उत्‍पत्ती, स्‍थिती, लय यांना आणि जगतात घडणार्‍या प्रत्‍येक घटनेला ब्रह्म कारणीभूत !

प.पू. स्‍वामी वरदानंद भारती यांचे धर्माविषयी अमूल्‍य मार्गदर्शन असणारी लेखमाला !

प.पू. स्वामी वरदानंद भारती

प्रश्‍न : किं स्‍वित् आदित्‍यं उन्‍नयति ?

अर्थ : कोण सूर्यास उगवावयास लावतो ?

उत्तर : ब्रह्मादित्‍यं उन्‍नयति ।

अर्थ : ब्रह्म सूर्यास उगवायला लावते.

१. प्रत्‍येक घटना ब्रह्माच्‍या वा ईश्‍वराच्‍या सत्तेमुळे घडणे आणि नास्‍तिकतावाद्यांनी ते नाकारणे 

‘उपनिषदांनी जगताच्‍या उत्‍पत्ती-स्‍थिती-लयाला ब्रह्म हे कारण असून जगतात घडणारी प्रत्‍येक घटना ब्रह्माच्‍या सत्तेमुळे घडत असते’, असा सिद्धांत मांडला आहे. हिंदुस्‍थानातील सर्व संतमहात्‍म्‍यांनी हा सिद्धांत जवळजवळ जसाच्‍या तसा मानला आहे. भारतीय तत्त्वज्ञानाने ‘ईश्‍वर सर्व काही करतो. ईश्‍वराच्‍या सत्तेने सारे काही घडते. सृष्‍टीच्‍या सर्व व्‍यापाराच्‍या मुळाशी ईश्‍वराची प्रेरणा असते’, हा सिद्धांत स्‍वीकारलेला आहे. आधुनिक बुद्धीवादी नास्‍तिक वा काही विज्ञानशास्‍त्रज्ञ हा सिद्धांत मान्‍य करत नाहीत. ते ‘अपघात, योगायोग, आपोआप’, हे सृष्‍टीचे मूळ आहे’, असे मानत असतात. अगदी लहानपणापासून या विचारांचा संस्‍कार घडवण्‍याचा त्‍यांचा प्रयत्न असतो.

‘पृथ्‍वी स्‍वतःभोवती प्रतिघंटा (ताशी) १ सहस्र मैल वेगाने आणि सूर्याभोवती प्रतिघंटा ६१ सहस्र मैल वेगाने फिरते’, असे शास्‍त्रज्ञ सांगतात. पृथ्‍वीच्‍या गतीचा अनुभव अगदी कुणालाही येणे शक्‍य नाही. सूर्याची गती प्रत्‍येकाला प्रत्‍यक्षही डोळ्‍यांनी पहाता येते. ‘सूर्य उगवला, माथ्‍यावर आला आणि मावळला’, अशी भाषा प्रत्‍यक्ष अनुभवाच्‍या बळावर प्रतिदिनी आपण वापरत असतो. पृथ्‍वीच्‍या अपेक्षेने सूर्य स्‍थिर आहे नि पृथ्‍वी स्‍वतःभोवती आणि सूर्याभोवती सतत भ्रमण करत असते, असे मानत असतो आणि तसे शिकवत असतो.

२. ब्रह्मांडाची व्‍याप्‍ती 

आजच्‍या विज्ञानशास्‍त्राप्रमाणे आकाशगंगा आपणापासून १ लाख प्रकाशवर्षांच्‍या अंतरावर आहे. प्रकाशाचा वेग सेकंदाला १ लाख ८६ सहस्र मैल किंवा ३ लाख कि.मी. इतका आहे. या मापाने आपल्‍या १ लाख वर्षांचे सेकंद किती आणि त्‍या प्रमाणाने आकाशगंगेचे आपणापासून अंतर किती याची कल्‍पना करा. इतकेच किंवा याहून एकमेकींपासून अधिक अंतर असलेल्‍या १०-१२ तरी आकाशगंगा किंवा तेजोमय असल्‍याचेे खगोल शास्‍त्रज्ञ सांगतात. खगोल शास्‍त्रज्ञांना ज्ञात असलेल्‍या विश्‍वाला एक ब्रह्मांड मानले, तर अशा अनंत कोटी ब्रह्मांडाचा स्‍वामी असलेल्‍या ईश्‍वराची योग्‍यता केवढी मोठी ?

३. ईश्‍वरी साक्षात्‍कार होण्‍यासाठी प्रयत्न करणे महत्त्वाचे ! 

‘ईश्‍वर प्रत्‍येकाच्‍या हृदयात रहातो’, हे प्रत्‍यक्ष ‘श्रीमद़्‍भगवद़्‍गीते’नेच सांगितले आहे. ‘ईश्‍वर हृदयात रहातो, तर त्‍याची जाणीव का होत नाही ?’, असाही प्रश्‍न काही बुद्धीवादी विचारतात; पण आपण पृथ्‍वीशी आयुष्‍यभर, अहोरात्र जखडलेले असतांना आपल्‍याला पृथ्‍वीच्‍या गतीचे ज्ञात होत नाही, तसेच हृदयस्‍थ ईश्‍वराचेही ज्ञान होत नाही. सत्‍य म्‍हणून स्‍वीकारलेले विज्ञानातील अनेक सिद्धांत हे सूक्ष्म गणित आणि प्रयोग करण्‍यासाठी अत्‍यावश्‍यक असलेली अपरंपार साधने उपलब्‍ध असतील, तरच अनुभवास येतात. ईश्‍वराचाही अनुभव येण्‍यासाठी तसेच असणे स्‍वाभाविक आहे. संत-महात्‍म्‍यांनी कर्म, भक्‍ती, ज्ञान आणि योग यांच्‍या स्‍वरूपात ईश्‍वरी दर्शनाचे मार्ग, उपाय, पद्धत अन् साधने स्‍वानुभवाने सांगून ठेवली आहेत. तेव्‍हा ईश्‍वर दिसत नाही, म्‍हणून त्‍याला नाकारणे योग्‍य नाही. सृष्‍टीतील नियम बुद्धीमान असलेल्‍या माणसालाही परिश्रमपूर्वक शोधून काढावे लागतात आणि मग त्‍याचा काही लाभही होतो. ईश्‍वरी साक्षात्‍काराचेही तसेच आहे.

४. ईश्‍वर योजक असून तो शोधणे, हे श्रेष्‍ठ बुद्धीमत्तेचे लक्षण ! 

‘थंडीने पदार्थ संकोच पावतो आणि उष्‍णतेने तो विस्‍तारतो’, हा विज्ञानाचा सर्वमान्‍य नियम आहे. पाणी हे या विशिष्‍ट नियमाला एका मर्यादेपलीकडे अपवाद आहे. पाण्‍याचे बर्फ झाले की, थंडपणामुळे त्‍याचे आकारमान उणावण्‍याऐवजी वाढते. त्‍यामुळे बर्फ हलका होऊन पाण्‍यावर तरंगू लागतो. या योगाने समुद्राच्‍या पृष्‍ठभागावर उण्‍या-अधिक जाडीचे बर्फाचे प्रचंड ठोकळे तरंगत रहातात आणि खालचे पाणी द्रवरूपात सुरक्षित रहाते. असे झाले नसते, तर सर्व समुद्र गोठला असता. मासे सुरक्षित राहू शकले नसते. सामान्‍य नियमाला हा अपवाद योजनापूर्वक घडवला आहे, असे मान्‍य करण्‍यावाचून दुसरी गती काय आहे ?

दुसरे उदाहरण अणूरचनेचे आहे. ‘विशिष्‍ट संख्‍येमध्‍ये धनकण केंद्रस्‍थानी आणि सामान्‍यतः तेवढ्याच संख्‍येने ॠणकण ८ सहस्र पटींच्‍या अंतरावरून त्‍या केंद्राच्‍या भोवती प्रचंड वेगाने फिरत असतात. समान जातीचा भार असलेले पदार्थ एकमेकांपासून दूर ढकलले जातात. समान चुंबकीय भार असलेले पदार्थ एकमेकांपासून दूर ढकलले जातात. असमान चुंबकीय भार असलेले पदार्थ एकमेकांकडे आकर्षित केले जातात’, असा विज्ञानाचा नियम आहे. असे असतांना अणूगर्भामध्‍ये धनभार असलेले कण एकत्र रहातात आणि ॠणभार असलेले कण दूर अंतरावरून फिरत रहातात, असे का घडते ? येथे ही सामान्‍य नियमाचे पालन झाले असते, तर कोणतीही वस्‍तू अस्‍तित्‍वातच आली नसती. तेव्‍हा वस्‍तूला वस्‍तूपण येण्‍यासाठी हा अपवाद निर्माण झाला आहे. म्‍हणून तिथे योजकता (नियोजन करून केलेले) आहे, सहज निर्माण झालेले (आपोआपी) नाही. ही योजकता ज्‍याची, त्‍याचेच नाव ईश्‍वर किंवा ब्रह्म !

सृष्‍टीचे नियम शोधून काढणे आणि त्‍यांचा उपयोग करणे, हे जर बुद्धीमत्तेचे लक्षण असेल, तर ईश्‍वराचा शोध घेणे आणि त्‍याचे दर्शन घडणे, हे त्‍याहीपेक्षा श्रेष्‍ठ बुद्धीमत्तेचे लक्षण आहे. त्‍या दृष्‍टीने प्रयत्नशील असणे, हे माणसाला भूषणही आहे आणि अंतःकरणाच्‍या प्रसन्‍नतेच्‍या दृष्‍टीने उपयुक्‍तही आहे.

– प.पू. स्‍वामी वरदानंद भारती (पूर्वाश्रमीचे अनंतराव आठवले)

(साभार : ग्रंथ ‘यक्षप्रश्‍न’)