#Datta Datta #दत्त दत्त #श्रीदत्त श्रीदत्त #ShriDatta ShriDatta #mahalaya mahalaya #महालय महालय #pitrupaksha pitrupaksha #पितृपक्ष पितृपक्ष #shraddha shraddha #श्राद्ध श्राद्ध #ShraddhaRituals Shraddha rituals #श्राद्धविधी श्राद्धविधी #Shraddhavidhi Shraddha vidhi
पितृपक्ष : भाद्रपद कृष्ण प्रतिपदा ते भाद्रपद अमावस्या
प्रतिवर्षी श्राद्धविधी करणे हा हिंदु धर्मातील एक महत्त्वाचा आचारधर्म असून त्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. पुराणकाळापासून चालत आलेल्या या विधीचे महत्त्व आपल्या ऋषीमुनींनी अनेक धर्मग्रंथांतून लिहून ठेवले आहे. श्राद्धविधी करण्याचे महत्त्व आणि त्याची आवश्यकता या लेखातून आपण जाणून घेऊया.
१. श्राद्ध करणे, हा धर्मपालनाचाच भाग असणे
‘देव, ऋषी आणि समाज या तीन ऋणांसह पितृऋण फेडणे, हेही तितकेच महत्त्वाचे आहे. पितरांविषयी आदर बाळगणे, त्यांच्या नावे दानधर्म करणे आणि त्यांना संतोष होईल अशी कृत्ये करणे, हे वंशजांचे कर्तव्य आहे. श्राद्ध करणे, हा धर्मपालनाचाच एक भाग आहे’, असे धर्मशास्त्र सांगते.
२. ‘पितर त्यांच्या पुत्रांनी पिंडोदक (पिंड आणि उदक) दिल्यावरच सुखी आणि संतुष्ट होतात. यासंदर्भात ‘पुत्र कोणाला म्हणावे’, याविषयी महाभारतात दिलेला श्लोक पुढीलप्रमाणे आहे.
पुन्नाम्नो नरकाद्यस्मात् त्रायते पितरं सुतः ।
तस्मात्पुत्र इति प्रोक्तः स्वयमेव स्वयम्भुवा ।। – महाभारत १.७४.३९
अर्थ : मुलगा हा आपल्या पितरांचे (पूर्वजांचे) पुं नामक नरकापासून रक्षण करतो; म्हणून त्याला स्वतः ब्रह्मदेवानेच ‘पुत्र’ म्हटले आहे. या श्लोकानुसार पितरांना सद्गती लाभावी, त्यांना भोगाव्या लागणार्या अनंत यातनांतून त्यांची सुटका व्हावी आणि पितरांनी पितृलोकातून वंशावर कृपादृष्टी ठेवावी, यांसाठी पुत्राने श्राद्धादी विधी करावेत. स्वतःला पुत्र म्हणवणार्यांचे ते कर्तव्यच आहे, हे स्पष्ट होते.
३. देवकार्य आणि पितृकार्य टाळू नये
देवपितृकार्याभ्यां न प्रमदितव्यम् । – तैत्तिरीयोपनिषद् १, अनुवाक ११, वाक्य २
अर्थ : देवकार्य आणि पितृकार्य यांत कधीही प्रमाद करू नये. ती कार्ये टाळू नयेत.
४. श्राद्धविधी न करणार्यांच्या संदर्भात गीतेतील पुढील श्लोक चिंतनीय आहे
पतन्ति पितरो ह्येषां लुप्तपिण्डोदकक्रियाः । – श्रीमद्भगवद्गीता, अध्याय १, श्लोक ४२
अर्थ : अशांचे (श्राद्धविधी न करणार्यांचे) पितर पिंडश्राद्धतर्पणादी क्रिया न केल्यामुळे नरकात जातात. याचाच परिणाम म्हणून आपला अभ्युदय होत नाही.
५. श्राद्धापेक्षा अधिक श्रेयस्कर अन्य काही नाही
सुमंतुऋषी सांगतात, `श्राद्धात् परतरं नान्यत् श्रेयस्करमुदाहृतम् ।’ म्हणजे श्राद्धापेक्षा अधिक श्रेयस्कर अन्य काही नाही. याकरिताच विवेकी माणसाने श्राद्ध कधी टाळू नये.
६. देवकार्यापेक्षा अधिक महत्त्वाचे पितृकार्य
ब्रह्मवैवर्तपुराण सांगते, `देवकार्यापेक्षा अधिक महत्त्वाचे पितृकार्य आहे’; म्हणूनच सर्व मंगल कार्यांतही नांदी श्राद्धाचे विधान सर्वप्रथम असते.
७. श्राद्ध करणार्याच्या कुळात कोणी दुःखी रहात नाही
ब्रह्मपुराण सांगते, `जी व्यक्ती विधीपूर्वक आपल्या आर्थिक स्थितीनुरूप श्राद्ध करते, ती ब्रह्मदेवापासून तृणापर्यंत सर्व जिवांना तृप्त करते. श्राद्ध करणार्याच्या कुळात कोणी दुःखी रहात नाही.’
८. वासना-अतृप्ती
‘एखाद्या मृत व्यक्तीची ‘आपले श्राद्ध व्हावे’, अशी इच्छा असली आणि अपेक्षितांकडून ती पूर्ण झाली नाही, तर वासना-अतृप्तीचे दुःख त्याला होते. असा एखादा मृतात्मा पिशाच (अनिष्ट शक्तीचा एक प्रकार) होऊन श्राद्ध न केल्याचा राग नातेवाइकांवर काढण्याची शक्यता असते. काही वेळा मृतात्मा नातेवाइकामध्ये प्रकट होऊन बोलतो. याचे एक उदाहरण पुढे दिले आहे.
एकदा एका माणसाच्या अंगात आले आणि तो उड्या मारू लागला. अहमदनगरच्या प.पू. क्षीरसागर महाराजांनी विचारले, ‘आपण कोण ?’ त्याने उत्तर दिले, ‘मी या व्यक्तीचा वडील आहे.’ महाराजांनी विचारले, ‘आपण का आलात ?’ अंगात आलेल्या वडिलांनी सांगितले, ‘हा मला जेऊ घालत नाही, श्राद्ध करत नाही. मी उपाशी आहे.’
९. प्रत्येकासाठी श्राद्ध करणे हेच योग्य
एखाद्याला ‘श्राद्धामध्ये काही अर्थ नाही; म्हणून आपण निवर्तल्यावर आपल्यासाठी श्राद्ध करायला नको’, असे वाटत असेल आणि मृत्यूनंतर श्राद्ध न केल्याने ‘आपण अडकलो आहोत’, अशी जाणीव झाली, तरी तो तसे सांगू शकत नाही. इच्छा पूर्ण न झाल्याने तो दुःखी होऊ शकतो. हे लक्षात घेऊन प्रत्येकासाठी श्राद्ध करणे हेच योग्य आहे.
१०. देवाणघेवाण हिशोब श्राद्ध केल्याने पूर्ण होतो
एखाद्या व्यक्तीशी असलेला देवाणघेवाण हिशोब श्राद्ध केल्याने पूर्ण होतो, उदा. आपण एखाद्याचे देणे द्यायच्या आतच तो जग सोडून गेला, तर त्याचे देणे देऊन टाकण्यासाठी त्याचे श्राद्ध करावे.
११. अतृप्त पूर्वजांच्या लिंगदेहांमुळे त्रास होणे
सध्याच्या काळात पूर्वीप्रमाणे कोणी श्राद्धादी विधी, तसेच साधनाही करत नसल्याने बहुतेक सर्वांनाच अतृप्त पूर्वजांच्या लिंगदेहांमुळे त्रास होतो. आपल्याला पूर्वज त्रास देत आहेत किंवा पूर्वजांमुळे त्रास होण्याची शक्यता आहे, याविषयी उन्नतच (संतच) सांगू शकतात. तसे सांगणारे उन्नत न भेटल्यास पुढे दिल्याप्रमाणे काही त्रास पूर्वजांमुळे होऊ शकतात. घरात सातत्याने भांडणे होणे, एकमेकांशी न पटणे, नोकरी न मिळणे, घरात पैसा फार काळ न टिकणे, एखाद्याला गंभीर आजार होणे, सर्व परिस्थिती अनुकूल असूनही लग्न न होणे, पती-पत्नीचे न पटणे, गर्भधारणा न होणे, गर्भधारणा झाल्यास गर्भपात होणे, अपत्य जन्माला आल्यास मतीमंद किंवा विकलांग जन्माला येणे आणि कुटुंबातील एखाद्याला व्यसन लागणे.
श्राद्धविधी केल्याने पितर संतुष्ट होतात. त्यामुळे त्यांचे आशीर्वाद लाभतात. तसेच मर्त्यलोकात अडकलेल्या पूर्वजांना गती मिळाल्याने त्यांच्यामुळे होणार्या त्रासांचे निवारण होते.
१२. श्राद्ध केल्याने पितरांना गती मिळत असल्याने ते सातत्याने करणे आवश्यक
मृत व्यक्तीच्या तिथीला श्राद्ध केल्यामुळे ते अन्न तिच्या सूक्ष्म-देहाला वर्षभर पुरते. जोपर्यंत इच्छा-आकांक्षा असतात, तोपर्यंत ती मृत व्यक्ती त्या तिथीला आपल्या वंशजांकडून अन्न मिळण्याची अपेक्षा ठेवते. श्राद्ध केल्याने त्यांची इच्छापूर्ती तर होतेच, तसेच त्यांना पुढे जाण्यासाठी ऊर्जाही मिळते. पूर्वजांची एखादी जरी वासना तीव्र असली, तरी श्राद्धविधींद्वारे मिळणारी ऊर्जा त्यांच्या वासनापूर्तीसाठीच वापरली गेल्याने पितरांना पुढे जाण्यास गती मिळत नाही. त्यामुळे सातत्याने श्राद्ध केल्याने हळूहळू त्यांची वासना न्यून होत जाऊन ते गतीस प्राप्त होऊ शकतात. तसेच शास्त्रनियमाप्रमाणे आपण हयात असेपर्यंत पितरांप्रती कृतज्ञता म्हणून प्रतिवर्षी श्राद्ध करणे, हेच योग्य आहे.
१३. ‘पितरांचा आध्यात्मिक स्तर ५० प्रतिशत आहे’, असे ठाऊक असूनही श्राद्धपक्षादी विधी करण्याची कारणे
अ. कलियुगात रज-तमाच्या आधिक्यामुळे साधना करणार्यांचे प्रमाण अल्प असते. त्यामुळे अतृप्त इच्छांमुळे जिवाला पुढची गती मिळत नाही. तसेच साधनेचे बळ नसल्याने जीव गटांगळ्या खात रहातो. श्राद्धपक्षादी विधी न केल्यास पूर्वजांना गती मिळत नाही. तसेच तीर्थक्षेत्री श्राद्ध केले, तरी ज्या पितरांची पुढील गती मिळण्याची वेळ जवळ आली असेल, तेवढ्याच पूर्वजांना त्या वेळी गती मिळते. त्याव्यतिरिक्त इतर पूर्वजांसाठी प्रतिवर्षी श्राद्ध करणे आवश्यक असते.
आ. ज्या पितरांचा स्तर अधिक असतो, त्यांच्यासाठी धर्मशास्त्रात सांगितले आहे; म्हणून आणि समाजासमोर धार्मिक विधींचा आदर्श ठेवण्यासाठी श्राद्ध करावे; कारण स्तरापेक्षा धर्मपालन महत्त्वाचे असते. पितरांचा स्तर किती आहे, हे सांगणारेही समाजात नसतात.
इ. काही संत समाजासमोर आदर्श रहावा, यासाठी स्वतः देवपूजा करतात. खरेतर त्यांना स्थुलातून देवपूजा करण्याची आवश्यकता नसते, तसे हे आहे. वरील उत्तरे लक्षात घेऊन सर्वांनी धर्मपालन म्हणून श्राद्धपक्षादी विधी करावेत.’
संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘श्राद्ध’
१४. श्राद्धासंबंधी प्राचीन ग्रंथांतील संदर्भ
हिंदु धर्मामध्ये मृत पितरांना पुढची गती मिळावी, यासाठी श्राद्धविधी करण्यास सांगितला आहे. श्राद्ध न केल्यास कोणते दोष संभावतात, याचेही वर्णन विविध धर्मग्रंथांत आले आहे.
अ. ऋग्वेद
त्वमग्न ईळितो जातवेदोऽवाड्ढव्यानि सुरभीणि कृत्वी ।
प्रादाः पितृभ्यः स्वधया ते अक्षन्नद्धि त्वं देव प्रयता हवींषि ॥
– ऋग्वेद, मण्डल १०, सूक्त १५, ऋचा १२
अर्थ : हे सर्वज्ञ अग्निदेवा, आम्ही तुझी स्तुती करतो. तू आम्ही दिलेले हे हवनीय द्रव्य सुगंधित करून आमच्या पितरांना पोहोचव. आमचे पितर स्वधा म्हणून दिलेल्या हवनीय द्रव्याचे भक्षण करोत. हे देवा, तूसुद्धा आम्ही प्रयत्नपूर्वक अर्पण केलेल्या या हविर्भागाचे भक्षण कर.
आ. कूर्मपुराण
अमावास्यादिने प्राप्ते गृहद्वारं समाश्रिताः ।
वायुभूताः प्रपश्यन्ति श्राद्धं वै पितरो नृणाम् ॥
यावदस्तमयं भानोः क्षुत्पिपासासमाकुलाः ।
ततश्चास्तङ्गते भानौ निराशादुःखसंयुताः ॥
निःश्वस्य सुचिरं यान्ति गर्हयन्तः स्ववंशजम् ।
जलेनाऽपि च न श्राद्धं शाकेनापि करोति यः ॥
अमायां पितरस्तस्य शापं दत्वा प्रयान्ति च ॥
– कूर्मपुराण
अर्थ : (मृत होऊन) वायूरूप झालेले पितर अमावास्येच्या दिवशी आपल्या वंशजांच्या घरी येऊन आपल्याला श्राद्ध वाढले जात आहे का, हे पहातात. सूर्य मावळेपर्यंत तहान-भुकेने (अतृप्त वासनांमुळे) व्याकुळ झालेले पितर श्राद्ध न मिळाल्याने सूर्यास्त झाल्यावर निराश होतात आणि दुःखी निःश्वास टाकून स्वतःच्या वंशजांना चिरकाल दोष देतात. अशा वेळी जो पाण्याने अथवा भाजीनेही श्राद्ध वाढत नाही, त्याला अमावास्येच्या दिवशी त्याचे पितर शाप देऊन निघून जातात.
इ. आदित्यपुराण
न सन्ति पितरश्चेति कृत्वा मनसि वर्तते ।
श्राद्धं न कुरुते यस्तु तस्य रक्तं पिबन्ति ते ॥
– आदित्यपुराण
अर्थ : मेल्यावर पितरांचे अस्तित्व नसते, असा विचार करून जो श्राद्ध करत नाही, त्याचे रक्त त्याचे पितर पितात.
ई. मार्कण्डेयपुराण
श्राद्ध न केल्यामुळे प्राप्त होणारे दोष
न तत्र वीरा जायन्ते नाऽऽरोग्यं न शतायुषः ।
न च श्रेयोऽधिगच्छन्ति यत्र श्राद्धं विवर्जितम् ॥
– मार्कण्डेयपुराण
अर्थ : जेथे श्राद्ध केले जात नाही, त्या घरी मुलगा (वीराः) होत नाही (झाल्या, तर सर्व मुलीच होतात.), तेथील लोकांना आरोग्य लाभत नाही. तेथील लोकांचे आयुष्य न्यून होते (न शतायुषः), त्यांना अर्थिक अडचणी संभवतात अथवा समाधान लाभत नाही (न च श्रेयः).
संदर्भ : श्राद्धकल्पलता, पृष्ठ ६
या संदर्भांवरून श्राद्धादी कर्मे न केल्यास पितर रुष्ट होतात आणि त्यांच्या वंशजांना त्रास होतो, हे लक्षात येते. सर्व भौतिक प्रयत्न करूनसुद्धा जेव्हा असे त्रास दूर होत नाहीत, त्या वेळी असे त्रास पूर्वजांमुळे होतात, असे अनुमान करता येते.
संदर्भ : ग्रंथाचे नाव : भारतीय मानसशास्त्र अथवा सार्थ आणि सविवरण पातंजल योगदर्शन, लेखक : योगाचार्य कृष्णाजी केशव कोल्हटकर,
प्रकाशक : आदित्य प्रतिष्ठान, १२, अमित कॉम्प्लेक्स, ४७४ ब, सदाशिवपेठ, न्यू इंग्लिश स्कूल (टिळक पथ) समोर, पुणे ४११०३०, दूरभाष : (०२०) ४४७९१७५
(सौजन्य : सनातन संस्था आणि सनातन संस्थेचे संकेत स्थळ sanatan.org)
Sanatan Sanstha presents Shraddha Rituals App !
App is available in – Marathi, Hindi, Kannada, Gujarati, Telugu, Malayalam & English