येत्या डिसेंबरपासून कर्नाटकात नैतिक मूल्यांतर्गत शाळांमधून श्रीमद्भगवद्गीता शिकवण्यात येणार !

कुराण हा धार्मिक ग्रंथ; मात्र गीता धार्मिक ग्रंथ नाही ! – कर्नाटकचे शिक्षणमंत्री  

शिक्षणमंत्री बी.सी. नागेश (डावीकडे)

बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटकातील शाळांमध्ये येत्या डिसेंबर मासापासून नैतिक शिक्षणाच्या अंतर्गत श्रीमद्भगवद्गीता शिकवण्यात येणार आहे. यावरून मुसलमानांकडून विरोध केला जात आहे. ‘जर गीता शिकवण्यात येत आहे, तर कुराण का नाही?’ यावर शिक्षणमंत्री बी.सी. नागेश म्हणाले, ‘‘कुराण हा धार्मिक ग्रंथ आहे, तर गीता धार्मिक ग्रंथ नाही. गीतेमध्ये देवाची पूजा करण्याविषयी किंवा धार्मिक प्रथेविषयी काहीही सांगण्यात आलेले नाही. ती नैतिकेविषयी ज्ञान देते, जे विद्यार्थ्यांना प्रेरित करणारे आहे.’’

१. शिक्षणमंत्री नागेश पुढे म्हणाले की, स्वातंत्र्यसैनिकांना गीतेमुळे लढण्याची प्रेरणा मिळाली होती. आम्ही गीतेला स्वतंत्र विषय म्हणून शिकवणार नाही, तर नैतिक शिक्षणामध्ये त्याचा समावेश करणार आहोत. यासाठी सरकारने यापूर्वीच एक समिती स्थापन केली होती आणि तिने केलेल्या शिफारसीनुसार डिसेंबरपासून गीता शिकवली जाणार आहे.

२. शिक्षणमंत्री नागेश म्हणाले, ‘‘पाठ्यपुस्ताकांमध्ये चिकमगळुरू येथील ‘बाबा बुडनगिरी’ अशा उल्लेखासारख्या चुका सुधारण्याचा प्रयत्न केला जात आहे. आता त्याचे नाव ‘इनाम दत्तात्रेय पीठ’ असे करण्यात आले आहे.’ (मुसलमानांनी अतिक्रमित केलेले हिंदूंचे दत्तात्रेय पीठ हिंदूंच्या कह्यात देण्यासाठीही मंत्र्यांनी अपेक्षा करावी, असेच हिंदूंना वाटते ! – संपादक)

गीता स्वतंत्र विषय म्हणून शिकवण्यात येणार नसल्यावरून भाजपकडून प्रश्‍न !

कर्नाटकच्या भाजप सरकारने यापूर्वी शाळांमधून गीता हा स्वतंत्र विषय म्हणून शिकवण्याची घोषणा केली होती; मात्र आता ती नैतिक विषयांतर्गत शिकवण्यावरून भाजपने प्रश्‍न उपस्थित केला आहे. भाजपचे नेते प्रणेश एम्.के. आणि एन्. रविकुमार यांनी विचारले की, गीता शिकवण्याचा कुणी विरोध केलेला नसतांना सरकार स्वतःच्या आश्‍वासनापासून दूर का जात आहे, सरकारला काय अडचण आहे ? सरकार माघार घेत आहे का ?