आत्मोद्धारक भगवद्गीता अनुसरा !

श्रीकृष्णाने भगवद्गीता सांगितली, हे सर्वांना ठाऊक आहे; पण ‘ती आचरणात किती जणांनी आणली ?’, याचे उत्तर देणे अवघड आहे; कारण ती आचरणात कशी आणावी, याचे ज्ञानच भारतियांना नाही. शालेय जीवनात भगवद्गीतेचे शिक्षण दिले न गेल्याने सर्व भारतीय त्यापासून वंचित आहेत. अशा स्थितीतच हिंदुत्वासाठी एक आशेचा किरण दिसला आहे, तो कर्नाटक राज्याच्या निर्णयाच्या माध्यमातून ! तेथील शाळांमध्ये येत्या डिसेंबरपासून नैतिक शिक्षणाच्या अंतर्गत ‘श्रीमद्भगवद्गीता’ शिकवण्यात येणार आहे. ‘या संदर्भात कर्नाटक राज्याचा आदर्श अन्य राज्यांनीही घ्यावा’, असे गीताप्रेमींना वाटते. गीता शिकवण्यात येणार, म्हणजे विरोध हा होणारच ! हे अध्यारुत होते. नेहमीप्रमाणे मुसलमानांनी कुराणचा संदर्भ देत विरोध केला; पण शिक्षणमंत्री बी.सी. नागेश यांनी गीता अणि कुराण यांतील भेद सांगत गीतेचे समर्थन केले. गीता शिकवण्याचे ठरल्यावर अन्य धर्मीय आपापले धर्मग्रंथ शिकवण्याचा आग्रह धरतात; पण अन्य धर्मग्रंथ आणि भगवद्गीता यांत पुष्कळ भेद आहे. गीता ना कुणाचे चरित्र सांगते, ना कुठल्याही चमत्कारांचे वर्णन करते ! ती कुठल्याही मंत्राचा आग्रह धरत नाही किंवा गीतेची पारायणेही करायला सांगत नाही. कुठलेही स्थानमाहात्म्य किंवा तीर्थयात्रा करण्यासही सांगत नाही. गीतेमध्ये कुठले फतवे किंवा आज्ञाही नाहीत.

गीतेचा विदेशी गौरव !

गीतेचे देशोदेशींच्या विद्वानांनी भाषांतर केलेले आहे. त्यात शेख अबुल रहमान चिश्ती (फारसी), फ्रेंच विद्वान डुपर (फ्रेंच), जर्मन महाकवी आगस्ट विल्हेम श्लेगल (जर्मन आणि लॅटिन), जर्मन विद्वान एम्.ए. श्रेडर, अमेरिकेचे भारतात येऊन गेलेले न्यायाधीश आणि लेखक ‘विन्थौप सार्जेट’, तसेच डॉ. ॲनी बेझंट यांचा समावेश आहे. ‘देवीदासी’ या अमेरिकी वंशाच्या महिलेने गीतेचे ८७ भाषांत भाषांतर करून त्यासाठी ग्रंथालय उभारले. ही आहे गीतेची महानता ! त्यात सांगितलेले जीवनाचे मर्म आणि तत्त्वज्ञान विदेशींना भावले. त्यामुळे त्यांनी या ग्रंथाचा प्रसार केला !

अमेरिकेत तुलसी गबार्ड यांनी संसदेत गीतेवर हात ठेवून शपथ घेतली. जर्मनीसह अन्य देशांमध्ये केवळ एकदा-दोनदा नव्हे, तर अनेकदा गीतेची पारायणे केली जात आहेत. सर्वत्र गीतेचा प्रसार करणार्‍या ‘हरे रामा हरे कृष्णा’ संप्रदायाची जगभरात ८०० हून अधिक मंदिरे असून त्यांचे लक्षावधी अनुयायीही आहेत. तेसुद्धा गीतेचा प्रसार करतात. जर्मनीसह विदेशात गीतेच्या पुस्तकांची विक्री आणि प्रसार केला जातो. अमेरिकेतील तत्त्ववेत्ता थोरो म्हणतो, ‘गीतेशी तुलना केल्यावर विश्वातील संपूर्ण आधुनिक ज्ञान मला तुच्छ वाटते.’ ‘गीतेचा उपदेश अद्वितीय आहे’, असे भारताचे माजी व्हाइसरॉय वॉरेन हेस्टिंग्स यांचे मत होते. ‘विश्वात जितके ग्रंथ आहेत, त्या सर्वांमध्ये भगवद्गीतेसारखे सूक्ष्म आणि उन्नत विचार कुठेही मिळत नाहीत’, असे गौरवोद्गार जर्मनीतील डॉ. विल्हेल्म फान हुबोल्ट यांनी काढले. जर्मनीतील एक अभ्यासक सापानहार हे गंभीर आणि उदासीन स्वभावाचे होते. ते कधीच हसत नसत; परंतु भगवद्गीता वाचून तिचा अभ्यास केल्यावर ते भगवद्गीता डोक्यावर घेऊन नाचले ! जे विदेशींना समजते, ते भारतियांना समजत नाही, हेच आजचे दुर्दैव म्हणावे लागेल. विदेशात गीतेचा उदोउदो केला जातो; पण ज्या भारतात तिचा जन्म झाला, तेथेच तिची अवहेलना केली जाते. गीतेचे आचरण करून त्यानुसार अवलंब करण्याचा प्रयत्न भारतीय कधी करतील ? विदेशींनी भारतात येऊन ‘गीता अनुसरा’, असे सांगण्याची भारतीय वाट पहात आहेत का ? अजूनही वेळ गेलेली नाही. गीतेविषयी ज्ञान घ्या आणि त्यानुसार अनुसरण करून मनुष्यजीवनाचे कल्याण साध्य करा !

गीतेतून नैतिकता साध्य !

कर्नाटकच्या शिक्षणमंत्र्यांनी म्हटले, ‘गीता नैतिकतेचे ज्ञान देते.’ आज नैतिकतेचे धडे कुणीतरी देते का ? अनैतिकतेचेच स्तोम आज पुष्कळ वाढल्याने कुणाचेच जीवन आदर्श ठरत नाही. सर्वत्र भ्रष्टाचार, आत्महत्या, बलात्कार, खून, मारामार्‍या, अपहरण, अपघात या घटनाच दिवसेंदिवस वाढत आहेत. अशा प्रतिकूल स्थितीत आदर्श आणि सुखी जीवन जगण्याची एकमेव गुरुकिल्ली आपल्याजवळ आहे, ती म्हणजे भगवद्गीता ! साक्षात् भगवान श्रीकृष्णाच्या मुखातून प्रगट झालेली गीता आत्मप्राप्तीचा मार्ग सांगते. गीता ही जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून सुटण्याचे प्रयत्न करण्याची बुद्धी देऊन त्यासाठीचे उपायही सांगते. अनेक मार्ग सांगून आपल्या प्रकृतीला रुचेल तो मार्ग निवडण्याचे स्वातंत्र्यही देते. भगवद्गीता युद्धापासून (संसारापासून) पळून जायला सांगत नाही, तर युद्धात (संसारात) उभे राहून मन निर्विकार ठेवण्यास शिकवते. इतक्या महान ग्रंथाचा अभ्यासक्रमात समावेश केल्यास देशाची भावी पिढी खर्‍या अर्थाने सक्षम आणि आदर्श होईल, यात शंका नाही. लहानपणापासून गीतेचे धडे घेत मोठी होणारी तरुणाई देशाला सर्वच स्तरांवर प्रगतीकडे नेईल !

हिंदु संस्कृतीचा गौरव वाढवणार्‍या या मानबिंदूचा यथोचित् आदर आणि सन्मान राखायला हवा. इतकी वर्षे देशाची सत्ता उपभोगणार्‍या काँग्रेसने निधर्मीपणाचा टेंभा मिरवत गीतेचा पाठ्यपुस्तकात समावेश केला नाही; कारण त्यांना मुसलमान आणि ख्रिस्ती यांना दुखवायचे नव्हते. ही त्यांची धर्मनिरपेक्षता होती. आता हिंदुत्वनिष्ठ विचारांचे सरकार सत्तेवर आलेले आहे. त्यामुळे संपूर्ण भारतातील शाळांमध्ये गीतेचा अभ्यासक्रमात समावेश होण्यासाठी प्रयत्न करायला हवा. विद्यार्थ्यांनीही गीतेचा सखोल अभ्यास करून जीवनाचे सार्थक करून घ्यावे. जेव्हा हे शक्य होईल, तो दिवस गीतेसाठी विजयदिन ठरेल ! हे साध्य होण्यासाठी गीतेची अमृतगाथा उलगडणार्‍या भगवान श्रीकृष्णालाच शरण जाऊया !