मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम
कोल्हापूर – नवरात्रोत्सवाच्या काळात श्री महालक्ष्मी मंदिरात शुल्क भरून प्रत्येक घंट्याला १ सहस्र भाविकांना देवीचे दर्शन घेता येणार आहे. मुख्य दर्शन रांगेला कुठेही अडथळा न आणता ही व्यवस्था करण्यात येणार आहे. देवस्थान समितीने ‘सशुल्क दर्शन’ योजना आखली आहे. या अंतर्गत भाविकांनी २०० रुपये देऊन देवस्थान समितीकडून देण्यात येणारा ‘पास’ विकत घ्यावा आणि देवीचे दर्शन घ्यावे, असा निर्णय जवळपास अंतिम असून अद्याप याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. दर्शन रांग पुढे सरकण्यासाठी कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ‘यंदाच्या नवरात्रोत्सवात २५ लाख भाविक दर्शनासाठी येतील’, असा अंदाज मंदिर प्रशासनाने व्यक्त केला असून त्यांनाही लवकरात लवकर दर्शन घेता येइल यासाठी ‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’च्या वतीने प्रयत्न करण्यात येणार आहेत.
भाविकांचे ऊन-पाऊस, वारा यांपासून रक्षण होण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून मंडप उभारला जाणार आहे. मुखदर्शनासाठी भाविकांना महाद्वारासह सर्व द्वारांतून प्रवेश देण्यात येणार असून त्यासाठी गरुड मंडपाशेजारी रांग लावण्यात येणार आहे. सध्या मंदिरात स्वच्छता चालू असून २१ सप्टेंबरला मंदिराचा गाभारा आणि दागिने यांची स्वच्छता करण्यात येणार आहे. त्यामुळे २१ सप्टेंबरला श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन बंद रहाणार आहे; मात्र देवीची उत्सवमूर्ती सरस्वतीमंदिर येथे ठेवण्यात येणार आहे.
‘सशुल्क दर्शन’ हा न्यायालयाचा अवमान ! – गजानन मुनीश्वर, श्रीपूजक
करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मीदेवीच्या दर्शनासाठी नियमित रांगेच्या व्यतीरिक्त अन्य कोणत्याही मार्गाने दर्शन घेता येत नसून, तशी कोणतीही व्यवस्था करू नये, अशी मार्गदर्शक सूचना दिवाणी न्यायालयाने घोषित केली आहे. हे ठाऊक असूनही पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती भाविकांना ‘सशुल्क दर्शन’ देण्याची पद्धत आरंभणार आहे. त्यामुळे ‘सशुल्क दर्शन’ पद्धत हा प्रकार म्हणजे न्यायालयाचा अवमान आहे, असे मत श्री महालक्ष्मीदेवीचे श्रीपूजक श्री. गजानन मुनीश्वर यांनी व्यक्त केले आहे. ‘यासाठी प्रसंगी न्यायालयात दाद मागू’, अशीही चेतावणी श्री. गजानन मुनीश्वर यांनी दिली आहे.