मंगळुरू येथील मंदिरांमध्ये दर्शनापूर्वी सदरा आणि बनियन काढून ठेवण्याच्या प्रथेवर आक्षेप

दक्षिण कन्नड जिल्ह्यातील कुक्के सुब्रह्मण्य आणि उडुपीच्या कोल्लुरू मंदिरांच्या विरोधात धर्मादाय विभागाकडे तक्रार


मंगळुरू (कर्नाटक) – मंदिरांमध्ये दर्शनाच्या आधी पुरुषांनी सदरा आणि बनियन काढून ठेवण्याची प्रथा कर्नाटक राज्यातील काही मंदिरांमध्ये आहे. दक्षिण कन्नड जिल्ह्यातील कुक्के सुब्रह्मण्य आणि उडुपी येथील कोल्लुरू मंदिरांमध्ये अशी प्रथा आहे. याच्या विरोधात मंगळुरू येथील ‘राष्ट्रीय परिसर संरक्षणा वक्कुट’ या संघटनेने धर्मादाय विभागाकडे लेखी तक्रार केली आहे.

या तक्रारीत म्हटले आहे, ‘सदरा आणि बनियन काढून देवाचे दर्शन घेण्याची पद्धत योग्य नाही. (पद्धत योग्य कि अयोग्य हे ठरवण्याचा अधिकार हिंदूंच्या धर्माधिकार्‍यांना आहे ! – संपादक) हिंदूंमध्ये अशी पद्धत नाही. या आचरणातून भक्तांमध्ये गोंधळ निर्माण होत आहे. चर्मरोग (त्वचारोग) असणारे सदरा काढून जात असल्याने इतरांना त्याचा संसर्ग होऊ शकतोे. (या प्रथेमुळे किती जणांना संसर्ग झाला, याची काही माहिती संघटनेकडे आहे का ? ‘हिंदूंची प्रथा नष्ट करण्यासाठी मुद्दामहून अशी कारणे दिली जात आहेत’, हे हिंदू जाणून आहेत ! – संपादक) अशा प्रकारची प्रथा हे भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत हक्कांचे स्पष्ट उल्लंघन आहे.

मंदिरात लागू करण्यात आलेल्या कपडे काढण्याची सूचना देणारे मंडळ विसर्जित करण्यात यावे. धर्मादाय विभागाने लक्ष न दिल्यास पुढे कायदेशीर लढा देण्याचा विचार केला जाईल.

पुढील धार्मिक परिषदेच्या बैठकीत चर्चा केली जाईल ! राज्य धार्मिक परिषद

या तक्रारीविषयी राज्य धार्मिक परिषदेचे सदस्य कशेकोडी सूर्यनारायण भट यांनी म्हटले की, ‘राष्ट्रीय परिसर संरक्षणा वक्कुट’ याच्याकडून तक्रार आली आहे. त्यावर पुढील राज्य धार्मिक परिषदेच्या बैठकीत चर्चा करण्यात येईल. ही प्रथा काही वर्षांपासूनची आहे. सर्वच प्रथा वेगवेगळी कारणे देऊन रहित करत आलो, तर पुढे धर्माचरणाच्या सर्वच थांबतील. काही प्रथांविषयी शास्त्रांमध्ये उल्लेख आहे. ‘मंदिरांमध्ये तोकडे कपडे घालू नयेत’, असे शास्त्र आहे; म्हणून तोकडे कपडे घालून येणार्‍यांना मंदिरात प्रवेश दिला जात नाही.

संपादकीय भूमिका

  • हिंदूंच्या प्रथा परंपरांवर आक्षेप घेणारे अन्य पंथियांच्या कुप्रथांवर कधी आक्षेप घेतात का ?
  • हिंदू या प्रथांचे श्रद्धेने पालन करतात. त्याला विरोध करणार्‍यांना हिंदूंनी वैध मार्गाने जाब विचारावा !