मुंबई – ‘मनी लाँड्रिंग’ प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर ५ सप्टेंबर या दिवशी पुन्हा मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी होऊ शकली नाही. न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांनी अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर सुनावणी घेण्यास नकार दिला आहे, तसेच दुसर्या खंडपिठाकडे दाद मागण्याचे निर्देश त्यांना दिले आहेत. त्यामुळे अनिल देशमुख यांचा कारागृहातील आणखी मुक्काम वाढला आहे.
आर्थिक अपव्यवहार प्रकरणात ‘अंमलबजावणी संचलनालया’ने (‘ईडी’ने) मागील वर्षी अनिल देशमुख यांना ११ घंट्यांच्या चौकशीनंतर अटक केली होती. सध्या अनिल देशमुख न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांचा जामीन अर्ज यापूर्वी मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर या निर्णयाच्या विरोधात देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती; मात्र अद्यापही त्यांच्या अर्जावर सुनावणी होऊ शकली नाही. अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज आतापर्यंत ३ वेळा विविध खंडपिठाने नाकारला आहे.