जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी घेतली आढावा बैठक
सिंधुदुर्ग (जि.मा.का.) – देवगड तालुक्यातील विजयदुर्ग ते देवगड या समुद्री अंतरात १६ सप्टेंबर या दिवशी एक नौका अपघातग्रस्त झाली. रत्नागिरी येथील तटरक्षक दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार या नौकेतून १९ सप्टेंबरपासून तेलगळती होऊ लागली आहे. नौकेपासून ८ चौरस कि.मी. परिसरात हे तेल पसरले आहे. तेलगळतीचे प्रमाण वाढण्याचीही शक्यता असून यामुळे देवगड, मालवण, वेंगुर्ला या किनार्यांसह गोवा राज्यातील किनारेही बाधित होणार आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली असून तेलगळतीच्या अनुषंगाने उपाययोजनाही काढल्या जात आहेत.
जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी या पार्श्वभूमीवर २० सप्टेंबर या दिवशी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक आयोजित करून त्यात एकूणच परिस्थितीचा आढावा घेतला.
या वेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर, पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, प्रादेशिक बंदर अधिकारी संदीप भूजबळ, संबंधित तहसीलदार, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
(सौजन्य : Zee 24 Taas)
या वेळी गोवा येथील राष्ट्रीय समुद्री विज्ञान संस्थेचे वैज्ञानिक डॉ. सुनील यांनी तेलगळतीविषयी माहिती दिली. तेलगळतीच्या पार्श्वभूमीवर तटरक्षक दलाकडून २५० लिटर ‘ऑईल स्पील डीस्परसंट’ची (OSD – एकत्र असलेल्या तेलाचे बारीक कणांमध्ये रूपांतर करणार्या रासायनिक द्रवाची) फवारणी हेलिकॉप्टरमधून करण्यात आली आहे, तसेच येथे स्वच्छता पथकाकडूनही आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत.