उझबेकिस्तानमध्ये पंतप्रधान मोदी यांची पुतीन आणि एर्दोगन यांच्याशी भेट !

‘शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन’च्या बैठकीला उपस्थित !

पंतप्रधान मोदी (डावीकडे) आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन

समरकंद (उझबेकिस्तान) – येथे ‘शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन’ म्हणजेच ‘एस्.सी.ओ.’ची एक दिवसीय बैठक १६ सप्टेंबर या दिवशी पार पडली. बैठकीला उपस्थित रहाण्यासाठी १५ सप्टेंबरच्या रात्री पोचलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उझबेकिस्तानच्या राष्ट्रपतींनी स्वागत केले. रशियाशी संबंध सशक्त करणे, चीनच्या वर्चस्वाला लगाम आणि पाकिस्तानला उत्तर देणे, तसेच मध्य आशियाई देशांशी सहकार्य वाढवणे या तीन गोष्टींच्या अनुषंगाने यंदाच्या या बैठकीत भारताने त्याचा सहभाग नोंदवला.

१. पंतप्रधान मोदी यांचे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन, तुर्कीयेचे राष्ट्रपती एर्दोगन, इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी आणि उझबेकिस्तानचे अध्यक्ष शावकत मिर्जिओयेव यांच्याशी द्विपक्षीय बैठका झाल्या.

२. पंतप्रधान मोदी यांच्या पुतीन यांच्यासमवेतच्या बैठकीत दोन्ही नेत्यांनी रशिया-युक्रेन युद्ध, तसेच अन्नसुरक्षा यांसारख्या महत्त्वाच्या सूत्रांवर चर्चा केली. रशियाने जारी केलेल्या निवेदनानुसार, सामरिक स्थैर्य, आशिया-पॅसिफिक क्षेत्रातील परिस्थिती या सूत्रांवर चर्चा झाली. यासमवेतच पंतप्रधान मोदी यांनी कोणत्याही अडथळ्याखेरीज स्वस्त कच्च्या तेलाच्या पुरवठ्यासंदर्भात पुतीन यांच्याशी चर्चा केली.

पंतप्रधान मोदी आणि तुर्कीयेचे राष्ट्रपती एर्दोगन(उजवीकडे)

३. भारतातील रशियाचे राजदूत डेनिस अलिपोव्ह यांनी १५ सप्टेंबरला सांगितले होते की, भारताला कच्च्या तेलाचा पुरवठा चालूच राहील. यावर्षी तो एका नवीन विक्रमाला स्पर्श करील. भारताला स्वस्त तेलाची आवश्यकता आहे, तर रशियाला नवीन बाजारपेठ हवी आहे.

४. पंतप्रधान मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट होईल कि नाही, याविषयी अद्याप गुप्तता पाळली जात असून भेट झाली, तर भारत अन् चीन यांच्यातील सीमावाद अधिक तीव्र झाल्यानंतर मोदी-जिनपिंग यांची ही पहिलीच भेट असेल.

भारत जगातील सर्वांत मोठ्या अर्थव्यवस्थेपैकी एक ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान मोदी यांनी या संमेलनाला उद्देशून भाषण करतांना म्हटले की, यावर्षी भारताची अर्थव्यवस्था ७.५ टक्के दराने वाढण्याची शक्यता आहे. मला आनंद आहे की, भारत जगातील सर्वांत मोठ्या अर्थव्यवस्थेमधील एक अर्थव्यवस्था आहे. आम्ही प्रत्येक क्षेत्रामध्ये गुंतवणुकीचे समर्थन करत आहेत. आज भारतात ७० सहस्रांहून अधिक ‘स्टार्ट अप’ (नवीन उद्योगधंदे) आहेत. यात १०० हून अधिक वैशिष्टपूर्ण आहेत. यामधील आमच्या अनुभवाचा लाभ शांघाय कोऑपरेशनमधील देशांना होऊ शकतो. यासाठी आम्ही ते सर्वांना उपलब्ध करून देऊ इच्छितो.

काय आहे ‘शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन’ ?

‘शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन’ ही राजकीय, आर्थिक आणि सुरक्षा संस्था आहे. वर्ष २००१ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेचे ८ स्थायी देश असून त्यामध्ये भारत, रशिया, चीन, कझाकस्तान, किर्गिस्तान, उझबेकिस्तान, ताजिकिस्तान आणि पाकिस्तान यांचा समावेश आहे. भारत आणि पाकिस्तान हे वर्ष २०१७ मध्ये या संस्थेत सहभागी झाले. याखेरीज आर्मेनिया, अझरबैजान, कंबोडिया, नेपाळ, श्रीलंका आणि तुर्किये हे ६ देश या संस्थेचे संवाद भागीदार आहेत, तर अफगाणिस्तान, इराण, बेलारूस आणि मंगोलिया त्याचे निरीक्षक सदस्य आहेत.