सध्या चर्चेत आलेला विषय म्हणजे ‘वासुदेव’ ! डोक्यावर मोरपिसांची टोपी, पायघोळ अंगरखा, विजार किंवा धोतर, कमरेभोवती शेला किंवा उपरणे गुंडाळलेले, एका हातात चिपळ्या, दुसर्या हातात पितळी टाळ, कमरेला पावा, मंजिरी अशी वाद्ये आणि काखेला झोळी, गळ्यात कवड्यांच्या आणि रंगीबेरंगी मण्यांच्या माळा, हातात तांब्याचे कडे, कपाळावर अन् कंठावर गंधाचा टिळा असा वेष धारण करून
‘वासुदेव हरि वासुदेव हरि ।
सकाळच्या पारी आली वासुदेवाची स्वारी ।।
सीता सावली माना दान करी वासुदेवा ।
श्रीकृष्ण घ्या सखा नाही होणार तुला धोका ।।’,
असे म्हणत दारोदारी येणारी वासुदेवाची फेरी आता विरळच पहायला मिळते. नुकताच सामाजिक माध्यमांवर वासुदेवाशी संबंधित एक ‘व्हिडिओ’ मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला. त्यात वासुदेवाची वेशभूषा धारण केलेली एक व्यक्ती पाटीवर ‘सांताक्लॉज मलाही आवडतो. तो नक्कीच आपल्या मुलांना दाखवा; पण त्यासमवेतच हरवत चाललेला आपला ‘वासुदेव’ही एकदा आठवा !’, असा संदेश लिहून गर्दीच्या ठिकाणी उभी असलेली दिसते. ती पाटी वाचून अनेक जण त्याकडे आकर्षित होऊन वासुदेवाचे छायाचित्र काढणे, त्याच्यासमवेत उभे राहून छायाचित्र काढत असल्याचे व्हिडिओत दिसून आले. ‘आपली संस्कृती टिकवणे, हे आपलेच दायित्व आहे’, याविषयी जागृती करण्यासाठीचा हा स्तुत्य प्रयत्न आहे !
समाजप्रबोधन करणार्या गीतांतून वासुदेवाने समाजमनावर भक्ती करण्याचे महत्त्व बिंबवले. प्रारब्ध स्वीकारून आणि देवावर श्रद्धा ठेवून चांगली कर्मे करण्याचा अन् जीवनात समाधानी रहाण्याचा संदेश देणार्या गीतांतून वासुदेवाने अध्यात्मप्रसाराचे मोलाचे कार्य केले. घरोघरी येणार्या वासुदेवाच्या स्वारीमुळे कळत-नकळत लहानपणापासून मुलांवर ईश्वरभक्तीचा संस्कार होत होता; परंतु आता हे दर्शन दुर्मिळ झाले आहे. महाराष्ट्रात ही परंपरा अनुमाने १२०० वर्षे जुनी असल्याचा अंदाज आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर, जगद्गुरु संत तुकाराम, संत एकनाथ यांच्या साहित्यांतही वासुदेवावरील रूपके आढळतात. हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या कार्यात छत्रपती शिवरायांनी मावळ्यांना निरोप देण्यासाठी, तसेच हेरगिरीसाठी वासुदेवाचा उपयोग करून शत्रूंच्या गोटातील वार्ता मिळवल्याचे ऐतिहासिक दाखले आढळतात. धर्माचरणाचा अभाव, स्वधर्म आणि संस्कृती यांच्याविषयी अभिमान नसणे, पाश्चात्त्य संस्कृतीचे आकर्षण यांमुळे पाश्चात्यांचे अंधानुकरण करण्यात सध्याचा समाज गुरफटला आहे. देवापेक्षा पैशांवर विश्वास असल्याने अधिकाधिक पैसे कमावण्याकडे सर्वांचा कल आहे. या स्थितीत वासुदेवाचे महत्त्व लक्षात येऊन आपण त्यांनी सांगितल्याप्रमाणे ईश्वरभक्ती आणि चांगली कर्मे करण्याचा प्रयत्न करायला हवा !
– श्री. संदेश नाणोसकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.