अमली पदार्थांचे उत्पादक, व्यावसायिक आणि ग्राहक मिळून अंदाजे दीड सहस्र लोक या व्यवहारात सहभागी ! – भाग्यनगर पोलीस

अमली पदार्थ

पणजी, २५ सप्टेंबर (वार्ता.) – भाग्यनगर पोलीस अमली पदार्थ व्यवसायाची पाळेमुळे नष्ट करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून सक्रीय झाल्याने गोव्यातील अमली पदार्थ व्यावसायिकांचे धाबे धणाणले आहेत. भाग्यनगर पोलिसांच्या ‘अमली पदार्थ अंमलबजावणी विभागा’ने गोव्यातील ३ अमली पदार्थ व्यावसायिकांना कह्यात घेतले आहे. भाग्यनगर पोलिसांच्या मते विकास नाईक, रमेश चौहान, एडविन न्युनीस (कुप्रसिद्ध ‘कर्लिस’ उपाहारगृहाचा मालक), संजा गोवेकर, स्टीव्हन डिसोझा (‘हिली टॉप’ उपाहारगृहाचा मालक), तुकाराम साळगावकर, प्रीतेश बोरकर आणि मन्सूर अहमद हे गेल्या ८ वर्षांपासून हणजुणे, भाग्यनगर आणि आंध्रप्रदेश येथील अमली पदार्थ व्यवहारात गुंतले आहेत. अमली पदार्थाचे उत्पादक, व्यावसायिक आणि सेवन करणारे ग्राहक मिळून सुमारे दीड सहस्र लोक या व्यवहारामध्ये गुंतल्याचा भाग्यनगर पोलिसांचा दावा आहे.

कोरोनाबाधित असल्याचे खोटे प्रमाणपत्र दिल्याने एडविन न्युनीसच्या विरोधात नव्याने गुन्हा नोंद

एडविन न्युनीस याने पोलिसांची कारवाई टाळण्यासाठी कोरोनाबाधित झाल्याचे बनावट प्रमाणपत्र दिल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी हणजुणे पोलिसांनी त्याच्या विरोधात नव्याने गुन्हा नोंदवला आहे. भाग्यनगर पोलीस एडविन न्युनीस याला कह्यात घेण्यासाठी सध्या गोव्यात आहेत. त्याने भाग्यनगर येथे नामपल्ली न्यायालयात केलेला अटकपूर्व जामिनासाठीचा अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. न्यायालयाच्या या निर्णयाला न्युनीस तेथील उच्च न्यायालयात आव्हान देण्याची शक्यता आहे. भाग्यनगर पोलिसांच्या मते एडवीन न्युनीस अमली पदार्थ व्यावसायिक आणि ग्राहक मिळून एकूण ६०० लोकांशी संपर्कात आहे.

पोलिसांची कारवाई टाळणारा एडवीन कुटुंबासमवेत वाढदिवसाच्या कार्यक्रमाला उपस्थित

एडवीन न्युनीस सध्या पसार असल्याचा दावा गोवा पोलीस करत असले, तर एडवीन न्युनीस याने गेल्या आठवड्यात घरातील एका वाढदिवसाच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावल्याचे छायाचित्र समोर आले आहे.