दायित्व घेऊन सेवा करतांना स्वतःतील अहंचे निरीक्षण करण्याच्या संदर्भात ६४ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. मधुरा भोसले यांनी सांगितलेली मार्गदर्शक सूत्रे !

‘मला दैवी बालसाधकांचा ‘बालसत्संग’ घेण्याची अमूल्य सेवा मिळाली. तेव्हा मला पुष्कळ कृतज्ञता वाटून माझा भाव जागृत झाला. देवाच्या कृपेने मी प्रतिदिन दैवी बालसाधकांचा सत्संग घेण्यास आरंभ केला. त्यानंतर माझ्या मनात ‘मला दैवी बालसाधकांचा सत्संग घेण्याचे दायित्व दिले आहे. मला सतत काही बालसाधकांना शिकवण्यास सांगितले जाते आणि त्यांना साधनेच्या दृष्टीने साहाय्य करण्यास सांगितले जाते. ‘या सर्व गोष्टींमुळे माझा अहं वाढून माझी साधनेत घसरण होणार नाही ना ?’, असे विचार माझ्या मनात येऊ लागले. त्या संदर्भात मी परात्पर गुरुदेवांना अनेक वेळा प्रार्थना केल्या. मी सतत शरणागत भावात रहाण्याचा प्रयत्न केला, तरीही त्या विचारांमुळे मला भीती वाटून माझे हातपाय गळून जायचे. एकदा मी या संदर्भात कु. मधुरा भोसले यांना सांगितले. त्या वेळी त्यांच्या माध्यमातून मला अनेक अनमोल सूत्रे शिकायला मिळाली. ‘हे गुरुदेवा, तुमच्या अनंत कृपेमुळे मधुराताईंच्या माध्यमातून तुम्ही मला जी सूत्रे शिकवली, ती लिहिण्याचा प्रयत्न करत आहे.

४ सप्टेंबर २०२२ या दिवशीच्या अंकात आपण ‘अहं न्यून होण्यासाठी करायचे प्रयत्न’, ‘भावस्थितीत कसे रहावे ?’ आदी सूत्रे पाहिली. आज या लेखाचा पुढील भाग पाहूया.                                          

(भाग २)

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा  : https://sanatanprabhat.org/marathi/609956.html

कु. मधुरा भोसले

६. ‘आपल्यातील अहं वाढू नये’, यासाठी उपयुक्त असणारी पंचसूत्रे 

अ. साधनेच्या ध्येयाची सतत जाणीव ठेवणे

आ. शिकण्याची वृत्ती सतत जागृत ठेवणे

इ. स्वतःच्या कौतुकात न अडकणे

ई. सतत ईश्वरप्राप्तीची तळमळ जागृत ठेवणे

उ. आध्यात्मिक त्रास होत असल्यास नियमितपणे नामजपादी उपाय करणे

यांतील ‘प्रत्येक सूत्र हे देवाचे स्वरूप आहे. देवाच्या अमूल्य अशा या पाच सूत्रांचे प्रतिदिन चिंतन केल्यावर आपल्याला सतत शिकण्याच्या स्थितीत रहाता येऊन देवाचे विचार ग्रहण करता येतील’, असे मला जाणवले.

कु. अपाला औंधकर

७. स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन अन् गुणसंवर्धन करण्याचे महत्त्व

‘गुण’ हे देवस्वरूप असतात, तर आपल्यातील स्वभावदोष आणि अहं हे असुरांसारखे असतात. त्यामुळे आपल्यातील स्वभावदोष आणि अहं यांच्याशी संबंधित प्रसंग घडल्यामुळे आपल्याला दुःख होते किंवा आपल्याला त्रास होतो. गुणसंवर्धनाच्या प्रक्रियेत आनंद आहे. आपल्यातील सात्त्विकता वाढल्यामुळे आपले स्वभावदोष आणि अहं यांचे प्रमाण न्यून होऊन आपल्याला होणारा आध्यात्मिक त्रासही न्यून होऊ लागतो. स्वतःतील सात्त्विकता वाढण्यासाठी आपण प्रतिदिन साधना करायला हवी. आपण प्रतिदिन करत असलेल्या साधनेमुळे आपल्या मनाचे मंथन होते. ज्याप्रमाणे समुद्रमंथनातून अमृत बाहेर पडले, त्याप्रमाणेच देवच आपल्यातील स्वभावदोष आणि अहं यांना घुसळून गुणरूपी अमृत बाहेर काढतो.

त्यामुळे ‘समष्टी सेवेचे दायित्व’ या विचारामुळे आपल्याला ताण किंवा भीती वाटत असेल, तर ते अयोग्य आहे. त्यापेक्षा ‘समष्टी सेवेचे दायित्व, म्हणजे समष्टीकडून सतत शिकत रहाणे’, असा विचार आपल्या मनात आला, तर आपल्याला आनंद मिळतो. आपण जसे व्यष्टी साधनेकडून समष्टी साधनेकडे जाऊ लागतो, तशी आपली आध्यात्मिक उन्नती होऊ लागते.

८. साधकाला सेवेचे दायित्व देण्यामागील ईश्वराचे नियोजन

‘दायित्व’ म्हणजे ईश्वराच्या नेतृत्व या गुणासह अनेक गुण वाढवण्याची संधी आणि दायित्व म्हणजे शिकणे.’ ईश्वराशी एकरूप होण्यासाठी त्याच्यातील गुण आपल्यात येणे आवश्यक आहे. ईश्वराचे ‘नेतृत्व, प्रेमभाव, नियोजनकौशल्य’ इत्यादी गुण आपल्यात येण्यासाठी आपल्याला एखाद्या सेवेचे दायित्व दिलेले असते. आपण दायित्व घेतल्यामुळे स्वतःचे विचार न्यून होऊन आपण इतरांचा विचार करू लागतो आणि हळूहळू आपण व्यापक होऊ लागतो. दायित्व घेऊन सेवा केल्यामुळे आपल्याकडून समष्टी साधना होते आणि आपल्यात ईश्वराचे अनेक गुण येतात. त्यामुळे आपली वाटचाल मनुष्यत्वाकडून ईश्वराकडे होते.

मी आधी केवळ नृत्य करायचे. तो आनंद माझ्यापुरताच सीमित असायचा; परंतु दैवी बालकांचा सत्संग घेण्याचे दायित्व माझ्याकडे आल्यावर माझ्यातील ‘शिकण्याची वृत्ती’ हा गुण वाढू लागला.

९. परात्पर गुरु डॉ. आठवले हे साक्षात् परमेश्वरस्वरूप असून त्यांच्या प्रत्येक कृतीतून आपल्याला पुष्कळ शिकण्यासारखे असणे

परात्पर गुरु डॉ. आठवले हे साक्षात् परमेश्वरस्वरूप आहेत. त्यांच्या प्रत्येक कृतीतून आपल्याला पुष्कळ शिकण्यासारखे आहे. ‘आपण दायित्व घेऊन समष्टी सेवा करतांना आपला अहं न वाढता आपल्यातील गुण कसे वाढतील ?’, या दृष्टीने ते मार्गदर्शन करतात. त्यामुळे ‘दायित्व घेतल्याने साधक खर्‍या अर्थाने घडतो’, हे मला शिकायला मिळाले.

१०. भक्त आणि भगवंत यांच्यातील नाते

‘भक्त आणि भगवंत’ या दोघांमध्ये ‘कर्तेपणा’ नसल्यामुळे ते प्रत्येक चांगल्या कृतीचे किंवा यशाचे श्रेय एकमेकांना देतात. आपणही गुरुदेवांच्या समवेत बोलत असतांना हीच अनुभूती घेतो. आपल्याला आलेल्या चांगल्या अनुभूतीचे श्रेय आपण परात्पर गुरु डॉक्टरांना देतो आणि ते याचे श्रेय आपल्यातील भाव अन् तळमळ या गुणांना देतात.

११. आज्ञापालन केल्यामुळे आपला अहं न वाढणे

आपले गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) जे काही आपल्याला सांगतात, ते कृतीत आणावे. गुरूंचे आज्ञापालन त्वरित करण्यातच आपली साधना होते. तेच आपल्याला गुर्वाज्ञापालन करण्याचे सामर्थ्यही देतात. त्यामुळे आपल्याला एखादी सेवा दायित्व घेऊन करण्यास सांगितल्यावर ती संपूर्ण श्रद्धेने करावी. त्यामुळे आपला अहं वाढणार नाही.

१२. देवच साधकात समष्टी सेवा करण्याची क्षमता निर्माण करत असल्यामुळे देवाप्रती सतत शरणागतभावात आणि कृतज्ञताभावात रहाणे आवश्यक असणे

देव आपल्याला आपल्या क्षमतेपेक्षा थोडी अधिक सेवा करण्याची संधी देतो. त्यामुळे आपल्याला स्वतःची मर्यादा लक्षात येऊन आपण देवालाच शरण जातो. त्यातून देवच आपल्याला शरणागतीचे महत्त्व लक्षात आणून देतो. त्यानंतर ‘देवच आपली क्षमता हळूहळू वाढवून आपल्याकडून सेवा किंवा कार्य पूर्ण करवून घेतो’, अशी आपण अनुभूती घेतो. कोणतीही सेवा करतांना आपल्या मनात ‘हे माझ्यामुळे झाले’, असा विचार आला, तर मनाला सतत ‘ते देवाच्या कृपेने झाले’, ही जाणीव करून द्यावी आणि सतत शरणागतभाव जागृत ठेवायला हवा. ‘कृतज्ञताभाव आणि शरणागतभाव’ एकमेकांना पूरक आहेत. ‘सतत कृतज्ञताभाव आणि शरणागतभाव अनुभवणे’ यालाच ‘भावस्थिती अनुभवणे’, असे म्हणतात. भक्तीयोगी संतांची २४ घंटे अशी स्थिती असते.

१३. कु. मधुरा भोसले अनमोल ज्ञान सांगत असतांना दोघींना (मला (अपाला) आणि ताईला (कु. मधुरा हिला)) आलेल्या अनुभूती

अ. ताई सांगत असतांना माझा गुरुदेवांप्रतीचा कृतज्ञताभाव वाढून मला पुष्कळ आनंद मिळू लागला.

आ. मला ताई सूत्रे सांगत असतांना वातावरणात थंडावा जाणवत होता आणि शेवटी थंडाव्याचे प्रमाण वाढले. आमचे बोलून झाल्यावर मी ही अनुभूती ताईला सांगितली. तेव्हा तिनेही तिला वातावरणात थंडावा जाणवत असल्याचे सांगितले.

इ. आमच्याभोवती एका दिव्य लोकाचे वातावरण निर्माण झाले होते.

ई. मधुराताई सांगत असलेली ज्ञानविषयक सूत्रे ऐकतांना मला ‘चमेली’ या अत्तराचा दिव्य सुगंध आला. ही अनुभूती ताईला सांगितल्यावर ती म्हणाली, ‘‘मला ‘हिना’ या अत्तराचा दिव्य सुगंध येत होता.’’

या सर्व अनुभूतींमुळे ‘मधुराताईच्या माध्यमातून ज्ञान मिळणे’, ही देवाचीच एक कृपा आहे’, हे शिकायला मिळाले. ‘देव माझ्या समवेत कसा आणि कोणकोणत्या सूक्ष्म रूपांत लपला आहे’, हे पहाण्याची संधी, म्हणजेच हे ज्ञान होते. देवाने आम्हाला अनुभूती दिल्या, म्हणजे तो प्रत्यक्षात तिथे उपस्थित होता. त्यानेच मला हा आनंदरूपी उपहार दिला.

१४. कृतज्ञता

‘हे गुरुदेवा, माझ्या मनातील ‘प्रत्येक शंका, अडचणी, स्वभावदोष आणि अहं’ यांच्या विचारांतून मुक्त होण्यासाठी तुम्ही मला किती भरभरून ज्ञान देत आहात !’, याची मी कल्पना करू शकत नाही. मी केवळ तुमच्या ब्रह्मांडव्यापी चरणी कृतज्ञताच अर्पण करू शकते. हे भगवंता, माझा केवळ स्थूलदेह आहे. माझ्या माध्यमातून तुम्हीच कार्य करत आहात, त्याबद्दल मी तुमच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’                  (समाप्त)

– कु. अपाला औंधकर (वय १४ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), फोंडा, गोवा. (१८.१०.२०२१)

संपादकीय भूमिका

दायित्व घेऊन सेवा केल्यामुळे साधकाकडून समष्टी साधना होते आणि त्याच्यात ईश्वराचे अनेक गुण येतात !

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक