हिंदु जनजागृती समितीची यशोगाथा

हिंदु जनजागृती समितीच्या स्थापनेला २६ सप्टेंबर २०२२ या दिवशी २० वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने…

हिंदु जनतेच्या हितासाठी कार्य करणार्‍या, तसेच हिंदु राष्ट्राची मागणी रुजवणार्‍या हिंदु जनजागृती समितीला २० वर्षे पूर्ण झाली. २० वर्षांपूर्वी, ७ ऑक्टोबर २००२ या दिवशी अर्थात् आश्विन शुक्ल प्रतिपदा म्हणजे नवरात्रीतील घटस्थापनेच्या शुभदिनी हिंदु जनजागृती समितीची स्थापना झाली. समिती धर्मजागृती, धर्मशिक्षण, हिंदूसंघटन, धर्मरक्षण आणि राष्ट्ररक्षण या ध्येयपूर्तीसाठी अविरतपणे कार्य करत आहे. या दृष्टीने २० वर्षांतील समितीच्या कार्याची यशोगाथा येथे मांडत आहे. २६ सप्टेंबर या दिवशी आपण ‘हिंदु जनजागृती समितीने हिंदूसंघटन, हिंदु राष्ट्राचा उद्घोष, राष्ट्ररक्षण, मानबिंदूंचे रक्षण आणि संस्कृतीरक्षण अन् तिला त्यात मिळालेले यश’ ही माहिती पाहिली. या अंकात समितीच्या अन्य कार्याची माहिती घेऊया.

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/615422.html

श्री. रमेश शिंदे

८. समाजसाहाय्य

सामाजिक दृष्टीकोनातूनही समिती विविध उपक्रम राबवते.

जलाशय रक्षणासाठी कडे करून उभे असलेले समितीचे कार्यकर्ते

८ अ. खडकवासला जलाशय रक्षण अभियान : रंगपंचमी आणि धुलीवंदन या दिवशी रंगाने माखलेले तरुण पुण्यातील खडकवासला जलाशयात अंघोळीसाठी येत असत. रासायनिक रंगांमुळे जलाशयाचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असे. ते रोखण्यासाठी समितीचे अनेक कार्यकर्ते प्रतिवर्षी खडकवासला जलाशयाच्या भोवती मानवी कडे करून थांबू लागले. प्रतिवर्षी होणार्‍या उपक्रमामुळे गेली २० वर्षे ‘खडकवासला जलायश रक्षण अभियान’ १०० टक्के यशस्वी होत आहे. पूर, भूकंपादी आपत्तींच्या वेळी आपत्तीग्रस्तांना साहाय्य करण्याचे उपक्रम समिती राबवते.

८ आ. सुराज्य अभियान : हिंदु राष्ट्र अर्थात् सुराज्य निर्मितीच्या दृष्टीने ‘सुराज्य अभियान’, तसेच ‘आरोग्य साहाय्य समिती’ या उपक्रमांच्या माध्यमातूनही समिती कृतीशील आहे. सुराज्य अभियानाच्या अंतर्गत पेट्रोलमधील भेसळीच्या विरोधात अभियान छेडले. धर्मादाय रुग्णालयांकडून दारिद्र्यरेषेखालील रुग्णांच्या होणार्‍या आर्थिक फसवणुकीच्या विरोधात आवाज उठवला. समितीने या विरोधात आवाज उठवल्यावर नियमभंग करणार्‍या रुग्णालयांवर कारवाई झाली. आरोग्य क्षेत्रात होणार्‍या भ्रष्टाचाराच्या विरोधातही समितीने अनेक आंदोलने केली.

८ इ. स्वसंरक्षण प्रशिक्षण उपक्रम : युवकांचे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक सामर्थ्य वाढवण्याच्या दृष्टीने स्वसंरक्षण प्रशिक्षण हा उपक्रमही समितीच्या वतीने मोठ्या प्रमाणात राबवला जात आहे. महिलांच्या सबलीकरणासाठी समितीची रणरागिणी शाखा कृतीशील आहे.

९. ‘ऑनलाईन’ उपक्रम

देवाच्या कृपेने कोरोनाच्या काळातही समितीच्या धर्मकार्यात खंड पडला नाही. वर्ष २०२० मध्ये ‘लॉकडाऊन’च्या म्हणजे दळणवळण बंदीच्या काळात जेव्हा प्रत्यक्ष बाहेर पडून कार्य करण्यास मर्यादा आल्या, तेव्हा समितीच्या ‘ऑनलाईन’ धर्मप्रसाराने जोर पकडला. ‘ऑनलाईन’ पद्धतीने कार्यक्रम कसे घ्यायचे ? धर्मप्रसार कसा करायचा ? याचे प्रशिक्षण आणि अनुभव नसतानांही अल्पावधीत समितीचे कार्य ऑनलाईन पद्धतीने वेगाने होऊ लागले. ऑनलाईन सत्संग शृंखलेच्या अंतर्गत चालू केलेले ४ कार्यक्रम आणि ‘चर्चा हिंदु राष्ट्र की’ हा विशेष संवाद आजही चालू आहे. संकेतस्थळ, यू-ट्यूब, ट्विटर आदी माध्यमांतून समितीचा विहंगम गतीने प्रसार चालू झाला आहे.
हिंदु जनजागृती समितीच्या ‘HinduJagruti.org’ या संकेतस्थळाची वाचकसंख्या प्रतिमास सव्वा लाख एवढी आहे, तसेच समितीच्या ‘यू-ट्यूब चॅनेल’ची दर्शकसंख्या १ लाख १० सहस्र, तर समितीच्या ट्विटर हँडलची सदस्य संख्या ५८ सहस्र इतकी आहे. यावरून समितीचे कार्य देश-विदेशांत झपाट्याने वाढत आहे, हेच दिसून येते. समितीच्या यू-ट्यूब चॅनेलचे १ लाख सदस्य झाल्यावर ‘यू-ट्यूब’ने समितीला ‘सिल्व्हर ट्रॉफी’ने सन्मानित केले.

९ अ. सामाजिक माध्यमे (सोशल मिडिया) : समितीने सामाजिक माध्यमांद्वारे (सोशल मिडियाद्वारे) आरंभलेल्या धर्मरक्षणाच्या मोहिमांना मिळालेले यश पुढीलप्रमाणे –

९ अ १. काश्मीरच्या समर्थनाचे ट्वीट मागे घेणे : काश्मीरला भारतापासून तोडण्यासाठी पाकिस्तानमध्ये ५ फेब्रुवारी हा दिवस ‘काश्मीर एकता दिवस’ म्हणून साजरा केला जातो. याला समर्थन म्हणून ‘पिझ्झा हट’, ‘ह्युंदाई मोटर्स’, ‘के.एफ्.सी. फूडस्’, ‘किया मोटर्स’ या आस्थापनांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर खात्यांवरून ‘ट्वीट’ करत पाकिस्तानचे समर्थन केले. या विरोधात समितीने ‘ट्विटर’वर मोठ्या प्रमाणात जनजागृती केली. लोकांचा वाढता रोष पहाता ‘ह्युंदाई मोटर्स’ आणि ‘के.एफ्.सी. फूडस्’ या आस्थापनांनी याविषयी क्षमा मागून त्यांनी केलेले ट्वीट मागे घेतले.

९ अ २. नाझी चिन्हाचा ‘स्वस्तिक’ असा उल्लेख टाळण्यास भाग पाडणे : कॅनडा सरकारने हिंदूंचे पवित्र प्रतीक असलेल्या ‘स्वस्तिक’ची तुलना नाझी प्रतिकाशी केली होती. या विरोधात समितीने कॅनडा सरकारला निवेदने पाठवली. ‘ऑनलाईन कॅम्पेन (चळवळ)’ राबवली. परिणामी कॅनडाच्या पंतप्रधानांनी नाझी प्रतिकाचा ‘स्वस्तिक’ असा उल्लेख करणे थांबवले.

१०. समारोप

आतापर्यंत जे काही यशाचे प्रसंग येथे नमूद केले, ते थोडके आणि महत्त्वाचे होते. या व्यतिरिक्तही कित्येक घटनांमध्ये समितीला यश मिळाले. धर्मकार्य करतांना समितीचे शेकडो कार्यकर्ते ‘धर्माे रक्षति रक्षितः ।’ अर्थात् जो धर्माचे रक्षण करतो, त्याचे धर्म म्हणजे ईश्वर रक्षण करतो, याची अनुभूती घेत आहेत. खरे तर, हिंदु राष्ट्राची स्थापना हा मार्ग सहजसोपा नसून या मार्गांत अनेक काटे आहेत, अडथळे आहेत; पण भगवंताच्या कृपेमुळे धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र स्थापनेच्या मार्गात समितीला यशप्राप्तीरूपी काही फुले वाट्याला आली. त्यासाठी भगवान श्रीकृष्णाच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहोत. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी समर्पित भावाने अविरतपणे कार्य करण्याची प्रेरणा, शक्ती आणि बुद्धी भगवंताने प्रदान करावी, अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना ! (सप्टेंबर २०२२)           (समाप्त)

– श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती.