बिहार नक्षलवादमुक्त, झारखंडमध्येही लढा शेवटच्या टप्प्यात ! – केंद्रीय राखीव पोलीस दल

  • आक्रमणांचे प्रमाण ७७ टक्क्यांनी उणावले !

  •  मृत्यूमुखी पडणार्‍यांचे प्रमाण ८५ टक्क्यांनी न्यून !

केंद्रीय राखीव पोलीस दल

नवी देहली – बिहार राज्य नक्षलवादापासून मुक्त झाले आहे, तसेच झारखंडमध्येही नक्षलवादाच्या विरोधातील लढा शेवटच्या टप्प्यात आहे. झारखंडमधील नक्षलबहुल बुरहा पहाड हे क्षेत्र नक्षलवाद्यांपासून मुक्त झाले असून जवळपास ३० वर्षांनी पोलिसांना तेथे तळ उभारता आला आहे, अशी माहिती केंद्रीय राखीव पोलीस दलाचे महानिर्देशक कुलदीप सिंह यांनी एका पत्रकार परिषदेद्वारे दिली. पोलिसांच्या या यशावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

कुलदीप सिंह म्हणाले की…

१. बिहार राज्य आता साम्यवादी कट्टरतावादापासून मुक्त झाला आहे. बलपूर्वक वसूली करणार्‍या टोळ्यांच्या रूपात माओवादी कार्यरत असून शकतात; परंतु आता संपूर्ण पूर्व भारतातील त्यांचे वर्चस्व अल्प झाले आहे. (माओवाद्यांकडून होणारी ही वसुलीही बंद झाली पाहिजे ! – संपादक)

२. एप्रिल २०२२ पासून ३ विशेष अभियानांना आरंभ करण्यात आला होता. यामध्ये ‘ऑपरेशन ऑक्टोपस’, ‘ऑपरेशन थंडरस्टॉर्म’ आणि ‘ऑपरेशन बुलबुल’ यांचा समावेश आहे. या अभियानांमुळेच केंद्रीय राखीव पोलीस दलाला झारखंड-छत्तीसगड सीमेवर असलेले बुरहा पहाड नक्षलवाद्यांच्या नियंत्रणातून मुक्त करता आले. ३० वर्षांनी पोलिसांना हे यश मिळू शकले.

आकड्यांद्वारे जाणून घ्या नक्षलवादामध्ये झालेली घट !

वर्ष २०१० मध्ये ६० जिल्हे नक्षलवादी आक्रमणांमुळे ग्रस्त होते, आज हा आकडा ३९ झाला आहे.नक्षलवादामुळे मोठ्या प्रमाणात आक्रमणे होत असलेल्या जिल्ह्यांची संख्या ही वर्ष २०१५ मध्ये ३५ होती, ती वर्ष २०२१ मध्ये २५ झाली आहे. एकूण नक्षलवादी आक्रमणांपैकी या जिल्ह्यांमधील प्रमाण ९० टक्के !

वर्ष २००९ मध्ये सर्वाधिक म्हणजे २ सहस्र २५८ नक्षलवादी आक्रमणे झाली होती. वर्ष २०२१ मध्ये हीच संख्या ५०९ वर आले म्हणजे आक्रमणांचे प्रमाण ७७ टक्क्यांनी उणावले आहे. वर्ष २०१० मध्ये नक्षलवादी आक्रमणांत मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या सर्वाधिक म्हणजे १ सहस्र ५ होती. वर्ष २०२१ मध्ये हीच संख्या १४७ वर म्हणजे ८५ टक्क्यांनी न्यून झाली आहे.

गेल्या काही मासांत १४ माओवाद्यांना मारले, तर ५९० जणांना अटक ! – गृहमंत्री

या यशावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ट्वीट करत लिहिले की, देशाच्या आंतरिक सुरक्षेतील हा ऐतिहासिक मैलाचा दगड आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशभरातील नक्षलवाद्यांच्या विरोधात चालू असलेल्या निर्णायक युद्धामध्ये सुरक्षादलांना मिळालेले हा अभूतपूर्व विजय आहे.

ते पुढे म्हणाले की, माओवाद्यांच्या विरोधात गेल्या काही मासांपासून चालू असलेल्या मोहिमांमुळे १४ माओवादी मारले गेले असून ५९० हून अधिक जणांना अटक करण्यात आली अथवा ते स्वत:हून पोलिसांकडे स्वाधीन झाले.

संपादकीय भूमिका

  • पोलीस दलांची ही कामगिरी अभिनंदनास्पदच आहे; परंतु नक्षलवादावर लगाम लावत असतांना जिहादी आतंकवाद डोके वर काढत आहे. २ मासांपूर्वीच बिहार राज्यातच भारताला इस्लामी राष्ट्र घोषित करण्याचे मनसुबे आखले जात असल्याचे समोर आले आहे. तसेच हिंदूंचा शिरच्छेद करण्यासाठी धर्मांध मुसलमान पुढे सरसावले आहेत. या सर्वांवर लगाम केव्हा लागणार ?
  • नक्षलवादी काही ठरावीक काळानंतर पुनःपुन्हा क्रियाशील होऊन पोलीस आणि सामान्य जनता यांना लक्ष्य करतात, हा इतिहास आहे. त्यामुळे तो समूळ नष्ट होईपर्यंत सरकारने प्रयत्न करणे आवश्यक !