.. देवाच्या परीक्षेत आपल्याला उत्तीर्ण व्हायचे आहे. ही परीक्षा सीतामाता, हनुमंत, वानर, पांडव यांनाही चुकलेली नाही. या परीक्षेत उत्तीर्ण होणारे जीवच हिंदु राष्ट्रासाठी सिद्ध होतील.

६. ‘ॠषीमुनी आणि देवता यांना भगवंताचा मानव अवतार धर्मसंस्थापना करणारच’, याची निश्चिती असणे : ॠषीमुनी आणि देवता यांना ‘भगवंताचा मानव अवतार धर्मसंस्थापना करणारच’, याची निश्चिती असते; मात्र त्यांनाही ‘भगवंताच्या अंतरंगात काय चालू आहे ?’, हे कळत नसते. भगवंताची दिव्य लीला केवळ त्यालाच ठाऊक असते. ती लीला उलगडण्यासाठी आपण वाट पाहूया.

७. प्रार्थना ! : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले, तुमची माया तुम्हीच जाणता. विजयादशमीच्या निमित्ताने आम्हा साधकांची आपल्या चरणी प्रार्थना आहे, ‘तुमच्याप्रती आमची भक्ती सदैव दृढ राहू दे. आमची शबरीसम प्रतीक्षा करण्याची सिद्धता असू दे. आमच्यात लक्ष्मणासारखी तत्पर सेवा करण्याचे गुण येऊ देत. सीतामातेसारखा संयम येऊ देत. मायेपासून अलिप्त रहाणार्‍या हनुमंतासारखी दास्यभक्ती येऊ दे. तुम्हीच श्रीराम आहात. आम्हाला ईश्वरप्राप्ती करून देणारे मोक्षगुरु आहात. आमची ही प्रार्थना स्वीकार करा.’

– श्री. विनायक शानभाग (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.१०.२०२२)    

 १. ‘धर्मसंस्थापना कोण करू शकतो’, याविषयी देवर्षि नारद आणि वाल्मीकिऋषि यांच्यातील संवाद

१ अ. ‘सध्या सर्व लोकांत सामर्थ्यवान मनुष्य कोण आहे ?’, असा प्रश्न वाल्मीकि ऋषि यांनी देवर्षि नारद यांना विचारणे : ‘धर्मसंस्थापना करू शकतो’, असा ‘गुणवंत मानव कोण आहे ?’, असे वाल्मीकि ऋषि यांना वाटते. वाल्मीकी रामायणात ग्रंथाच्या प्रारंभी वाल्मीकि ऋषि देवर्षि नारद यांना प्रश्न विचारतात, ‘सध्या सर्व लोकांत सद्गुणी, वीर्यवान्, धर्मज्ञ, कृतज्ञ, सत्यवादी, हाती घेतलेले काम निश्चयाने पार पाडणारा, चारित्र्यसंपन्न, सर्व प्राणिमात्रांचे हित पहाणारा, विद्वान, समर्थ, सौंदर्यवान, मन नियंत्रणात असलेला, क्रोधावर विजय मिळवलेला, तेजस्वी, मत्सर नसलेला, ज्याला राग आला, तर देवही थरथर कापतात’, असा सामर्थ्यवान मनुष्य कोण आहे, ते मला सांगा. तुम्ही अशी माहिती पुरवण्यास समर्थ आहात.’

१ आ. देवर्षि नारद यांनी केलेले ‘श्रीरामा’चे गुणसंकीर्तन : वाल्मीकिऋषींच्या या प्रश्नावर उत्तर देतांना देवर्षि नारदांनी रामचंद्रांच्या ज्या गुणांचे वर्णन केले आहे, ते वाचले, तरी ‘केवढी महान विभूती रामायणकाळातील कार्यासाठी अभिप्रेत होती’, याची कल्पना येते. नारद म्हणतात, ‘हे वाल्मीकि ऋषि, असे ईश्वरी गुण असलेला मानव सापडणे कठीण आहे. ‘येत्या काळात असा एक दैवी गुणसंपन्न मानव पृथ्वीवर येईल’, याविषयी मला जे ब्रह्मदेवाने सांगितले आहे, ते मी सांगतो, ‘राम’ नावाचा एक शूर-वीर मानव ईक्ष्वाकु वंशात जन्म घेईल. तो गुणांचा राजा असेल आणि सर्व वासनांवर मात केलेला असेल. तो बुद्धीमान, नीतीमान आणि धैर्यवान असेल. तो उंच असून अजानुबाहू असेल. त्याच्या मुखावर सूर्यासम तेज असून त्याची वाणी चैतन्यमय असेल. त्याची प्रत्येक कृती यशस्वी होऊन तो धर्मरक्षण करणारा असेल. तो भक्तजनांचे रक्षण करणारा असून त्याला वेद-वेदांगांचे ज्ञान असेल. तो सर्व शास्त्रांमध्ये पारंगत असून स्मृतीवान् आणि प्रतिभावान, सर्वलोकप्रिय असेल. ईश्वराचे भक्त असलेले साधूजन त्याच्याकडे स्वतःचे रक्षक म्हणून बघतील. तो सर्वगुणसंपन्न असून समुद्राच्या खोलीसारखे त्याचे गांभीर्य असेल, तर धैर्य हिमालय पर्वतासारखे अचल असेल. त्याचे मुख पौर्णिमेच्या चंद्रासारखे असेल. तो श्रीविष्णुसारखा महावीर असेल, कालाग्नीसारखा त्याचा क्रोध असेल आणि पृथ्वीसम क्षमाशील असेल, धनसंपत्तीमध्ये तो कुबेर असेल. त्याला पाहिल्यावर ‘स्वयं धर्मच आपल्यासमोर उभा आहे’, असे वाटेल. ‘सर्वगुणसंपन्न असलेला तो दशरथपुत्र ‘श्रीराम’ या नावाने संपूर्ण पृथ्वीवर विख्यात होणार आहे.’

२. धर्मसंस्थापकात अभिप्रेत असलेले सर्व गुण सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्यात असणे आणि त्यांच्या नावातच ‘जयंत’ असणे

वाल्मीकि ऋषि आणि देवर्षि नारद यांच्यातील संभाषणाचे अवलोकन केल्यास लक्षात येईल की, ‘सध्या पृथ्वीवरील कोणताही राजा, विद्वान, वैज्ञानिक, शास्त्रवेत्ता किंवा महाउद्योजक यांच्यात श्रीरामाचे गुण आढळत नाहीत. सनातनच्या साधकांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांना अत्यंत जवळून पाहिलेले आहे. त्यांच्यासमवेत सेवा केली आहे. साधकांना त्यांचा सहवास लाभला आहे. वाल्मीकि ऋषि ज्या गुणवान मनुष्याची अपेक्षा करत आहेत आणि देवर्षि नारद ज्या गुणवंताचे वर्णन करत आहेत, ते सर्व गुण सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यात आढळतात. ‘गुरुदेवांनी आतापर्यंत एखादे कार्य हातात घेतले आणि ते त्यात विजयी झाले नाही’, असे कधीच झाले नाही. त्यांच्या नावातही ‘जयंत’ आहे, म्हणजे जे सदैव विजयी असतील !

३. सर्वगुणसंपन्न भगवंत मानवरूपात आल्यावर त्याच्या कार्यात सहभागी होण्यासाठी ब्रह्मांडातील सर्व शक्ती एकत्र येतात !

श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

जेव्हा श्रीराम मानव रूपात पृथ्वीवर आले, तेव्हा सर्व देवता वानररूपात आल्या. श्रीविष्णूचे शंख-चक्र आणि आदिशेष हे श्रीरामाच्या भावंडांच्या रूपात आले. स्वयं शिव हनुमंताच्या रूपात आले. समुद्रदेवता, निसर्ग देवता, सर्व ॠषिमुनी, सूर्य-चंद्र हे सर्व श्रीरामाच्या धर्मसंस्थापनेच्या कार्यात सहभागी झाले. आता धर्मसंस्थापनेसाठी पृथ्वीवर आलेले श्रीविष्णूचे अवतार सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या संदर्भातही असेच आहे. आदिशक्ति ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ’ यांच्या रूपात अवतरली आहे. ऋषीमुनी नाडीपट्टीच्या माध्यमातून मार्गदर्शन करत आहेत. देवता यज्ञ-यागाच्या वेळी अग्नीच्या माध्यमातून त्यांची उपस्थिती दर्शवत आहेत.

४. सर्वगुणसंपन्न मानवाच्या रूपात आलेल्या भगवंताचे आज्ञापालन करण्यासाठी आतुर असलेल्या देवता, ॠषीमुनी, सिद्ध, योगी आणि अवघी सृष्टी !

राजाचे आज्ञापालन करण्यासाठी त्याचे मंत्री, सेनापती आणि सैनिक सदैव तत्पर असतात, त्याचप्रमाणे पृथ्वीवर चारित्र्यवान आणि सर्वगुणसंपन्न मानवाच्या रूपात आलेल्या भगवंताचे आज्ञापालन करण्यासाठी पृथ्वी, आप, तेज, वायु, आकाश, समुद्र, पर्वत, नदी, पक्षी, प्राणी, यक्ष-किन्नर, वसुगण, रुद्र, देवगण, काल, दिशा, सूर्य-चंद्रादि नवग्रह, आदिशक्ति आणि तिच्या सर्व शक्तिस्वरूपिणी, नाना युगांत भगवंताची सेवा केलेले ॠषीमुनी, सिद्ध आणि योगी सदैव तत्पर असतात. धर्मसंस्थापनेचा शंखनाद होताच ते क्षणार्धात कार्यरत होतात. पृथ्वीवर विविध क्षेत्रांमध्ये भगवंताने ठेवलेली त्याची सुप्त ऊर्जा कार्यरत होते. निसर्ग त्याचे नियम बाजूला ठेवून भगवंताच्या आज्ञेने सर्व करायला लागतो. देश-दिशा, भूमी-आकाश, जल, पाताल-सत्यलोक हे सर्व मानवाच्या रूपातील भगवंताच्या आज्ञेत रममाण होतात. मानवाच्या रूपातील त्या देवाला कुठेही जाण्याची आवश्यकता नसते. त्याच्याकडेच सर्वकाही असते आणि सर्व त्याच्याकडेच येतात. येणार्‍या काळात सनातनचे साधक भगवंताच्या या दैवी लीलांची प्रचीती ‘याची देही, याची डोळा’ घेणार आहेत.’