कैमूर (बिहार) येथील मुंडेश्‍वरी देवीच्या मंदिरात दिला जातो रक्तहीन बळी !

कैमूर (बिहार) येथील मुंडेश्‍वरी देवी मंदिर

कैमूर (बिहार) – येथील मुंडेश्‍वरी देवीच्या मंदिरात नवरात्रीमध्ये नवस फेडण्यासाठी बोकडाचा रक्तहिनबळी दिला जातो. म्हणजे बोकडाला ठार न मारता बळीची प्रक्रिया पूर्ण केली जाते. हे मंदिर अनुमाने ५ व्या शतकातील असल्याचे मानले जाते. मंदिर ६०० फूट उंच टेकडीवर आहे.
याविषयी मंदिराचे पुजारी पिंटु तिवारी यांनी सांगितले की, बोकडाला मंदिराच्या गर्भगृहात नेले जाते. गर्भगृहात मुंडेश्‍वरी देवीच्या मूर्तीच्या चरणाजवळ बोकडाला ठेवले जाते. तेथे मंत्रांचे पठण केले जाते, त्यानंतर बोकड बेशुद्ध होते. देवीची पूजा झाल्यानंतर बोकड स्वतःच जागे होते. नंतर हे बोकड पुन्हा आणलेल्या भक्ताकडे परत दिले जाते. एवढाच विधी बळी म्हणून पार पाडला जातो, म्हणजे बोकडाची हत्या केली जात नाही. अनेक भाविक बोकडाचा अशा प्रकारचा बळी दिल्यानंतर त्याला सोडून देतात, तर काही भाविक घरी नेऊन बळी देतात आणि नंतर प्रसाद म्हणून खातात. ही बळी प्रथा कधीपासून चालू झाली, याची माहिती येथे कुणालाच नाही.