उपोषण आणि दांडी यात्रा यांद्वारे नव्हे, तर नेताजी आणि सावरकर यांच्यासारख्या क्रांतीकारकांमुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले ! – अभिनेत्री कंगना राणावत

अभिनेत्री कंगना राणावत

मुंबई – मी हे नेहमीच म्हणत आले आणि आजही म्हणेन की, आपल्याला जे स्वातंत्र्य मिळाले ते नेताजी सुभाषचंद्र बोस आणि वीर सावरकर यांच्यासारख्या अनेक क्रांतीकारकांमुळे मिळाले आहे. हे स्वातंत्र्य आपल्याला मागून मिळालेले नाही, तर त्यासाठी संघर्ष करावा लागला आहे. प्रत्येकाची स्वतःची विचार करण्याची पद्धत आहे आणि मला वाटते की, नेताजी आणि सावरकर यांच्यासारख्या इतर अनेक क्रांतीकारकांचा संघर्ष पूर्णपणे नाकारला गेला आहे. ‘केवळ उपोषण आणि दांडी यात्रा करून आपण स्वातंत्र्य मिळवले’, हेच बिंबवण्यात आले; प्रत्यक्षात तसे नाही, असे मत बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत यांनी ८ सप्टेंबर या दिवशी ‘ए.एन्.आय.’शी बोलतांना व्यक्त केले आहे.

१. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची राजधानी देहली येथील ‘कर्तव्यपथा’चे उद्घाटन  केले. या वेळी पंतप्रधान मोदी यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. या कार्यक्रमात अभिनेत्री कंगना राणावत याही सहभागी झाल्या होत्या. तत्पूर्वी त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.

२. त्या म्हणाल्या, ‘‘मी नेताजींविषयी नेहमीच स्पष्टपणे बोलते. मी नेहमीच म्हणत आले आहे की, मी ‘गांधीवादी’ नाही, मी ‘नेताजी सुभाष चंद्रवादी’ आहे. मी त्या लोकांपैकी एक आहे ज्यांचा, ‘तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आझादी दुंगा’ यावर विश्‍वास आहे. आजचा दिवस ऐतिहासिक आहे आणि या दिवसासाठी मी स्वतःला भाग्यवान समजते.’’