परात्पर गुरुदेवांच्या सतत अनुसंधानात असणारा ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचा दैवी बालक कु. श्रीनिवास देशपांडे (वय १० वर्षे) !

परात्पर गुरुदेवांच्या सतत अनुसंधानात असणारा ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचा दैवी बालक कु. श्रीनिवास देशपांडे (वय १० वर्षे) !

‘श्रीनिवास सतत परात्पर गुरुदेवांच्या अनुसंधानात असतो’, असे माझ्या लक्षात आले. त्या संदर्भात मला श्रीनिवासविषयी लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये, त्यांची आश्रमजीवन आणि ईश्वर यांच्याविषयी असलेली ओढ आदी सूत्रे पुढे दिली आहेत.

कु. श्रीनिवास देशपांडे

१. खोलीतील समोरासमोरील पलंगांवरील श्रीकृष्णाचे चित्र आणि परात्पर गुरुदेवांचे छायाचित्र पहात त्यांच्या अनुसंधानात रंगून जाणे

श्रीमती मेघना वाघमारे

एकदा आम्ही (मी आणि श्रीनिवासची आई) साधनेविषयी बोलत होतो. कु. श्रीनिवासच्या आईच्या पलंगावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र आणि माझ्या पलंगावर श्रीकृष्णाचे चित्र ठेवलेले आहे. दोन्ही चित्रे समोरासमोर आहेत. त्या वेळी श्रीनिवास तेथेच काहीतरी करत होता. त्याचे आमच्या बोलण्याकडे लक्ष नव्हते. तो अकस्मात् म्हणाला, ‘‘दोघेही एकच आहेत. सारखेच आहेत.’’ मी त्याला विचारले, ‘‘कोण सारखेच दिसतात ? कोण एकच आहेत ?’’ त्या वेळी त्याची भावजागृती झाली होती. तो म्हणाला, ‘‘श्रीकृष्ण आणि परात्पर गुरुदेव एकच आहेत.’’ नंतर तो त्याच्या विश्वात रंगून गेला.

२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे सतत स्मरण करणे

मी सेवा करत असतांना श्रीनिवास प्रतिदिन माझ्या शेजारच्या आसंदीवर येऊन बसतो. एकदा तो असाच माझ्याजवळ येऊन बसला आणि आसंदीवर मान टाकून छताकडे एकटक पहात होता. त्याच्या डोळ्यांत अश्रू होते. त्याच्या डोक्यावरून हात फिरवत मी त्याला विचारले, ‘‘काय झाले ?’’ त्यावर तो मला म्हणाला, ‘‘काही नाही. परात्पर गुरुदेवांची आठवण आली.’’ कधीकधी तो आसंदीवर बसून समोरच्या पटलावर डोके ठेवतो आणि कुठेतरी पहात रहातो. तेव्हाही त्याच्या डोळ्यांत भावाश्रू असतात. त्याच्या मुखावरून त्याचा भाव जागृत झाल्याचे लक्षात येते. त्याही वेळी त्याला विचारल्यावर तो गुरुस्मरण करत असल्याचे सांगतो.

३. ‘नातेवाइकही मायेतील असून सत्य केवळ परात्पर गुरु डॉ. आठवले असल्याने त्यांना आवडेल, अशीच साधना करूया’,  असा विचार करणारा कु. श्रीनिवास !

एकदा श्रीनिवासची आई आणि मी प्रारब्ध, देवाण-घेवाण आणि माया इत्यादी विषयांवर बोलत होतो. श्रीनिवास तेथे बसून स्वभावदोष आणि अहं निर्मूलन यांची सारणी लिहित होता. दुसर्‍या दिवशी आमच्या वरील बोलण्याचा संदर्भ देत त्याने मला विचारले, ‘‘आजी, माझी आई आणि ताई (बहीण) मायाच आहे का ? मग मी त्यांचाही त्याग करायला हवा का ? म्हणजे केवळ परात्पर गुरुदेवच सत्य आहेत ! ते देवच आहेत.’’ त्याच्या या बोलण्यावर मी त्याला समजावून सांगितल्यावर तो मला म्हणाला, ‘‘आपण साधनाच पुष्कळ वाढवूया. परात्पर गुरुदेवांना आवडेल, अशीच साधना करूया.’’

४. आश्रमजीवनाशी लगेच जुळवून घेणे आणि साधनेत चुका झाल्यास त्या स्वीकारून आश्रमात रहाण्याविषयी आईला सांगणे

यवतमाळ येथून श्रीनिवास ४ मासांपूर्वी त्याची आई आणि बहीण यांच्या समवेत रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात आला. येथे आल्यानंतर तो दोनच दिवसांत आश्रमात रूळला. त्याने आश्रमजीवनाशी जुळवून घेतले. ‘त्याने चुका टाळाव्यात’, यासाठी आम्ही त्याला मधून मधून सतर्क करतो. त्यानुसार तो तसे प्रयत्नही करतो. एकदा तो त्याच्या आईला म्हणाला, ‘‘आई, चुका होऊ नयेत’, यासाठी आपण प्रयत्न करूया, तरीही चुका झाल्याच, तर आपण त्या स्वीकारू आणि एकमेकांशी बोलून योग्य ते प्रायश्चित्त ठरवू; पण आपण आश्रम सोडून जायचे नाही. येथेच राहूया.’’

५. स्वतःच्या स्वभावदोषांविषयी जागरूक असणे

ही सूत्रे टंकलेखन करत असतांना श्रीनिवास माझ्या शेजारी येऊन बसला. धारिकेतील काही भाग वाचल्यावर तो मला म्हणाला, ‘‘तू एवढे टंकलेखन केले; पण आजी, माझ्यात चार-पाचच गुण आहेत. माझ्यात स्वभावदोष अधिक आहेत. तू कशाला हे लिहून देते?’’ तेव्हा मी त्याला सांगितले, ‘‘अरे, तुझ्यातील गुण परात्पर गुरुदेवांचे आहेत. ते लिहून द्यायला हवेत आणि स्वभावदोष पुष्कळ काय ? एकच ‘न ऐकणे’, हा आहे. त्यावर प्रयत्न केले की झाले.’’ त्यावर श्रीनिवास म्हणाला, ‘‘त्या न ऐकण्यामुळे पुष्कळ काही होत आहे ना !’’ यातून ‘श्रीनिवासचे कौतुक केले, तरी त्याच्यात स्वकौतुकाच्या विचाराचा लवलेश नसतो, तसेच त्याला स्वतःच्या स्वभावदोषांची जाणीवही असते’, हे माझ्या लक्षात आले.

६. एका साधिकेला सेवा करण्यास साहाय्य करतांना स्वतःच्या मागे परात्पर गुरुदेव दिसणे आणि त्यानंतर सेवा सहजतेने अन् आनंदाने होणे

एकदा आश्रमाच्या प्रांगणात एक साधिका यज्ञकुंड परिसर सारवण्याची सेवा करत होती. ते पाहून श्रीनिवासच्या मनातही ‘त्या साधिकेला साहाय्य करावे’, असा विचार आला. ती सेवा करतांना शेणाचे पाणी घातलेले टोपले किंवा बालदी उचलतांना त्याला स्वतःच्या मागे परात्पर गुरुदेव दिसायचे. त्यामुळे त्याची भावजागृती होऊन त्याच्याकडून सेवा सहजतेने आणि आनंदाने झाली. ‘परात्पर गुरुदेव या सेवेत त्याला साहाय्य करत आहेत’, असा त्याचा भाव होता.’

– श्रीमती मेघना वाघमारे (श्रीनिवासची आजी (आईची आई), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२१.१२.२०२१)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.
  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक