तैवानमध्ये भूकंपाचे १०० झटके, जपानला सुनामीची चेतावणी !

तायपेय सिटी (तैवान) – दक्षिण पूर्व आशियातील तैवान देशात १७ आणि १८ सप्टेंबर या दिवशी भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. रविवारी ७.२, तर शनिवारी ६.४ रिक्टर स्केल एवढी भूकंपाची तीव्रता नोंदवण्यात आली. पूर्व तैवानच्या युजिंग भागात हे भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपामुळे हुआलिन परिसरातील अनेक घरांची मोठी हानी झाली असली, तरी जीवितहानी झालेली नाही. यामुळे जपानला सुनामीची चेतावणी जारी करण्यात आली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू हा तैतुंग परिसरात होता.

१. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार भूकंपाचे धक्के इतके जोरदार होते की, अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या, रस्त्यांना मोठे तडे गेले, एक पूल कोसळला, तर एक रेल्वे उलटली.

२. भूकंपामुळे भीतीचे वातावरण असून लोक जीव वाचवण्यासाठी अजूनही घराबाहेच आहेत.

३. यापूर्वी वर्ष २०१६ मध्ये आलेल्या भूकंपात १०० जणांचा मृत्यू झाला होता, तसेच वर्ष १९९९ मध्ये आलेल्या ७.३ तीव्रतेच्या भूकंपात तब्बल २ सहस्र लोक मृत्यूमुखी पडले होते.