हिंदु धर्म स्वीकारून सुजैन झाली सुजाता
आगरा (उत्तरप्रदेश) – येथील सुजैन खान या मुसलमान महिलेने हिंदु धर्म स्वीकारून दीपक नावाच्या हिंदु पुरुषाशी विवाह केला. विवाह करण्यासाठी ती हिंदु धर्माची दीक्षा घेऊन सुजाता आर्या बनली. तिच्या कुटुंबियांचा यास विरोध होता. त्यांनी दीपकच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. त्यामुळे सुजाताने सामाजिक माध्यमांवर व्हिडिओ पोस्ट करून साहाय्य मागितले आहे.
१. मोठ्या प्रमाणात प्रसारित झालेल्या या व्हिडिओमध्ये सुजैन उपाख्य सुजाता सांगत आहे की, मी कोणत्याही दबावाविना दीड वर्षापूर्वीच हिंदु धर्म स्वीकारला. ४ सप्टेंबर या दिवशी मी माझ्या इच्छेने आर्य समाज मंदिरामध्ये दीपकशी विवाहबद्ध झाले; परंतु माझ्या घरच्यांना हे मान्य नाही. त्यांना दीपक आणि माझी हत्या करायची इच्छा आहे. दीपकला खोट्या प्रकरणामध्ये फसवण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. आगरा पोलिसांकडे मी विनंती करते की, त्यांनी मला, दीपकला आणि त्याच्या कुटुंबियांना संरक्षण पुरवावे.
२. दुसरीकडे सुजैन उपाख्य सुजाताच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात ‘दीपकने माझ्या मुलीला फसवून तिला पळवून नेले’, अशी तक्रार प्रविष्ट केली आहे.
३. घरच्यांनी केलेल्या तक्रारीनंतर सुजाताचे शपथपत्रही समोर आले असून त्यामध्ये ती म्हणत आहे की, मला माझ्या धर्मात (इस्लाममध्ये) उणिवा भासल्यामुळेच मी हिंदु धर्म स्वीकारून सुजाता आर्य बनले आणि दीपकशी स्वत:हून विवाह केला.
संपादकीय भूमिकाएरव्ही लव्ह जिहादच्या प्रकरणांवरून हिंदूंना वेठीस धरणारे कथित धर्मनिरपेक्षतावादी आता या घटनेवरून ‘हिंदु-मुसलमान ऐक्य धोक्यात येऊ शकते’, असे का बोलत नाहीत ? मुसलमान मुलीने हिंदू मुलाशी विवाह केल्यानंतर जिवे मारायला उठणारे लव्ह जिहादच्या प्रकरणांमध्ये गप्प का ? |