एका प्रसिद्ध चिनी ‘ॲप’च्या आस्थापनात काम करतांना आलेले अनुभव

चीनधार्जिणी मानसिकता बनवणारी असुरक्षित आणि राष्ट्रविरोधी ‘ॲप्स’!

मी चीनच्या एका प्रसिद्ध भ्रमणभाष (मोबाईल) ‘ॲप’च्या आस्थापनात ११ मास नोकरीच्या निमित्ताने कार्यरत होतो. ‘ऑनलाईन’ अभियान चालवणारे, पत्रकार, प्रसिद्ध व्यक्ती, वैद्य, राजकीय नेते आणि सामाजिक माध्यमांमध्ये वृत्तवाहिनी (चॅनेल) चालवणारे लोक आम्हाला नेहमीच संपर्क करायचे. आम्ही त्यांना या ‘ॲप’ची वैशिष्ट्ये सांगायचो. या आस्थापनात काम करत असतांना मला देशहितविरोधी असलेले अनेक विषय समजले.

या लेखावरून लक्षात येईल की, चीन स्वतःच्या आस्थापनांद्वारे वा ॲप्सच्या माध्यमातून भारताविरोधी कारवाया करत असतो आणि देशातील नागरिकांची मानसिकता कशा प्रकारे चीनधार्जिणी करत आहे. त्यामुळे भारतियांनी चिनी आस्थापने, वस्तू आणि उत्पादने यांवर बहिष्कार घालावा, तसेच केंद्र सरकारने केवळ चिनी ॲप्सवर बंदी घालण्यासह चीनच्या सर्व प्रकारच्या आर्थिक नाड्या आवळायला हव्यात ! – संपादक
प्रतिकात्मक छायाचित्र

१. सहकार्‍यासमवेत चिनी ‘ॲप’वर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी अभियान चालवणे

आस्थापनात विविध ‘ऑनलाईन’ अभियान चालवले जात होते. त्यापूर्वी सर्व कर्मचारी एकत्रित चर्चा करत होते. जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीच्या पूर्वी एकत्रित चर्चा केली गेली. जेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती होती, तेव्हा अशा प्रकारे चर्चा करायचे टाळण्यात आले. माझ्या समवेत एक हिंदुत्वनिष्ठ विचारांचा सहकारी कर्मचारी होता. आम्ही दोघांनी मिळून त्या ‘ॲप’वर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी अभियान चालवले. या अभियानाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

२. ‘ॲप’च्या माध्यमातून ‘पोस्ट’च्या (लिखाणाच्या) प्रतिसादाविषयी खोटी माहिती देणे

भारताचा युवावर्ग भ्रमणभाष ‘ॲप’च्या लवकर आहारी जातो, हे आस्थापनाला चांगले ठाऊक होते. त्यामुळे त्यांनी आपले ‘अल्गोरिथम’(Algorithm) असे ‘सेट’ केले होते की, जो कोणी नवीन ‘यूजर’ (वापरकर्ता) त्या ‘ॲप’मध्ये ‘पोस्ट’ करत असे, त्याची ‘पोस्ट’ ‘लाईक’ (आवडणे), ‘शेअर’ (प्रसारित करणे) आणि ‘व्ह्यू’ (केवळ बघणे)च्या संख्या सामान्य संख्येहून अधिक दाखवत असे. सामाजिक माध्यमांमध्ये सक्रीय असलेल्या काही लोकांना आम्ही हे ‘ॲप’ वापरण्यास सांगितले होते. त्यांनी जेव्हा हे ‘ॲप’ वापरण्यास चालू केले, तेव्हा त्यांनी या ‘ॲप’मध्ये दाखवण्यात येणार्‍या माहितीविषयी शंका व्यक्त केली. या ‘ॲप’वर नियमितपणे पोस्ट करणार्‍या वापरकर्त्यांचे खाते काही काळाने पडताळण्यात येत होते. तेव्हा त्याचे ‘व्ह्यू’, ‘लाईक’ आणि ‘शेअर्स’ अचानक न्यून झाल्याचे दिसत होते.

३. बनावट (खोट्या) नावाने खाते बनवून प्रचार करणे

पुष्कळ लोकांना हे ठाऊक नाही की, ‘ॲप’मध्ये काही बनावट खातीही असतात, जी खुद्द त्या आस्थापनात काम करणारेच बनवत असतात. त्यानंतर त्या बनावट खात्याच्या माध्यमातून ‘ऑनलाईन’ अभियान चालवले जाते. आम्हालाही बनावट खाते देण्यात आले होते. त्यामुळे आम्हीही विविध प्रकारच्या ‘पोस्ट’ करत होतो. हे बनावट खाते एखाद्या काल्पनिक व्यक्तीच्या (स्त्री किंवा पुरुष) नावावर असायचे. त्या खात्यावर ‘प्रोफाईल’ (खातेदाराची माहिती) ही बनावटच बनवली जात होती, उदा. एक खाते केशव गौडा (एक विद्यार्थी) याच्या, तर आणखी एक खाते मंजुळा (एक विवाहित स्त्री) या नावे बनवण्यात आले होते. या बनावट खात्यांविषयी केवळ आस्थापनाच्या विशिष्ट कर्मचार्‍यांनाच माहिती असायची. या खात्यांना आधार बनवून ‘ऑनलाईन’ अभियान चालवले जात होते. त्यावरच आम्ही अनेक ‘पोस्ट’ करत होतो. त्यामुळे हे ‘ऑनलाईन’ अभियान अधिक चर्चेत रहात होते.

४. कर्मचार्‍यांना त्यांच्या भ्रमणभाषमध्ये असुरक्षित ‘ॲप’ डाऊनलोड करून घेण्याचे निर्देश आस्थापनाने देणे

या आस्थापनाने कामकाजासाठी त्यांचे २ असुरक्षित ‘ॲप’ आमच्या भ्रमणभाषमध्ये डाऊनलोड करून घेण्यास भाग पाडले होते. आमच्या भ्रमणभाषमध्ये अधिकोषाचे व्यवहार किंवा अन्य काही वैयक्तिक माहिती होती. ती सर्व माहिती चीनकडे जात होती. हा विषय मला समजल्यावर मी माझे वैयक्तिक आणि कार्यालयासाठी दोन स्वतंत्र भ्रमणभाष वापरणे चालू केले.

५. आस्थापनाने कर्मचार्‍यांना खोटे बोलायला लावणे

मी या आस्थापनात काम करण्यास प्रारंभ केला. त्याच्या ३ मासांनंतर भारत-चीन यांच्यामध्ये गलवान सीमेवर तणावाची परिस्थिती निर्माण झाली. त्या वेळी चिनी वस्तू आणि आस्थापने यांच्यावर बंदी घालण्यासंबंधी संपूर्ण देशभरात आंदोलन चालू होते. या कालावधीत काही ‘यूजर’ मला आणि माझ्या अन्य सहकार्‍यांना दूरभाष करून विचारत, ‘तुमचे आस्थापन (कंपनी) चिनी आहे ना ?’ आम्हाला आस्थापनाने सूचना दिली होती, ‘आस्थापनाचे मूळ चीनचे अवश्य आहे; परंतु त्याची नोंदणी भारतात झाली आहे आणि संपूर्ण कारभाराचे नियंत्रण भारताचे मुख्याधिकारीच करत आहेत’, असे सांगायचे आहे; परंतु सत्य हे होते की, ‘ॲप’शी संबंधित सर्व निर्णय चीनमधील अधिकारीच ठरवत होते.

६. कर्मचार्‍यांच्या मनात चीनधार्जिणी आणि भारतविरोधी भावना निर्माण होणे

आम्ही जेथे काम करतो, तेथील वातावरण आमच्या विचारसरणीवर कसे प्रभाव टाकत आहे ? हे माझ्या लक्षात आले. त्या आस्थापनात काम करणारे जवळजवळ सर्व लोक गलवान सीमेवर चीनच्या सेनेच्या चुकीच्या वागण्याला विरोध करत नव्हते. उलट ‘भारत सरकारच वाढवून चढवून लोकांना खोटी माहिती सांगत आहे’, ‘मतपेटीसाठी सरकार असे करत आहे’, असे त्यांचे विचार होते.

७. भारताने चिनी ॲप्सवर बंदी घातल्यानंतर कर्मचार्‍यांनी सरकारच्या विरोधात विचार करणे 

‘गलवान विवादाला शांत करणे आणि चीनवर आर्थिक दबाव आणणे’, यांसाठी भारत सरकारने चीनच्या प्रमुख ५९ ‘ॲप्स’वर बंदी घातली. बंदी असलेल्या त्या ५९ ‘ॲप्स’मध्ये आमच्या मुख्य २ ‘ॲप्स’चाही समावेश होता. सरकारच्या या निर्णयांनतर कर्मचारी (बहुतांश हिंदू) सरकारच्या विरोधात विचार व्यक्त करत होते. ते ‘आधीच आपल्या देशात बेरोजगारी अधिक आहे. अशा प्रकारे सरकार तरुणांची नोकरी हिसकावून घेत आहे. कोरोना महामारीच्या काळात आम्ही दुसरी नोकरी कशी शोधणार?’, असे नकारात्मक विचार व्यक्त करत होते. याउलट ज्या देशविरोधी आस्थापनाला मी स्वतःच सोडण्याचा विचार करत होतो, त्या आस्थापनाच्या ॲप्सवर भगवंताने पूर्णपणे बंदी लागू केल्यामुळे मला आनंद झाला होता. ‘चिनी आस्थापनात काम करणे, याचा अर्थ धूर्त चीनला आर्थिक साहाय्य करणे आणि भगवंत दुसरी नोकरी निश्चित देतील’, असा माझा सकारात्मक विचार होता.

८. आस्थापनाची पुष्कळ प्रमाणात आर्थिक हानी होणे

भारत सरकारने चिनी ‘ॲप्स’वर बंदी लागू केली. त्यानंतर त्यांच्या अधिकार्‍यांनी सलग ८ मास सरकारशी बोलून बंदी हटवण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले; परंतु सरकारच्या कठोर निर्णयामुळे तसे झाले नाही. सरकारच्या या निर्णयानंतर चीनच्या त्या ‘ॲप’ला पुष्कळ आर्थिक हानी सोसावी लागली. त्रैमासिक बैठकीमध्ये आस्थापनाच्या मुख्याधिकार्‍यानेही हे मान्य केले. बंदी हटवण्याचे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर आस्थापनाने भारताच्या दोन्ही ‘ॲप्स’मधील कर्मचार्‍यांना नोकरीवरून काढले. त्यानंतर गुरुकृपेने मला एका चांगल्या आंतरराष्ट्रीय आस्थापनात नोकरी मिळाली.

चिनी सरकार किंवा चिनी आस्थापन हे स्वार्थ साधण्यासाठी कर्मचारी आणि त्या देशातील नागरिक यांच्याशी कसे वागतात ? (खोटे आणि राष्ट्र्रविरोधी बोलणे), हे त्या आस्थापनात काम करतांना माझ्या लक्षात आले. तंत्रज्ञानाशी संबंधित माहितीशी खेळ करून ती दोन्ही ‘ॲप्स’ भारतात थोड्या अवधीत लोकप्रिय झाली होती, हेही लक्षात आले. त्यामुळे तरुणांनो, जागृत रहा ! चिनी आस्थापने, वस्तू आणि ‘ॲप’ यांपासून सावध रहा !

९. कृतज्ञता

अशा राष्ट्र्रद्रोही आस्थापनातून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी मला सुरक्षितपणे बाहेर काढले आणि त्यांची धूर्त नीती समाजापर्यंत पोचवण्याची संधी दिली, यासाठी मी त्यांच्या श्री चरणी कोटी कोटी कृतज्ञता व्यक्त करतो.’

श्री गुरुचरणार्पणमस्तु !