विद्यार्थ्यांनी कपाळावर टिळा लावला म्हणून वर्गाच्या बाहेर काढणार्‍या मुख्याध्यापिकेवर कारवाई करा !

सोलापूर येथील संतप्त हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि पालक यांची मागणी

सोलापूर – येथील ‘पद्मशाली’ संस्थेच्या डी.आर्. श्रीराम इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील मुख्याध्यापिकेने विद्यार्थ्यांना ‘कपाळावर टिळा का लावला ?,’ असे विचारत  वर्गाच्या बाहेर काढून दाखला हातात देण्याची धमकी दिली आहे. ही माहिती समजताच संतप्त झालेल्या पालकांनी शाळेमध्ये धाव घेऊन चौकशी केली. या वेळी शाळेच्या मुख्याध्यापिकेने ‘मी केरळ येथील कॉन्व्हेंट शाळेमध्ये शिक्षण घेतले असून तेथील नियमानुसारच मी वागणार आहे’, असे उद्धटपणे उत्तर दिले. या प्रकरणी सोलापूर येथील बजरंग दल, हिंदुराष्ट्र सेना आणि धर्मजागरण संस्था यांच्या प्रमुखांनीही मुख्याध्यापिकांना जाब विचारला. हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी संस्थाचालकांना २ दिवसांची समयमर्यादा देऊन ‘मुख्याध्यापिकेवर कारवाई करा, अन्यथा शिक्षणसंस्थेला घेराव घालून ठिया आंदोलन करू’, अशी चेतावणी दिली आहे. (नियमाच्या नावाखाली बळजोरीने हिंदु विद्यार्थ्यांना धर्माचरणापासून परावृत्त करणार्‍या मुख्याध्यापिकेवर तात्काळ कारवाई व्हायला हवी ! – संपादक)

मुलांचे रक्षण व्हावे यासाठी धर्म  पाळणे आवश्यक ! – एक महिला पालक

माझी मुले मागील १० वर्षांपासून या शाळेत शिकत आहेत. यापूर्वी मुलाला ‘गळ्यात लॉकेट नको, हातात धागा नको’, असे सांगितले. आता कपाळावर टिळा लावण्यासही बंदी घातली जात आहे. आम्ही हिंदु धर्मात जन्माला आलो आहोत, मुलांचे रक्षण व्हावे यासाठी धर्म पाळणे आवश्यक आहे.

शाळेच्या नियमाच्या नावाखाली हिंदु धर्मावर आघात करण्याचे षड्यंत्र ! – एक पालक

यापूर्वी कधीही अशी बंधने विद्यार्थ्यांना लादली जात नव्हती; मात्र आता मुलांना ‘गळ्यातील रुद्राक्ष माळ काढा’, ‘कपाळावरील गंध काढा’, असे सांगितले जात आहे. त्यामुळे मुख्याध्यापिकेवर तात्काळ कारवाई करण्यात यावी. अशा प्रकारे बंधने लादून शाळेच्या नियमाच्या नावाखाली हिंदु धर्मावर आघात करण्याचे हे षड्यंत्र आहे.

संपादकीय भूमिका

हिंदु धर्मावरील आघात रोखण्यासाठी प्रयत्न करणारे पालक आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांचे अभिनंदन !