कानपूर येथे ट्रॅक्टर-ट्रॉली तलावात पडल्याने झालेल्या अपघातात २६ जणांचा मृत्यू

ट्रॅक्टरचा चालक दारू प्यायलेला होता !

कानपूर (उत्तरप्रदेश) – येथे १ ऑक्टोबरच्या रात्री ट्रॅक्टर-ट्रॉली तलावात पडल्याने झालेल्या अपघातात २६ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये १३ महिला आणि १३ मुले आहेत. हे सर्व जण कोरठा गावचे रहिवासी होते. या ट्रॅक्टर-ट्रॉलीमध्ये ४५ जण होते. हे लोक उन्नावच्या चंद्रिका देवी मंदिरातून मुंडन विधी करून कानपूरला परतत होते. ट्रॅक्टर-ट्रॉलीचा चालक दारू प्यायलेला होता. त्याने आधी गाडी चालवण्यास नकार दिला होता. त्याच्या मुलाचेही मुंडन होते. तो या अपघातातून बचावला असून आता पसार झाला आहे. केंद्रीय मंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी कोरठा गावात जाऊन लोकांचे सांत्वन केले.

या प्रकरणी अतिरिक्त पोलीस महासंचालक यांनी निष्काळजीपणा केल्यावरून ४ पोलिसांना निलंबित केले आहे. या अपघाताची दंडाधिकार्‍यांमार्फत चौकशी होणार आहे. स्थानिकांच्या आरोपानुसार, पोलीस वेळेत घटनास्थळी पोचले नाहीत आणि रुग्णवाहिकाही वेळेत पोचली नाही. ते वेळेवर आले असते, तर काही जणांचे प्राण वाचले असते. पंतप्रधानांनी मृतांच्या नातेवाइकांना २ लाख रुपये आणि घायाळांना ५० सहस्र रुपयांची भरपाई घोषित केली आहे.