साधिकेला आईचे प्रेम देणार्‍या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) सुजाता कुलकर्णी !

१. आईच्या मायेने प्रेम करणे

अधिवक्त्या प्रीती पाटील

‘अधिवक्त्या (सौ.) किशोरी कुलकर्णी यांच्यामुळे मी कै. (सौ.) सुजाता कुलकर्णी यांच्या कुटुंबियांशी जोडले गेले. आमची वर्ष २००८ मध्ये रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात प्रत्यक्ष भेट झाली. नंतर ‘कुलकर्णीकाकूंनी मला कधी आपलेसे करून घेतले’, हे मलाच कळले नाही. ‘मी रामनाथी आश्रमात येणार आहे’, असे काकूंना समजल्यानंतर त्या प्रत्येक वेळी माझ्या येण्याची आतुरतेने वाट बघत असत. त्या मला आईच्या मायेने कडकडून मिठी मारत. तेव्हा मला आश्रमात काकूंच्या माध्यमातून आई भेटल्याचा आनंद व्हायचा. माझा वेळ वाया जाऊ नये; म्हणून त्या प्रसाद आणि महाप्रसाद ग्रहण करण्याच्या वेळी भोजनकक्षात माझी वाट बघायच्या अन् माझ्याशी बोलायच्या.

२. ‘कै. (सौ.) सुजाता देवदत्त कुलकर्णी यांचे खडतर जीवन अन् साधनाप्रवास’ हा ग्रंथ वाचतांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

२ अ. तहानभूकेची जाणीव नसणे : ३१.५.२०२१ या दिवशी मी ‘कै. (सौ.) सुजाता देवदत्त कुलकर्णी यांचे खडतर जीवन अन् साधनाप्रवास’ हा ग्रंथ वाचायला घेतल्यानंतर माझा तो ग्रंथ १ घंटा १८ मिनिटांत वाचून झाला. हा ग्रंथ वाचतांना माझी ‘पुढे काय ? पुढे काय ?’, ही उत्कंठा शिगेला पोचत होती. संपूर्ण ग्रंथ वाचून होईपर्यंत ‘मधेच थांबवूया’, असा विचार एकदाही माझ्या मनात आला नाही. ग्रंथ वाचून झाल्यानंतर मी आई-बाबांसाठी सायंकाळचा चहा करायला स्वयंपाकघरात गेल्यावर आईने मला विचारले, ‘‘तू जेवलीस का ?’’ त्या वेळी माझ्या लक्षात आले, ‘मी जेवले नाही आणि ग्रंथ वाचतांना मला भुकेची जाणीवही नव्हती.’

२ आ. ‘कै. (सौ.) सुजाता देवदत्त कुलकर्णी यांचे खडतर जीवन अन् साधनाप्रवास’ हा ग्रंथ वाचतांना त्यांचा जीवनपट डोळ्यांसमोर चित्रपटाप्रमाणे तरळणे : हा ग्रंथ वाचतांना काकूंचा जीवनपट नकळत माझ्या डोळ्यांसमोर तरळला. हा ग्रंथ वाचतांना माझ्या मनात विचार आला, ‘हिंदु राष्ट्रात अशा साधकांच्या जीवनावर चित्रपट असतील.’ त्या वेळी ‘मी ग्रंथ वाचत नसून काकूंच्या जीवनावरचा चित्रपट बघत आहे’, असेच मला जाणवत होते. ‘ग्रंथात लिहिलेले प्रसंग माझ्या डोळ्यांसमोर प्रत्यक्ष घडत आहेत’, असे मला जाणवत होते.’

– अधिवक्त्या प्रीती पाटील, सांगली (१.१२.२०२१)