श्राद्धाचे विविध प्रकार

#Datta Datta #दत्त दत्त #श्रीदत्त श्रीदत्त #ShriDatta ShriDatta #mahalaya mahalaya #महालय महालय #pitrupaksha pitrupaksha #पितृपक्ष पितृपक्ष #shraddha shraddha #श्राद्ध श्राद्ध #ShraddhaRituals Shraddha rituals #श्राद्धविधी श्राद्धविधी #Shraddhavidhi Shraddha vidhi

माता-पित्यांचा मृत्यू झाल्यावरही त्यांच्याप्रती आपले काहीतरी कर्तव्य असते. त्या कर्तव्यपूर्तीची आणि पितृऋण फेडण्याची सुसंधी श्राद्धकर्मामुळे मिळते. माता-पित्यांचा मृत्यूत्तर प्रवास सुखमय आणि क्लेशरहित व्हावा, त्यांना सद्गती मिळावी, यांसाठी श्राद्धविधी आवश्यक असतो. पितृपक्षाच्या निमित्ताने या लेखमालेतून श्राद्धाचे महत्त्व आणि लाभ जाणून घेत आहोत. आज श्राद्धाचे विविध प्रकार जाणून घेऊया.

महालयश्राद्ध

१. नांदीश्राद्ध

मंगलकार्याच्या आरंभी, गर्भाधान इत्यादी सोळा संस्कारांच्या आरंभी, पुण्याहवाचनाच्या वेळी कार्य सुसंपन्न व्हावे; म्हणून जे श्राद्ध करतात, ते नांदीश्राद्ध होय. यात सत्यवसु (किंवा क्रतुदक्ष) संज्ञक विश्वेदेव असून पितृत्रयी, मातृत्रयी आणि मातामहत्रयी एवढ्यांचाच उच्चार असतो. कर्मांगश्राद्ध आणि वृद्धीश्राद्ध ही नांदी श्राद्धे आहेत.

१ अ. कर्मांगश्राद्ध : गर्भाधान संस्काराच्या वेळी करावयाचे श्राद्ध

१ आ. वृद्धीश्राद्ध : नवजात अपत्याच्या जन्मानंतर विवाहाच्या वेळी करावयाचे श्राद्ध

१ इ. विवाहादी मांगलिक प्रसंगी नांदीश्राद्ध का करतात ? : ‘पुत्रजन्म, उपनयन आणि विवाह या पितरांच्या कौटुंबिक जिव्हाळ्याच्या प्रसंगी प्रथम नांदीश्राद्ध करून त्यांना तो तो हविर्भाग अर्पण केला जाऊन संतुष्ट केले जाते. यामुळे या प्रसंगांत उद्भवणार्‍या पूर्वजरूपी लिंगदेहांच्या वासनायुक्त अडथळ्यांचे प्रमाण अल्प होऊन ते ते कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पडण्यास साहाय्य होते.’ – एक विद्वान (श्रीचित्शक्ती (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ ‘एक विद्वान’ या नावानेही लिहितात)

२. पार्वण श्राद्ध

‘श्रौत परंपरेतील पिंडपितृयज्ञ हा साग्निकाने (अग्निहोत्र धारण करणार्‍याने) करायचा एक यज्ञ आहे. त्याचाच पर्याय म्हणजे गृह्यसूत्रांतले पार्वण श्राद्ध होय. पितरांचा पार्वणांच्या यादीत समावेश झाल्यावर त्यांच्यासाठी हे श्राद्ध करण्यात येते. एकपार्वण, द्विपार्वण आणि त्रिपार्वण, असे या श्राद्धाचे प्रकार आहेत. महालयश्राद्ध आणि तीर्थश्राद्ध ही पार्वण श्राद्धे आहेत.

२ अ. महालयश्राद्ध : भाद्रपद कृष्ण प्रतिपदेपासून अमावास्येपर्यंत केले जाणारे ते पार्वण श्राद्ध.

२ आ. मातामहश्राद्ध (दौहित्र) : ज्याचे वडील जिवंत आहेत; पण आईचे वडील जिवंत नाहीत अशा व्यक्तीने करावयाचे श्राद्ध. आजोबांच्या वर्षश्राद्धापूर्वी हे श्राद्ध करता येत नाही. मातामहश्राद्ध फक्त आश्विन शुक्ल प्रतिपदेसच करता येते. हे श्राद्ध करण्यासाठी श्राद्धकर्ता ३ वर्षांपेक्षा मोठा असावा. त्याची मुंज झालेली नसली, तरी त्यास हे श्राद्ध करता येते.

२ इ. तीर्थश्राद्ध : प्रयागादी तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी गेल्यावर किंवा पवित्र नदीवर केले जाणारे श्राद्ध. तीर्थश्राद्धाच्या वेळी महालयातील सर्व पार्वणे घेतात.’ (?)

३. इतर प्रकार

वर दिलेल्या मुख्य प्रकारांव्यतिरिक्त १२ अमावास्या, ४ युगे, १४ मन्वंतरे, १२ संक्रांती, १२ वैधृती, १२ व्यतीपात, १५ महालय, ५ पहिली, ५ अष्टके, ५ अन्वाष्टके, असे श्राद्धाचे ९६ प्रकार सांगितले आहेत.

श्राद्धाच्या अन्य प्रकारांपैकी काही प्रकारांची थोडक्यात माहिती पुढे दिली आहे.

३ अ. गोष्ठीश्राद्ध : ब्राह्मण समुदाय आणि विद्वान एकत्र मिळून तीर्थाच्या ठिकाणी, ‘पितरांची तृप्ती व्हावी, तसेच संपत्ती अन् सुख प्राप्त व्हावे’, या उद्देशाने श्राद्ध करतात, त्या श्राद्धाला किंवा श्राद्धाविषयी चर्चा होत असतांना एकाएकी स्फूर्ती होऊन जे श्राद्ध केले जाते, त्या श्राद्धाला ‘गोष्ठीश्राद्ध’, असे म्हणतात.

३ आ. शुद्धीश्राद्ध : आपली शुद्धी होण्यासाठी ब्राह्मणभोजन घालतात, त्याला ‘शुद्धीश्राद्ध’ असे म्हणतात. हे प्रायश्चित्तांग श्राद्ध आहे.

३ इ. पुष्टीश्राद्ध : शरीरवृद्धी होण्यासाठी आणि द्रव्यादी संपत्तीची वृद्धी होण्यासाठी केलेल्या श्राद्धाला पुष्टीश्राद्ध असे म्हणतात.

३ ई. घृतश्राद्ध (यात्राश्राद्ध) : तीर्थयात्रेला निघण्यापूर्वी यात्रा निर्विघ्न होण्यासाठी पितरांच्या स्मृतीप्रीत्यर्थ घृताने श्राद्ध करतात, याला घृतश्राद्ध असे म्हणतात.

३ उ. दधीश्राद्ध : तीर्थयात्रेहून परतल्यावर करण्यात येणारे श्राद्ध

३ ऊ. अष्टकाश्राद्ध (वद्य अष्टमीला करावयाचे श्राद्ध) : अष्टका म्हणजे कोणत्याही मासातील वद्य अष्टमी ही तिथी होय. वेदकाळी अष्टकाश्राद्ध हे विशेषतः मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन या चार मासांतील वद्य अष्टमीला करत असत. या श्राद्धात भाज्या, वडे, तीळ, मध, तांदळाची खीर, फळे, कंदमुळे इत्यादी पदार्थ पितरांना अर्पण करत. विश्वेदेव, अग्नि, सूर्य, प्रजापति, रात्री, नक्षत्रे, ऋतू इत्यादी श्राद्धाच्या देवता मानीत.

३ ए. दैविकश्राद्ध : देवाची कृपा प्राप्त व्हावी, या उद्देशाने केलेल्या श्राद्धाला दैविकश्राद्ध असे म्हणतात.

३ ऐ. हिरण्यश्राद्ध : भोजन न घालता नुसती दक्षिणा देऊन केलेले श्राद्ध. धान्याचा अभाव असेल, तर धान्याच्या किमतीच्या चौपट किमतीचे सुवर्ण ब्राह्मणांना देऊन हे श्राद्ध करावे.

३ ओ. हस्तश्राद्ध : श्राद्धीय ब्राह्मणांना भोजन देऊन करण्यात येणारे श्राद्ध. भोजन नसेल, तर हिरण्याने (पैशाने), आमान्नाने (कोरड्या शिध्याने) हे श्राद्ध करतात.

३ औ. आत्मश्राद्ध : ज्यांना संतती नसते किंवा ज्यांची संतती नास्तिक असते, त्यांनी जिवंतपणी स्वतःचे श्राद्ध स्वतःच करावे. याचा विधी शास्त्रात सांगितला आहे.

३ अं. चटश्राद्ध : श्राद्धासाठी देव आणि पितर यांच्या स्थानांवर बसण्यासाठी ब्राह्मण उपलब्ध होत नाहीत, तेव्हा त्या स्थानावर दर्भ ठेवतात. त्यास चट (किंवा दर्भबटू) म्हणतात. चट मांडून केलेल्या श्राद्धास चटश्राद्ध म्हणतात.

वर श्राद्धाचे विविध प्रकार दिलेले असले, तरी कालमानाप्रमाणे मृत व्यक्तीची, ती गेल्यापासून पहिल्या ते ११ दिवसांपर्यंत करायची श्राद्धे, मासिक श्राद्धे, सपिंडीकरण श्राद्ध, अब्दपूर्तीश्राद्ध, द्वितीयाब्दिक श्राद्ध म्हणजे प्रतिसांवत्सरिक श्राद्ध आणि महालय श्राद्ध एवढीच श्राद्धे सर्वसामान्यपणे प्रचलित आहेत.

संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘श्राद्धाचे महत्त्व आणि शास्त्रीय विवेचन’

श्राद्धविषयक शंकानिरसन

प्रश्न : मी माझ्या मुलांसमवेत माझ्या माहेरी रहाते. माझे पती विदेशात असतात. माझे सासरे वारले आहेत, तर मी माझ्या सासर्‍यांचे महालय माझ्या माहेरी करू शकते का ? नाहीतर मग दुसरा काही उपाय ?

उत्तर : पतीच्या वतीने आमान्न श्राद्ध करू शकता. यामध्ये बटाटे, तूप, तीळ, गूळ आणि तांदूळ, विडा – नारळासहित एखाद्या पुरोहिताला किंवा देवळात अर्पण करावे.

(सौजन्य : सनातन संस्था आणि सनातन संस्थेचे संकेत स्थळ sanatan.org)

Sanatan Sanstha presents Shraddha Rituals App !
App is available in – Marathi, Hindi, Kannada, Gujarati, Telugu, Malayalam & English

(चित्रावर क्लिक करा)