इराणमध्ये बलुची तरुणीवर पोलीस अधिकार्‍याकडून बलात्कार

बलात्काराचा निषेध करणार्‍या बलुची लोकांवरील गोळीबारात ३६ जणांना मृत्यू

तेहरान (इराण) – इराणच्या जेहदान शहरात १५ वर्षीय बलुच मुलीवर झालेल्या बलात्काराच्या विरोधात ३० सप्टेंबर या दिवशी निदर्शने करण्यात आली. त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ३६ जणांचा मृत्यू झाला. शुक्रवारच्या नमाजानंतर बलुच समुदायाचे लोक रस्त्यावर आले आणि त्यांनी घोषणाबाजी केली. यानंतर पोलिसांनी गोळीबार केला. गेल्या आठवड्यात कर्नल इब्राहिम खूचाकजई या पोलीस कमांडरने या मुलीवर बलात्कार केला. इराणचे प्रमुख सुन्नी धर्मगुरू मौलवी अब्दुल हमीद यांनी या मुलीवर बलात्कार झाल्याला दुजोरा दिला आहे.

चाबहारमध्ये कर्नल इब्राहिम खूचाकजई हा हत्येच्या एका प्रकरणाचा अन्वेषण करत होता. पीडित महिला ही हत्या झालेल्या महिलेच्या शेजार्‍याची मुलगी आहे. कमांडरने या मुलीला चौकशीसाठी कार्यालयात बोलावून तेथे तिच्यावर बलात्कार केला. हे प्रकरण दडपण्यासाठी सुरक्षा दलांनी पीडितेच्या ३ नातेवाइकांचे अपहरण केले आणि पीडितेच्या कुटुंबियांना मुलीला काहीही झाले नसल्याचे वक्तव्य करण्यास भाग पाडले. तक्रार नोंदवू नये, यासाठी पीडितेच्या कुटुंबियांवर दबावही आणला; मात्र पीडितेच्या कुटुंबाने बलात्काराचा आरोप मागे घेतला नाही.