बिहारच्या राष्ट्रीय महामार्गावर दोघांच्या अंदाधुंद गोळीबारात १ जण ठार, तर ९ जण घायाळ : ७ पोलीस निलंबित

बिहारमधील जंगलराज !

बेगुसराय (बिहार) – येथे राष्ट्रीय महामार्गावर दुचाकीवरून आलेल्या दोघा अज्ञातांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबार एकाचा मृत्यू झाला, तर ८ जण घायाळ झाले. या दोघांनी महामार्गावर सुमारे ३० किलोमीटरपर्यंत गोळीबार केला. यामध्ये अयोध्या चौकाजवळ गोळी लागल्याने एका व्यक्तीचा रस्त्यातच मृत्यू झाला, तर बाचवारा, फुलवारिया, बरौनी आणि चकिया भागात ८ जण घायाळ झाले. सर्वांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. हे दोघेही गोळीबार करत समस्तीपूरच्या दिशेने पळून गेले. गोळीबाराच्या घटनेनंतर परिसरात पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे.

याविषयी अतिरिक्त पोलीस महासंचालक जितेंद्रसिंह गंगवार यांनी सांगितले की, गुन्हेगारांची ओळख पटवण्यासाठी आणि अटक करण्यासाठी सीसीटीव्हीच्या छायाचित्रणाचे साहाय्य घेतले जात आहे. या प्रकरणी हलगर्जीपणा केल्यावरून ७ पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. (केवळ निलंबन नको, अशांवर कठोर कारवाई करा ! – संपादक)