पिंपरीत (पुणे) ‘आसवानी असोसिएट्स’ आणि ‘ॲस्पीफ्लाय इनव्हायरमेंट’ या संस्थांच्या वतीने श्रींच्या मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम हौदांची निर्मिती !

पिंपरी (पुणे), ४ सप्टेंबर (वार्ता.) – येथील केशवनगर येथे ‘आसवानी असोसिएट्स’ आणि ‘ॲस्पीफ्लाय इनव्हायरमेंट’ या संस्थांच्या वतीने श्रींच्या मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम हौदांची निर्मिती करण्यात आली आहे. ‘येथे श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करावे आणि नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी सहकार्य करावे’, असे आवाहन संयोजक विजय आसवानी आणि उद्योजक राजू आसवानी आदींनी केले आहे. या संस्थेच्या वतीने पिंपरी गावातील वैभवनगर येथे सार्वजनिक मंडळांच्या आणि घरगुती श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी लहान-मोठ्या आकाराचे एकूण ३ हौद उभारण्यात आले आहेत.

श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी लहान-मोठ्या आकाराचे एकूण ३ हौद उभारण्यात आले आहेत (चित्रावर क्लिक करा)

उद्योजक श्रीचंद आसवानी यांनी सांगितले की, भाविकांसाठी विसर्जनाच्या वेळी श्रींच्या आरतीसाठी स्वतंत्र व्यवस्था आणि निर्माल्यकुंडाची व्यवस्था केली आहे. जीवरक्षक विधीवत् पद्धतीने या हौदांमध्ये मूर्तीविसर्जन करतील. येथे विसर्जित केलेल्या मूर्तींचे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या मार्गदर्शनाखाली विघटन केले जाईल. त्यातून जमा झालेल्या मातीतून आकर्षक कुंड्या बनवून त्या कुंड्यांचे भाविकांना आणि गणेशोत्सव मंडळांना संयोजकांच्या वतीने विनामूल्य वाटप करण्यात येणार आहे.

संपादकीय भूमिका

  • प्रशासनानंतर आता काही संस्थांचाही धर्मद्रोह चालूच !
  • रासायनिक पदार्थ वापरून श्री गणेशमूर्तीचे विघटन करणे, हाच श्री गणेशाचा मोठा अवमान आहे, हे या संस्थांच्या सदस्यांना लक्षात येत नाही का ? भाविकांनो, श्री गणेशाचा असा अवमान करण्यास उद्युक्त करणार्‍या अशा संस्थांच्या भूलथापांना बळी पडू नका !
  • हौदांत मूर्तीविसर्जन करणे, हे तर अशास्त्रीय आहेच, त्याहीपुढे मूर्ती विसर्जन केल्यानंतर त्यातून जमा झालेल्या मातीतून कुंड्या बनवून त्यांचे वितरण करणे, हेही पापच आहे. याचे पातक केवळ मूर्तीदान करवून घेणार्‍यांनाच नव्हे, तर मूर्तीदान देणार्‍यांनाही लागेल, हे लक्षात घ्यावे !