पाकिस्तानच्या सिंध प्रांतात पोलिसाच्या भयाने हिंदु युवकाचा विहिरीत उडी मारल्याने मृत्यू !

पोलिसांकडून युवकाच्या मृत्यूची ‘आत्महत्या’ म्हणून नोंद !

हैद्राबाद (पाकिस्तान) – येथे कादिर नावाच्या एका पोलिसाच्या भयाने आलम कोहली नावाच्या हिंदु युवकाने विहिरीत उडी मारली. त्यात त्याचा बुडून मृत्यू झाला. आलमच्या पीडित परिवाराने कादिर याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी मात्र आलमच्या मृत्यूची नोंद ‘आत्महत्या’ म्हणून केली आहे. प्रत्यक्षात मात्र कादिर हा आलमच्या मागे धावत असल्याचे दोन सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. घटना ८ सप्टेंबरची असून सिंध प्रांतातील टंडो महंमद खान या क्षेत्रातील आहे.

पीडित हिंदु परिवाराचे म्हणणे आहे की, घटनेच्या दिवशी आलम कोहली आणि कादिर यांच्यामध्ये एका रुग्णालयात भांडण झाले. त्याचे रूपांतर शिवीगाळ करण्यात झाले. त्यानंतर कादिर आलमला मारण्यासाठी धावला. त्याच्यापासून स्वत:चे रक्षण करण्यासाठी आलमने जवळच्या विहिरीत उडी मारली. आलमला पोहता येत नसल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. या घटनेचा विरोध करण्यासाठी पीडित हिंदु परिवाराने हैद्राबाद-सुजवल रस्ता थांबवला आणि आरोपी कादिरच्या विरोधात गुन्हा नोंदवण्याची मागणी केली.

संपादकीय भूमिका

पाकिस्तानात सरकारी पक्ष, पोलीस, प्रशासन आणि तेथील मुसलमान जनता हिंदूंच्या विरोधात आहे. तेथील असाहाय्य हिंदूंना कुणीच वाली उरला नसल्याने त्यांच्यावर सातत्याने आक्रमणे होत आहेत, हे लक्षात घ्या ! हे थांबवण्यासाठी भारत ‘हिंदु राष्ट्र’ म्हणून घोषित होणे, हा एकमेव पर्याय आहे, हे जाणा !