कॅनडामध्ये ‘श्री भगवद्गीता पार्क’ नावाच्या फलकाची अज्ञाताकडून तोडफोड !

टोरांटो (कॅनडा) – कॅनडातील ब्रॅम्प्टन शहरात एका उद्यानाला ‘श्री भगवद्गीता पार्क’ असे नाव देण्यात आले आहे. या नावाच्या फलकाची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली. ‘अधिकार्‍यांनी या घटनेची चौकशी करण्याचा आदेश दिला आहे’, असे ब्रॅम्प्टन शहराचे महापौर पॅट्रिक ब्राउन यांनी ट्वीट करून म्हटले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार नुकतेच अनावरण केलेल्या श्री भगवद्गीता पार्कच्या चिन्हाची तोडफोड करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी कॅनडातील श्री स्वामीनारायण मंदिराची तोडफोड करून भारतविरोधी लिखाण करत ‘खलिस्तान झिंदाबाद’ लिहिण्यात आले होते. या घटनेनंतर भारत सरकारने तेथील भारतियांना सूचना जारी करून काळजी घेण्याचे आवाहन केले होते.

मागील आठवड्यातच ब्रॅम्प्टन महानगरपालिकेने शहरातील प्रभाग ६ मधील उद्यानाला ‘श्री भगवद्गीता पार्क’ असे नाव दिले आहे. हिंदू समाज आणि त्याचे शहरासाठीचे योगदान यांच्या स्मरणार्थ या उद्यानाचे नाव ‘श्री भगवद्गीता पार्क’ असे करण्यात आले.

संपादकीय भूमिका

  • कॅनडामध्ये भारत आणि हिंदुविरोधी गट अधिक सक्रीय झाला आहे. यामागे खलिस्तानी कट्टरतावादी आहेत. भारत सरकारने कॅनडा सरकारवर दबाव निर्माण करून खलिस्तानी कट्टरतावाद्यांचा बंदोबस्त करण्यास भाग पाडले पाहिजे !