देशात प्रतिदिन बँक घोटाळ्यांद्वारे होते १०० कोटी रुपयांची हानी !

  • माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या आधारे केले  धक्कादायक वास्तव उघड !

  • महाराष्ट्रात सर्वाधिक घोटाळे !

  • स्टेट बँक ऑफ इंडियाच्या भारतभरातील शाखांत ४ सहस्र १९२ कर्मचार्‍यांकडून ७ सहस्र कोटी रुपयांचे घोटाळे !

मुंबई – माहिती अधिकारातून बँक घोटाळ्याची माहिती उघड झाली आहे. देशात प्रतिदिन १०० कोटी रुपयांची हानी बँक घोटाळ्यातून होत आहे. देशाची आर्थिक राजधानी असणार्‍या मुंबईचाही यात समावेश आहे. बँक घोटाळा किंवा फसवणुकीच्या एकूण रकमेपैकी ५० टक्के घोटाळे केवळ महाराष्ट्रात झालेले आहेत. त्यानंतर देहली, गुजरात, तेलंगाणा आणि तमिळनाडू यांचा क्रमांक लागतो. वर्ष २०२१-२२ या वर्षात स्टेट बँक ऑफ इंडियाच्या भारतभरातील शाखांमध्ये ४ सहस्र १९२ कर्मचार्‍यांनी ७ सहस्र कोटींचे घोटाळे केले आहेत, अशी माहिती ‘माहिती अधिकारा’च्या अंतर्गत देण्यात आली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी ही माहिती मागितली होती.

१. वर्ष २०१७ ते वर्ष २०२२ या काळात ९ सहस्र ७२० कर्मचार्‍यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली, तर १ सहस्र २१४ जणांना बडतर्फ करण्यात आले. याच काळात एकूण १० सहस्र ८०४ कर्मचार्‍यांनी त्यागपत दिले, तर एकूण ४७ सहस्र १२१ कर्मचारी निवृत्त झाले.

२. संपूर्ण देशात बँकेची एकूण १२ लाख ९० सहस्र ८३८ खाती असून त्यात ८९३ कोटी ३५ लाखांची रक्कम विना दावा पडून आहे.

३. स्टेट बँकेत ३ सहस्र ९३४ सुरक्षारक्षकांच्या जागा रिक्त आहेत. (देशात आधीच बेरोजगारी वाढत असतांना या जागा बँक कधीपर्यंत भरणार आहे, हे जनतेला कळायला हवे ! – संपादक)

संपादकीय भूमिका

  • देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी करणार्‍या संबंधितांना कठोर शिक्षा झाल्याविना घोटाळ्यांच्या घटना थांबणार नाहीत !
  • आतापर्यंत झालेली हानी घोटाळेबाजांकडून वसूल करून घ्यायला हवी !