रा.स्व. संघाचे मुखपत्र ‘ऑर्गनायझर’च्या पत्रकाराला शिरच्छेदाची धमकी

इस्लामविरोधातील प्रसार बंद करण्याची धमकी

उजवीकडे ऑर्गनायझर’चे पत्रकार निशांत आझाद

गाझियाबाद (उत्तरप्रदेश) – रा.स्व. संघाचे मुखपत्र असणार्‍या ‘ऑर्गनायझर’चे पत्रकार निशांत आझाद यांना अज्ञाताकडून शिरच्छेद करण्याची धमकी देण्यात आली आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर संदेश पाठवून ही धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस चौकशी करत आहेत.

१. धमकीच्या संदेशात म्हटले आहे, ‘महंमद पैगंबर यांचा अवमान करण्याची एकच शिक्षा म्हणजे शिरच्छेद होय. इस्लामच्या विरोधातील प्रसार बंद करा. हिंदुत्वनिष्ठांचे समर्थन केले, तर शिरच्छेद केला जाईल.’ या वेळी निशांत यांनी धमकी देणार्‍याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला त्या वेळी त्याने सांगितले, ‘मी तुमच्याविषयी सर्व काही जाणून आहे. जर याच प्रकारे अवमानकारक लिखाण केले, तर त्याचे परिणाम भोगावे लागतील.’ या वेळी त्याने कन्हैयालाल आणि उमेश कोल्हे यांचाही उल्लेख केला. या दोघांना पैगंबर यांचा कथित अवमान केल्यावर त्यांना धर्मांधांनी ठार मारले होते.

२. काँग्रेसने काही दिवसांपूर्वी रा.स्व. संघाच्या खाकी चड्डीचे छायाचित्र पोस्ट करून ती एका कोपर्‍यात जळतांना दाखवली होती. त्याला निशांत यांनी विरोध करणारी पोस्ट प्रसारित केली होती. ही पोस्ट या धमकी देणार्‍याने पाठवत निशांत यांना धमकी दिली.

संपादकीय भूमिका 

आता हिंदुत्वाची बाजू घेणार्‍या पत्रकारांनाही अशा प्रकारे धमक्या येत आहेत. याची सरकारने नोंद घेऊन संबंधितांच्या विरोधात कृती करणे आवश्यक !