सप्तर्षींनी अनेक नाडीपट्टी वाचनांतून श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्यातील अवतारी देवीतत्त्वाचा वर्णिलेला महिमा !

१. सध्या पृथ्वीवर तीन अवतार असल्याने देवादिकांची दृष्टी पृथ्वीकडे असणे

‘सध्या पृथ्वीवर ‘सच्चिदानंद परब्रह्म श्रीजयंत’, ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ’ आणि ‘श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ’ हे तीन अवतार असल्याने देवता, ब्रह्मांडातील सर्व नक्षत्रे, पंचमहाभूते, पंचाग्नी, सूर्य, चंद्र आणि ८८ सहस्र ऋषिमुनी या सर्वांची दृष्टी पृथ्वीकडे आहे.’ (सप्तर्षी जीवनाडीपट्टी वाचन क्र. १४३, १३.५.२०२०)

२. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई यांच्यामध्ये ‘महासरस्वती’, ‘महाकाली’ आणि ‘महालक्ष्मी’ ही तिन्ही तत्त्वे !

‘श्रीविष्णूची लीला अगाध आहे. ‘श्रीविष्णूने समुद्रामध्ये मीठ कसे निर्माण केले ? डोळ्यांमध्ये अश्रू आल्यावर त्या अश्रूंना खारट चव कशी निर्माण केली ?’, हे जसे रहस्य आहे, तसे श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे रहस्य कळू शकत नाही. ‘श्रीसत्‌शक्ति’ यांच्यामध्ये ‘महासरस्वती’, ‘महाकाली’ आणि ‘महालक्ष्मी’ ही तिन्ही तत्त्वे आहेत. येणार्‍या काळात श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ ‘देवी’ म्हणूनच ओळखल्या जाणार आहेत. त्यांचे सौंदर्य विलक्षण आणि दैवी आहे. ते मानवी सौंदर्य नव्हे !’ (सप्तर्षी जीवनाडीपट्टी वाचन क्र. १४३, १३.५.२०२०)

३. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे दैवी अन् दिव्य नाते !

अ. ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ या शंखचक्रधारी श्रीमन्नारायण सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे स्वरूप आहेत.

आ. गुरुदेवांना जर सुवर्णाचे अलंकार घातले, तर त्यातील सुवर्ण म्हणजे श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ होय !

इ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या मनातील विचार (इच्छाशक्ती), म्हणजे श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ होय !

ई. गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) जर वृक्ष आहेत, तर श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ, म्हणजे त्या वृक्षाचे ‘फळ’ होय !

उ. श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या माध्यमातून सनातन संस्थेला कार्यासाठी सहस्रो साधक मिळाले आहेत.

४. आदिशक्ति जगदंबास्वरूप श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ !

अ. श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ म्हणजे साक्षात् ‘भूमी’ आहेत. आदिशक्ति जगदंबा श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या माध्यमातून पृथ्वीवर छायारूपाने वास करत आहे. या आदिशक्ति जगदंबेचे मूळ स्वरूप केवळ अग्निनारायणालाच ठाऊक आहे.

आ. श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्यात श्रीलक्ष्मीचे तत्त्व अधिक प्रमाणात आहे. अशा महालक्ष्मीस्वरूप श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्यावर जे मिथ्या आरोप करतील किंवा त्यांची निंदा करतील, त्यांना आदिशक्ति जगदंबा वेळ आल्यावर धडा शिकवील !’

(सप्तर्षी जीवनाडीपट्टी वाचन क्र. १४७, १६.६.२०२०)

५. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्यातील देवत्व !

‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ ज्यांना प्रसादस्वरूप कुंकू किंवा विभूती देतील’, त्या जिवांना एकप्रकारे आदिशक्ति जगदंबेचाच आशीर्वाद प्राप्त होईल ! यापुढे पृथ्वीवरील अनेक जिवांना स्वप्नदृष्टांत आणि अनुभूती यांद्वारे श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्यातील देवत्व लक्षात येणार आहे.’ (सप्तर्षी जीवनाडीपट्टी वाचन क्र. १४५, १७.५.२०२०)

६. माऊलीस्वरूप श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ !

आईच्या दुधात जशी भेसळ करता येत नाही, तसे कितीही संकटे आली, तरी ‘उत्तरापुत्री’ यांच्यातील आदिशक्तीचे तत्त्व भेसळ होणारे नाही. आईमध्ये जसे मुलाप्रती प्रेम, करुणा, शिस्तप्रियता, कर्तव्यदक्षता इत्यादी गुण आढळतात, त्याचप्रमाणे ‘उत्तरापुत्री’मध्ये साधकांप्रती प्रेम, करुणा, शिस्तप्रियता आणि कर्तव्यदक्षता हे गुण आहेत.’ (‘महर्षी नाडीपट्टी वाचनात श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचा उल्लेख ‘उत्तरापुत्री’ असा करतात; कारण त्यांचे जन्मनक्षत्र उत्तराफाल्गुनी आहे.’ – संकलक) (सप्तर्षी जीवनाडीपट्टी वाचन क्र. १९८, १५.४.२०२२)

७. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी रामनाथी आश्रमात निष्ठेने केलेल्या पूजेमुळे सर्व साधकांचे रक्षण झाले !

‘उत्तरापुत्री’ने रामनाथी आश्रमात निष्ठेने केलेल्या पूजेमुळे कोरोना महामारीच्या काळात सर्व साधकांचे रक्षण झाले.’ (सप्तर्षी जीवनाडीपट्टी वाचन क्र. १७०, १३.२.२०२१)

८. ‘उत्तरापुत्री’च्या गुरूंवरील अखंड श्रद्धेमुळे हिंदु राष्ट्राची स्थापना सत्वर होणार आहे’, यात काहीच शंका नाही !’

(सप्तर्षी जीवनाडीपट्टी वाचन क्र. २१०, १८.९.२०२२)

९. ‘उत्तरापुत्री’च्या मुखदर्शनासाठी जगातील अनेक देशांतून साधक-जीव आश्रमात येतील !

‘येणार्‍या काळात ‘उत्तरापुत्री’च्या मुखदर्शनासाठी जगातील अनेक देशांतून साधक-जीव रामनाथी आश्रमात येतील. त्या जिवांना ‘आम्हाला श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचा आशीर्वाद मिळाला, तरी पुरे आहे, आणखी वेगळे काही नको’, असे वाटेल.’ (सप्तर्षी जीवनाडीपट्टी वाचन क्र. १७७, ३१.३.२०२१)

– श्री. विनायक शानभाग (वय ३९ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६७ टक्के), चेन्नई, तमिळनाडू. (१८.९.२०२२)

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांची महानता !

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ
श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

१. सप्तर्षी नाडीवाचनात श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई यांच्याविषयी सांगत असतांना ‘त्या स्थानी साक्षात् देवलोकच प्रकट झाला आहे’, असे वाटणे

‘मी नाडीवाचनाला महर्षींच्या समोर बसलेली असते. त्या वेळी महर्षि आत्यंतिक प्रेमाने श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्याविषयी वाचन करत असतात. ते तेवढ्याच अभिमानाने श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई यांच्यातील गुणांचे वर्णन करत असतात. ते ऐकत असतांना माझीही भावजागृती होत असते. ‘त्या वेळी त्या ठिकाणी साक्षात् देवलोकच प्रकट झाला आहे’, असे मला वाटते.

२. महर्षींच्या मनात पुष्कळ प्रेम निर्माण करणे, यातच श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या कार्याचे मोठेपण दडलेले असणे

‘उत्तरापुत्री’ म्हणून महर्षि इतक्या वात्सल्याने ताईंना (श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना) हाक मारत असतात की, ऐकणार्‍याला जणूकाही वाटते, ‘ताई येथेच उभ्या आहेत.’ ‘महर्षींच्या मनात स्वतःविषयी एवढे प्रेम निर्माण करणे’, यातच ताईंच्या कार्याचे मोठेपण दडलेले आहे. ‘स्वतः सप्तर्षींनी ताईंच्या कार्याची नोंद घ्यावी आणि त्यांच्यातील देवत्वाचा महिमा गावा, यापुढे आपण पृथ्वीवरील पामर जीव काय सांगणार ? तसे पहायला गेले, तर ताईंचे स्थुलातील कार्य पुष्कळ मोठे आहे, ते कागदावर मावण्याएवढे नाही. सूक्ष्मातील त्यांचे कार्य केवळ सप्तर्षी आणि श्रीगुरूच सांगू शकतात; परंतु आपण एवढेच करू शकतो की, ताईंमधील देवीतत्त्वाच्या चरणी समर्पणभावाने कोटीशः प्रणाम करू शकतो.

३. ‘माऊली’ रूपात साधकांवर निरपेक्ष प्रेम करणार्‍या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ !

ताई, सप्तर्षींनी वर्णन केल्याप्रमाणे तुम्ही जरी ‘श्रीसत्‌शक्ति’ आहात, ‘श्री महालक्ष्मीच्या अंश’ आहात, तरीही तुम्ही आमच्या ‘अगदी जवळच्या बिंदाताई’च आहात. आध्यात्मिक अधिकाराने कितीही मोठ्या असलात, तरी मूल आपल्या आईला ‘आई’ म्हणूनच हाक मारते. ती कितीही रागावली, तरी तिलाच जाऊन बिलगते. तिलाच बोबडे बोल ऐकवते. तसेच काहीसे आमचे झाले आहे. आईची एकच प्रेमळ दृष्टी मुलाला क्षणात सर्वकाही देऊन टाकते. तशाच तुम्ही आमच्यासाठी आहात ताई !

आईच्या प्रेमाने सर्वांवर निरपेक्ष प्रेम करणार्‍या, सर्वांना आध्यात्मिक आधार देणार्‍या आणि देवीस्वरूप असणार्‍या साक्षात् श्रीसत्‌शक्तिच्या चरणी आम्हा सर्वांचे शतशः नमन ! ‘या कलियुगात आम्हाला आपल्यापासून कधीच अंतर देऊ नये’, ही आपल्या वाढदिवसाच्या दिवशी आम्हा लेकरांची कळकळीची प्रार्थना आहे !’

– श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ, चेन्नई, तमिळनाडू. (१८.९.२०२२)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.