‘आम आदमी पक्षाचे गुजरात प्रदेशाध्यक्ष गोपाल इटालिया यांनी भगवान श्रीकृष्णाचा ‘राक्षस’ म्हणून उल्लेख केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आल्याचे वृत्त वाचनात आले. या संदर्भात श्रीकृष्ण भक्त असलेले ‘अहीर समाज’ आणि ‘मालधारी समाज’ या समाजांच्या नेत्यांनी वैध मार्गाने तक्रार नोंदवली असून ‘इटालिया यांनी द्वारकेतील गोमती घाटावर जाऊन क्षमा मागितल्यासच त्यांना क्षमा करू’, अशी चेतावणीही दिली आहे; परंतु ‘केवळ क्षमा मागितल्याने अपराधाची तीव्रता न्यून होते का ?’, हा खरा प्रश्न आहे.
विडंबनात्मक वक्तव्ये, हास्यविनोद, नाटके या माध्यमांतून हिंदु धर्म आणि देवता यांचा सातत्याने अवमान होतांना दिसतो. या घटनेत तर साक्षात् द्वारकानगरीतच एक राजकारणी भगवान श्रीकृष्णाला ‘राक्षस’ संबोधतो आणि निवडक हिंदू सोडले, तर स्वतःला द्वारकाधिशाचे भक्त म्हणवणारे द्वारकेचे रहिवासी शांतपणे ऐकून घेतात ? सर्व हिंदूंनी संघटितपणे भगवान श्रीकृष्णाचा अवमान करणार्या या वक्तव्याचा विरोध करणे आवश्यक होते. समाज जेव्हा तत्परतेने आणि एकत्रितपणे निषेध करील, तेव्हाच अशा प्रकारच्या विडंबनात्मक वक्तव्यांना कुठेतरी लगाम लागू शकतो. अर्थात् ‘विरोध करणे, म्हणजे दंगल; जाळपोळ; मोडतोड करणे नव्हे, तर वैध मार्गांनी निषेध करणे’, ही देवतांचे सर्रास होणारे विडंबन आणि अवमान रोखण्याची पहिली पायरी ! आपल्या माता-पित्यांवर कुणी चिखलफेक केल्यास आपण शांतपणे ऐकून घेत नाही किंवा हसून दादही देत नाही. मग आपला धर्म नि देवता यांचा अवमान आपण का सहन करायचा ?
इटालिया यांनी वर्ष २०२१ मध्येही श्री सत्यनारायण कथा आणि श्रीमद्भागवत यांच्याविषयी अपशब्द काढले होते. खरेतर त्याचवेळी त्यांच्या अवमानकारक वक्तव्यासाठी दंडात्मक कारवाई होणे अपेक्षित होते. तसे झाले असते, तर पुन्हा ते असे विडंबन करण्यास धजावले नसते. त्यामुळेच सभेला आलेला श्रोतावर्ग, नाटक बघायला आलेले प्रेक्षक यांनीच या माध्यमातून होणारा देवतांचा अवमान रोखण्यासाठी जागरूक रहायला हवे.
केवळ क्षमा मागून या गुन्ह्याचे परिमार्जन होईल, इतका हा गुन्हा सौम्य नाही. यावर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे आणि त्यासाठी प्रथम कठोर कायदा करण्याची आवश्यकता आहे. हिंदूंनो, देवतांचा अवमान करणार्यांवर दंडात्मक कारवाई झाल्यासच देवतांच्या अवमानाच्या घटना रोखल्या जाऊ शकतात, हे जाणा !
– धनश्री देशपांडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.