सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांचा भाद्रपद पौर्णिमा (१०.९.२०२२) या दिवशी ५६ वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने वाराणसी आश्रमातील कार्यकर्तींना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांच्या चरणी त्यांच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
१. सौ. प्राची मसुरकर (वय ६० वर्षे)
१ अ. शांत आणि नम्र स्वभाव : ‘सद्गुरु नीलेश सिंगबाळदादा प्रत्येक प्रसंगात शांत असतात. त्यांच्या बोलण्यात कधीही चढ-उतार नसतो. त्यांचे वागणे आणि बोलणे नेहमी नम्र असते.
१ आ. उत्तम निर्णयक्षमता : आश्रमात रहाणार्यांनी सद्गुरु दादांना काही गोष्टी विचारल्या, तर ते त्या संदर्भात पूर्ण विचार करून उत्तर देतात.
१ इ. व्यवस्थितपणा : सद्गुरुदादा प्रत्येक वस्तू व्यवस्थित ठेवतात. ‘वस्तू कुठे ठेवली आहे ?’, हे त्यांच्या स्मरणात रहाते. ते वाराणसी आश्रमात नसतांनाही ‘ आश्रमातील वस्तू अमुक ठिकाणी मिळेल’, असे सांगून आम्हाला साहाय्य करतात. त्यांची निवासाची खोली आणि सेवेचे ठिकाणही व्यवस्थित असते.
१ ई. ‘कार्यकर्त्यांकडून प्रत्येक गोष्ट योग्य होऊन त्यातून त्यांची साधना व्हावी’, यासाठी सद्गुरुदादा प्रयत्नशील असणे : सद्गुरुदादांचे आश्रमातील प्रत्येक गोष्टीकडे लक्ष असते. काही अयोग्य घडत असेल, तर ते कार्यकर्त्यांना त्याविषयी जाणीव करून देतात, उदा. भांडी अस्वच्छ असणे, पादत्राणे व्यवस्थित न ठेवणे, कार्यपद्धतीचे पालन न करणे. त्या वेळी दादा अप्रत्यक्षपणे ‘आश्रमातील कार्यकर्त्यांना आश्रम आणि सेवा यांच्याप्रती कृतज्ञताभाव वाढवायला हवा’, हे सांगत असल्याचे जाणवते.
१ उ. ‘दिसेल ते कर्तव्य’ या भावाने सेवा करणे : सद्गुरुदादा ‘दिसेल ते कर्तव्य’ या भावाने सेवा करतात. आरंभी वाराणसी आश्रमात साधकसंख्या अल्प होती. तेव्हा सद्गुरुदादा अल्पाहार आणि दुपारचा महाप्रसाद बनवणे, ‘पार्सल’ आणणे, कार्यकर्त्यांना आणणे आणि पोचवणे, परिसर स्वच्छता करणे, प्रसार करणे, अशा सर्व प्रकारच्या सेवा मन लावून करायचे.
१ ऊ. मागील २ मासांपासून पू. दादांकडे पाहिल्यावर ‘ते आता लवकरच सद्गुरु पदावर विराजमान होतील’, असा माझ्या मनात विचार येऊन मला आनंद होत होता.’ (सद्गुरुदादा २९.६.२०२२ या दिवशी सद्गुरुपदी विराजमान झाले. – संकलक)
२. श्रीमती भाग्यश्री आणेकर (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ६५ वर्षे)
२ अ. आधार वाटणे : ‘मी वाराणसी आश्रमात आल्यावर मला सद्गुरु नीलेशदादांचा पुष्कळ आधार वाटत होता. त्यांना बघताक्षणी ‘माझ्या पाठीशी कुणीतरी आहे’, असे मला वाटले. ‘मला काही झाल्यास किंवा काही प्रसंग घडल्यास ते मला सांभाळणारच आहेत’, असा मला आत्मविश्वास वाटतो. माझ्या मनात त्यांच्याविषयी आदरभाव असतो.
२ आ. तत्त्वनिष्ठ : सद्गुरु दादा तत्त्वनिष्ठता आणि निर्णयक्षमता यांचा संगम साधतात. ते कार्यपद्धतीचे काटेकोरपणे पालन करतात. एखाद्या वेळी रात्री त्यांनी आवश्यकता वाटल्यास भोजनकक्षातून दूध किंवा एखादे बिस्कीट घेतले, तर दुसर्या दिवशी ते मला त्याबद्दल सांगतात. ‘ते सद्गुरु असूनही नम्रपणे लहान-सहान गोष्टींबद्दल सांगतात’, याचे मला आश्चर्य वाटते.
२ इ. अनुभूती
२ इ १. सद्गुरु नीलेश सिंगबाळ सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याशी एकरूप झाले आहेत’, असे जाणवणे : एकदा माझ्या मनात नकारात्मक विचार येत असतांना मी ध्यानमंदिरात बसून डोळे मिटून गुरूंचा धावा करत होते. तेव्हा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या छायाचित्रात मला सद्गुरु दादा दिसत होते. तेव्हा ‘सद्गुरु दादा सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांशी एकरूप झाले आहेत’, असे मला जाणवले.
२ इ २. ध्यानमंदिरात बसून नामजप करतांना सूक्ष्मातून ‘सद्गुरु नीलेश सिंगबाळ चारही बाजूंनी बसले आहेत’, असे जाणवणे : एकदा मी ध्यानमंदिरात बसून नामजप करत होते. मला पुष्कळ त्रास होत असल्याने मी घरी जाण्याचे ठरवले. तेव्हा मला सूक्ष्मातून दिसले, ‘माझ्या चारही बाजूंनी सद्गुरु नीलेशदादा बसले आहेत. ते माझ्याकडे पाहून हसत आहेत.’ तेव्हा मला सद्गुरु नीलेशदादांचा तोंडवळा तेजःपुंज दिसत होता. जणू ‘सूर्याचे तेजच माझ्या समोर उभे राहिले’, असे मला वाटले.’
२ इ ३. एकदा मी ध्यानमंदिरात आरती करत असतांना ‘माझ्या हृदयात सद्गुरु दादा आरती करत आहेत’, असे मला दिसले. एकदा मी सायंकाळी आरती करत असतांना मला मारुतीच्या चरणांत सद्गुरु दादांचा तोंडवळा दिसला. मी सद्गुरु दादांना याविषयी सांगितल्यावर ते मला म्हणाले, ‘‘मी मारुतीचीच भक्ती करतो.’’
(सर्व सूत्रांचा दिनांक (२.७.२०२२)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |