सनातनचे साधक श्री. अनिल सामंत यांचे गायन ऐकतांना लक्षात आलेली त्यांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये आणि त्यांच्या गायनाचे सूक्ष्म स्तरीय परिणाम

‘३१.३.२०२२ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात साधक श्री. अनिल सामंत यांचे गायनाचे प्रयोग घेण्यात आले. श्री. सामंत यांनी ‘ऑर्केस्ट्रा’मध्ये गायन केले आहे. या प्रयोगातून ‘त्यांच्या गायनाचा वाईट शक्तींचा तीव्र त्रास असलेले साधक आणि ६० टक्क्यांहून अधिक आध्यात्मिक पातळी असलेले अन् वाईट शक्तींचा तीव्र त्रास नसलेले साधक यांवर काय परिणाम होतो ?’, हे अभ्यासण्यात आले. या वेळी देवाने करवून घेतलेले सूक्ष्म परीक्षण आणि त्यांची लक्षात आलेली आध्यात्मिक वैशिष्ट्ये या लेखात देत आहे.

श्री. अनिल सामंत

१. श्री. सामंत यांचे मन निर्मळ असून त्यांच्यात अल्प अहं असल्याने त्यांच्या गायनातून गाण्यातील रचनेत दडलेली सकारात्मक किंवा नकारात्मक शक्ती पूर्णपणे प्रगट होणे

श्री. निषाद देशमुख

श्री. सामंत यांनी अन्य भाषेतील त्रासदायक गीत गायन केल्यावर त्यातून तीव्र प्रमाणात नकारात्मक शक्ती प्रक्षेपित व्हायची. याउलट त्यांनी शास्त्रीय संगीत आणि शुद्ध भाषेवर आधारित गीत यांचे गायन केल्यावर तेवढ्याच प्रमाणात सकारात्मक शक्ती प्रक्षेपित व्हायची. या संदर्भात ईश्वराने सांगितले ‘समाजातील अन्य गायक गात असतांना त्यांचा उद्देश लोकप्रियता आणि प्रशंसा मिळवणे, हा असतो. यामुळे गायन करतांना त्यांचा अहं जागृत असल्याने त्यांच्याकडून सकारात्मक शक्ती प्रक्षेपित होत नाही. याउलट श्री. सामंत यांचे मन निर्मळ असून त्यांच्यात तुलनेत अहं अल्प असल्याने गाण्यातील रचनेत दडलेली सकारात्मक किंवा नकारात्मक शक्ती पूर्णपणे प्रगट होऊन त्याची अनुभूती घेणे शक्य होत आहे.’

२. श्री. सामंत यांचे गायन होतांना सूक्ष्म गंधाची अनुभूती येणे

श्री. सामंत यांनी शास्त्रीय संगीत आणि शुद्ध भाषेवर आधारित गीतांचे गायन केल्यावर पुष्कळ सुगंध आला. ‘सुगंध येणे’, ही पृथ्वीतत्त्वाची अनुभूती आहे. या संदर्भात ईश्वराने सांगितले, ‘ज्या वेळी साधनेमुळे जीव सात्त्विकतेची उच्चतम सीमा (म्हणजे सत्त्व ५० टक्के, रज ३० टक्के आणि तम २० टक्के) ओलांडतो, त्या वेळी सर्वप्रथम पंचतत्त्वांपैकी पृथ्वीतत्त्वाशी संबंधित सुगंधाची अनुभूती येते.’

३. श्री. सामंत त्रासदायक गीत गात असतांनाही त्यांच्या अंतर्मनातील साधनेमुळे त्यांच्याकडे बघून चांगले वाटणे

प्रयोगासाठी निवडण्यात आलेली काही गीते त्रासदायक होती. सर्वसाधारणत: गायकांनी त्रासदायक गीत गायले, तर काही वेळाने त्या गीताच्या परिणामामुळे त्यांचा तोंडवळाही त्रासदायक होतो. याउलट प्रयोगात श्री. सामंत त्रासदायक गीत गात असतांनाही त्यांच्याकडे बघून चांगले वाटत होते. या संदर्भात ईश्वराने सांगितले, ‘जिवाची अंतर्मनातून साधना चालू असेल, तर त्याच्याकडून स्थुलातून काही पापकर्म झाले, तरी त्याची पुष्कळ हानी होत नाही. याउलट चूक सुधारण्याचे उपाय त्याला सुचतात. श्री. सामंत यांचीही अंतर्मनातून साधना चालू आहे. यामुळे त्यांनी स्थुलातून त्रासदायक गीत गाण्याचे कर्म केले, तरी अंतर्मनातून चालू असलेल्या साधनेमुळे त्यांच्याकडे बघून चांगले वाटते.’

४. श्री. सामंत यांनी केलेल्या गायनाचा परिणाम जिवाच्या पिंडापर्यंत (लिंगदेहापर्यंत) होणे आणि त्यामुळे प्रयोग समाप्त होऊन दीर्घकाळ उलटल्यानंतरही वाईट शक्ती प्रगट रहाणे

वाईट शक्तींचा तीव्र त्रास असलेल्या साधकांवर होणारे परिणाम अभ्यासण्यासाठी घेण्यात आलेला प्रयोग समाप्त झाला. त्यानंतरही वाईट शक्तींचा तीव्र त्रास असलेले साधक दीर्घकाळ गायन करत होते. एका साधकातील वाईट शक्ती व्यासपिठावर जाऊन परत-परत गायन करत होती, तर अन्य साधकांमधील वाईट शक्ती त्याला गप्प बसण्यासाठी आणि न गाण्यासाठी सांगत होत्या, तसेच त्याला परत-परत व्यासपिठावरून खाली खेचत होत्या. या संदर्भात ईश्वराने सांगितले, ‘श्री. सामंत यांनी गायन केलेले शास्त्रीय संगीत आणि शुद्ध भाषा यांच्यावर आधारित गीताचा परिणाम साधकांच्या पिंडापर्यंत झाला आहे. पिंड म्हणजे पोकळी (आनंदमयकोष) पोकळीत विविध नाद कार्यरत असतात. वाईट शक्तींचा तीव्र त्रास असणार्‍या साधकांमध्ये त्रासदायक नाद, तर आध्यात्मिकदृष्ट्या उन्नतांच्या पिंडात सात्त्विक नाद कार्यरत असतो. आकाशतत्त्वामुळे पिंडातील त्रासदायक नाद बाहेर पडून त्या ठिकाणी सात्त्विक नाद निर्माण होतो. यालाच आकाशतत्त्वाचे उपाय म्हणतात. तसे उपाय काही प्रमाणात एका साधकावर झाल्याने तो अखंड गात आहे, तर अन्य साधकांमधील वाईट शक्ती त्याला गप्प रहायला सांगत आहेत.’

– श्री. निषाद देशमुख (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के) (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२.४.२०२२)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक