हिंदु जनजागृती समितीची यशोगाथा

आज घटस्थापनेच्या शुभदिनी (२६ सप्टेंबर या दिवशी) असलेल्या हिंदु जनजागृती समितीच्या द्विदशकपूर्तीच्या निमित्ताने…

हिंदु जनतेच्या हितासाठी कार्य करणार्या, तसेच हिंदु राष्ट्राची मागणी रुजवणार्या हिंदु जनजागृती समितीला २० वर्षे पूर्ण झाली. २० वर्षांपूर्वी, ७ ऑक्टोबर २००२ या दिवशी अर्थात् आश्विन शुक्ल प्रतिपदा म्हणजे नवरात्रीतील घटस्थापनेच्या शुभदिनी हिंदु जनजागृती समितीची स्थापना झाली. समिती धर्मजागृती, धर्मशिक्षण, हिंदूसंघटन, धर्मरक्षण आणि राष्ट्ररक्षण या ध्येयपूर्तीसाठी अविरतपणे कार्य करत आहे. या दृष्टीने २० वर्षांतील समितीच्या कार्याची यशोगाथा येथे मांडत आहे. २५ सप्टेंबर या दिवशी आपण ‘हिंदु जनजागृती समितीने धर्मरक्षण आणि धर्मजागृती यांसाठी राबवलेले उपक्रम अन् तिला मिळालेले यश’ ही माहिती पाहिली. या अंकात समितीच्या अन्य कार्याची माहिती घेऊया.

३. हिंदूसंघटन

३ अ. हिंदु राष्ट्र-जागृती सभा : जात-पात-पक्ष-संप्रदाय विरहित हिंदूंचे एक विशाल संघटन उभे रहावे; यासाठी समितीने खेडेगावांपासून महानगरांपर्यंत १ सहस्र ३०० हून अधिक ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभा’ घेतल्या. या सभा राजकीय पक्षांसारख्या आमिषे दाखवणार्या नव्हत्या, तर हिंदूंना धर्म आणि राष्ट्र रक्षणासाठी त्याग करायला उद्युक्त करणार्या होत्या. या सभांच्या परिणामस्वरूप सहस्रो युवक धर्मकार्याशी जोडले गेले आहेत. सभांतून कृतीशील होणारे शेकडो धर्मप्रेमी आज समितीच्या वतीने प्रत्येक आठवड्याला घेतल्या जाणार्या धर्मशिक्षण वर्गांना उपस्थित राहून ‘धर्म काय सांगतो ?’, हे जाणून घेत आहेत. आज ११ राज्यांमध्ये
३२५ हून अधिक ठिकाणी धर्मशिक्षणवर्ग घेतले जातात.

३ आ. अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन : गोव्यामध्ये ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनां’च्या माध्यमातून हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे संघटन करण्याचे कार्य समिती करत आहे. देशभरातील जवळपास २५० हून अधिक संघटनांचे नेते, कार्यकर्ते आणि अधिवक्ते या अधिवेशनाच्या माध्यमातून धर्मकार्याची दिशा ठरवून कालबद्ध प्रयत्न करत आहेत. हे अधिवेशन म्हणजे हिंदु राष्ट्राचा आवाज बुलंद करणारे एक व्यासपीठ बनले आहे.

४. हिंदु राष्ट्राचा उद्घोष

जेव्हा ‘हिंदु राष्ट्र’ हा शब्दही उच्चारणे धाडसाचे होते, अशा काळात विरोधकांना न जुमानता समितीने हिंदु राष्ट्राचा उद्घोष केला. व्याख्याने, मेळावे, परिसंवाद, लेख, चर्चासत्र, ग्रंथ आदींच्या माध्यमांतून हिंदु राष्ट्राची संकल्पना सुस्पष्टपणे जनसामान्यांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला. आज यत्र-तत्र-सर्वत्र हिंदु राष्ट्राची चर्चा होत आहे. ‘हिंदु राष्ट्र पे चर्चा’ घडवण्यात समितीचे योगदान आहे, याचे आम्हाला समाधान आहे. आता धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदु धर्मप्रेमींनी झोकून देऊन प्रयत्न करायचे आहेत.

श्री. रमेश शिंदे

५. राष्ट्ररक्षण

५ अ. प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांवर बंदी : राष्ट्रीय अस्मितांचा सन्मान राखला जाण्याच्या दृष्टीने समितीने ‘राष्ट्रध्वजाचे विडंबन रोखा’, हा उपक्रम मोठ्या प्रमाणात राबवला. राष्ट्रीय सणांच्या दिवशी राष्ट्रध्वज रस्त्यावर पडलेले आढळून येतात आणि त्यांची विटंबना होते. ते होऊ नये; म्हणून वर्ष २०११ मध्ये प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाच्या विक्रीवर बंदी आणली गेली, ती समितीने याविषयी केलेल्या याचिकेमुळेच आली होती. या व्यतिरिक्त समितीने भारताच्या नकाशाच्या विकृतीकरणाच्या विरोधातही आंदोलने छेडून संबंधितांना भारताचा योग्य नकाशा छापण्यास बाध्य केले.

५ आ. फॅक्ट प्रदर्शन : आज ‘काश्मीर फाइल्स’ या सिनेमाविषयी चर्चा होत असली, तरी काश्मिरी हिंदूंचा आक्रोश आणि वेदना सर्वत्रच्या हिंदूंपर्यंत पोचाव्यात, यासाठी समितीने वर्ष २००७ पासून ‘फॅक्ट’ प्रदर्शनांच्या माध्यमातून जागृती करण्यास आरंभ केला होता. काश्मिरी हिंदूंच्या समर्थनार्थ देशभर ‘एक भारत अभियान’ राबवले. काही वर्षांपूर्वी काश्मीरला उर्वरित भारतापासून वेगळे करणारे कलम ३७० रहित झाले, त्यामध्ये या जनजागृतीचाही वाटा आहे, हे अमान्य करता येणार नाही.

६. मानबिंदूंचे रक्षण

६ अ. इतिहासाचे विकृतीकरण रोखणे : स्वातंत्र्योत्तर काळात खरे तर गुलामीच्या मानसिकतेतून बाहेर पडून हिंदूंच्या शौर्याचा इतिहास शिकवला जाणे अपेक्षित होते; मात्र पाठ्यपुस्तकांमध्ये परकीय आक्रमकांचा अधिक, तर हिंदु विरांचा त्रोटक इतिहास शिकवला जात होता. गोव्यात ‘एन्.सी.ई.आर्.टी.’च्या अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास केवळ ५ ओळींत शिकवला जात होता. याविषयी समितीने आंदोलन केल्यानंतर आज शाळांमधून छत्रपती शिवाजी महाराजांचा ५ पानांचा इतिहास शिकवला जाऊ लागला.

६ आ. गड-दुर्ग आणि ऐतिहासिक स्मारके यांचे जतन : गड-दुर्गांवरील इस्लामी अतिक्रमणे हटवण्याच्या आणि गड-दुर्गांचे पावित्र्य राखण्याच्या समितीच्या अभियानालाही भगवंताच्या कृपेने यश मिळाले. विशाळगडावरील अतिक्रमणे हटवण्यासाठी जिल्हाधिकार्यांच्या समवेत बैठका झाल्या असून त्याची प्रशासकीय चौकशीही चालू झाली आहे, तर सिंहगडावर निकृष्ट दर्जाचे काम करणार्या कंत्राटदारांना शासनाने समितीच्या आंदोलनानंतर काळ्या सूचीत टाकले. अशाच प्रकारे जळगाव जिल्ह्यातील ‘पांडववाडा’ हिंदूंसाठी खुला करण्यातही समितीला यश मिळाले. पोर्तुगिजांच्या हिंदूंवरील अमानुष अत्याचारांचा साक्षीदार असलेल्या गोव्यातील ऐतिहासिक ‘हातकातरो खांबा’चे मूळ जागेपासून स्थलांतर होऊ न देण्यातही समितीला यश लाभले.

७. संस्कृतीरक्षण

अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात हिंदु राष्ट्राचा जयघोष करतांना हिंदुत्वनिष्ठ

७ अ. ‘सनबर्न’ला विरोध : ‘सनबर्न’सारख्या विकृत कार्यक्रमांच्या विरोधात समितीने वर्ष २०१४ पासून मोठ्या प्रमाणात जनआंदोलन उभे केले. नाच-गाण्यांच्या नावाखाली ‘सनबर्न’मध्ये अमली पदार्थांना प्रोत्साहन दिले जात होते. समितीच्या आंदोलनामुळे पुणे आणि गोवा येथून ‘सनबर्न’च्या आयोजकांना गाशा गुंडाळावा लागला, तसेच नियमबाह्य कृती केल्याने त्यांना मोठा आर्थिक दंडही झाला.

७ आ. ‘डे’ पद्धतीला विरोध : या जोडीला ख्रिस्ती नववर्ष १ जानेवारी, व्हॅलेंटाईन डे यांसारख्या दिवसांनाही समितीने शास्त्रीय पद्धतीने विरोध करून जनप्रबोधन केले. सण-उत्सवांमध्ये शिरलेले अपप्रकार दूर होऊन ते भक्तीभावाने आणि शास्त्रीय पद्धतीने साजरे व्हावेत, यासाठी समितीने प्रबोधन मोहीम राबवली. परिणामी आज तरुणांमध्ये सांस्कृतिक अभिमान वाढून धर्मशास्त्रानुसार सण-उत्सव साजरे करण्याचे प्रमाण वाढत आहे.

७ इ. कागदी लगद्याच्या श्री गणेशमूर्तींना प्रोत्साहन देण्याच्या शासननिर्णयावर स्थगिती : काही वर्षांपूर्वी अंनिसच्या दबावाला बळी पडून सरकारने गणेशोत्सवात कागदी लगद्याच्या श्री गणेशमूर्तींना प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला. वास्तविक शाडू मातीच्या श्री गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करणे आणि तिचे वहात्या पाण्यात विसर्जन करणे, अशी आपली परंपरा आहे; पण वैज्ञानिक दृष्टीकोनाच्या नावाखाली हिंदूंच्या धर्माचरणावर गदा यावी, यासाठी अंनिस प्रयत्नशील होती. त्या वेळी समितीने या संदर्भात सखोल अभ्यास केला, वैज्ञानिक प्रयोगशाळेतून चाचण्या केल्या आणि संशोधनाअंती ‘कागदी लगद्याच्या श्री गणेशमूर्तींच्या विसर्जनामुळे जलप्रदूषण होते’, हे सिद्ध झाले. परिणामी, कागदी लगद्याच्या श्री गणेशमूर्तींना प्रोत्साहन देण्याच्या शासननिर्णयाला स्थगिती मिळाली आणि अंनिसची वैज्ञानिक भोंदूगिरी समितीने उघडी पाडली.

(क्रमश:)

या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/615571.html

– श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती (सप्टेंबर २०२२)