श्री गणेशाच्या भक्त-ऋषींच्या संदर्भातील प्रसंग आणि श्री गणेशाच्या लीला यांच्यामागील अध्यात्मशास्त्र !

#Ganeshotsav #Ganeshotsav2022 #GaneshChaturthi #GaneshChaturthi2022 Ganesh Chaturthi गणेशचतुर्थी #गणेशचतुर्थी गणेश चतुर्थी #Ganapati #गणपती #गणेशमूर्ती #Ganeshmurti #Ganesh #गणेश गणेश Ganesh


३.९.२०२२ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या या विषयावरील लेखात आपण स्वर्गसुखाचा त्याग करणारे श्री गणेशाचे परमभक्त ‘मुद्गलऋषि’ यांची अलौकिक गणेशभक्ती आणि श्री गणेशाचे निस्सीम भक्त आणि त्यांच्याप्रमाणे सोंड असलेले भृशुंडी ऋषि यांच्या संदर्भातील सूत्रे पाहिली. आज त्यापुढील भाग पाहूया.

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/609583.html

‘२.९.२०२१ या दिवशी मी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी अत्यंत भावमय स्वरात श्री गणेशाच्या संदर्भात घेतलेला ‘ऑनलाईन’ भावसत्संग ऐकला. तेव्हा श्री गणेशाची वैशिष्ट्ये आणि त्याची कृपा यांचे महत्त्व माझ्या मनावर कोरले गेले. त्यानंतर मला श्री गणेशाच्या विविध भक्त ऋषींच्या संदर्भात घडलेल्या विविध घटना आठवल्या आणि देवाच्या कृपेमुळे या घटनांमागील आध्यात्मिक कार्यकारणभावही उमजला. श्री गणेशाच्याच कृपेने त्याच्या जीवनातील ऋषींच्या संदर्भातील घटना आणि त्यातून शिकायला मिळालेली सूत्रे मी लेखबद्ध करून ही शब्दसुमने श्री गणेशाच्या चरणी अर्पण करत आहे.

श्री गणेशमूर्ती

२ अ २. भृशुंडी ऋषींनी श्री गणेशचतुर्थीचे व्रत केल्यामुळे नरकयातना भोगणार्‍या त्यांच्या पितरांना सद्गती मिळून स्वर्गात स्थान प्राप्त होणे : एकदा नारदमुनींनी भृशुंडी ऋषींना सांगितले की, त्याचे माता-पिता, पत्नी, पुत्री आणि अन्य काही आप्तेष्ट ‘कुंभीपाक’ नावाच्या नरकात घोर यातना भोगत आहेत. त्यावर उपाय म्हणून नारदांनी भृशुंडी ऋषींना भाद्रपद शुक्ल चतुर्थीला व्रत करण्यास सांगितले. त्याप्रमाणे भृशुंडी ऋषींनी हे व्रत अत्यंत भक्तीभावाने केल्यामुळे नरकयातना भोगणारे त्यांचे नातलग नरकातून मुक्त झाले आणि विमानात बसून स्वर्गलोकाकडे गेले. एवढे भाद्रपद मासातील श्री गणेश चतुर्थीच्या व्रताचे महत्त्व आहे.

२ आ. प्रसंगातून शिकायला मिळालेले सूत्र : देवाची भक्तीभावाने आराधना केल्यावर व्यक्तीमध्ये देवतेचे तत्त्व कार्यरत होऊन त्याला देवासारखे रूप प्राप्त होते. यालाच आध्यात्मिक परिभाषेत ‘सरूप मुक्ती मिळणे’, असे म्हणतात. तसेच भृशुंडी ऋषींनी श्री गणेशाची भक्तीभावाने मानसपूजा केल्यावर, पूजेतील प्रत्येक उपचार श्री गणेशापर्यंत प्रत्यक्ष पोचला. यावरून ‘भक्तीभावाने मानसपूजा कशी करायची’, हे सूत्रही शिकायला मिळते. त्याचप्रमाणे ‘श्री गणेशचतुर्थीचे व्रत भक्तीभावाने केल्यामुळे समस्त पापे नष्ट होऊन सद्गती मिळते’, हे सूत्र शिकायला मिळते.

३. कलियुगातील गणेशभक्त संत मोरया गोसावी यांची थोर गणेशभक्ती

कु. मधुरा भोसले

३ अ. भृशुंडी ऋषींप्रमाणेच कलियुगातही संत मोरया गोसावी यांच्या कुळातील ७ पिढ्यांमधील वंशजांना श्री गणेशाप्रमाणे सोंड असणे : भृशुंडी ऋषींप्रमाणेच कलियुगातही सोेंड प्राप्त होण्याची अद्भूत घटना घडली. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील चिंचवड येथील थोर संत मोरया गोसावी हे श्रीगणेशाचे परम भक्त होते. त्यांच्या भक्तीवर श्रीगणेश प्रसन्न झाल्याने त्यांना उतार वयात ‘चिंतामणी’ या बालकाची प्राप्ती झाली. ‘चिंतामणी’च्या रूपाने साक्षात श्री गणेशानेच त्यांच्या पोटी जन्म घेतला. त्याचप्रमाणे ‘संत मोरया गोसावी यांच्या कुळातील पुढील ७ पिढ्या श्री गणेशाचे परमभक्त बनून श्री गणेशाप्रमाणे सोंडधारी होतील’, असा आशीर्वादही श्री गणेशाने संत मोरया गोसावी यांना दिला. त्याप्रमाणे संत मोरया गोसावी यांच्या कुळातील ७ पिढ्या श्री गणेशाचे परमभक्त झाले आणि त्यांना श्री गणेशाप्रमाणे सोंड होती. चिंचवड येथे पवना नदीच्या किनारी संत मोरया गोसावी यांची समाधी आणि ‘मंगलमूर्ती’ श्री गणेशाचे मंदिर आहे. या मंदिराच्या भोवती संत मोरया गोसावी यांच्या ७ पिढ्यांतील वंशजांच्याही समाधी आहेत. या सातही वंशजांना श्री गणेशाप्रमाणे सोंड होती आणि त्यांचे नावही श्री गणेशाचेच होते. यावरून ‘सत्ययुगातील भृशुंडी ऋषींप्रमाणे श्री गणेशाची निस्सीम भक्ती करून कलियुगातही ‘सरूप मुक्ती’ प्राप्त केलेले श्री गणेशाचे थोर भक्त या भारतभूमीत झाले’, हे लक्षात येते. यासाठी श्री गणेश आणि त्याचे थोर भक्त संत मोरया गोसावी यांच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे.

३ आ. प्रसंगातून शिकायला मिळालेले सूत्र : काही लोकांना वाटते की, आधीच्या युगांमध्येच दैवी चमत्कार होत होते; परंतु संत मोरया गोसावी यांच्या उदाहरणावरून आपल्या हे लक्षात येते की, कलियुगातही भगवंताची निस्सीम भक्ती केली, तरी कलियुगातही व्यक्तीला देवतेचे स्वरूप प्राप्त होऊ शकते. यावरून भगवंताचे भक्तवत्सल रूप जसे सत्य, त्रेता आणि द्वापर या युगांमध्ये होते, तसे ते कलियुगातही कार्यरत आहे’, हे सूत्र लक्षात येते. त्यामुळे ‘कोणत्याही युगात जन्म झाला, तरी साधना केल्यावर भगवंत त्याचे फळ अवश्य देतो’, हे सूत्र आपल्या लक्षात येते.

४. मंदार आणि शमी यांची पाने श्री गणेशाला वहाण्यामागील आध्यात्मिक महत्त्व

४ अ. श्री गणेशाला ‘मंदार आणि शमी’ या देववृक्षांची पाने वहाण्याची प्रथा चालू होण्यामागील कथा : औरव ऋषि आणि सुमेधा या दांपत्याला ‘शमी’ नावाची कन्या होती. तिचा विवाह धौम्य ऋषींचा पुत्र आणि शौनक ऋषींचा शिष्य ‘मंदार’ याच्याशी झाला. एकदा त्यांच्या आश्रमात गजाननाचे परमभक्त भृशुंडी ऋषि  येतात. भृशुंडी ऋषींचे भलेमोठे पोट आणि त्यांना श्री गणेशाप्रमाणे असलेली सोंड पाहून मंदार आणि शमी यांनी भृशुंडी ऋषींची चेष्टामस्करी करून त्यांचा अपमान केला. त्यावर भृशुंडी ऋषि क्रोधित होऊन त्या दोघांनाही शाप देतात, ‘‘तुम्ही काटेरी वृक्ष व्हाल आणि त्यामुळे तुमच्या आश्रयाला पक्षीसुद्धा येणार नाहीत.’’ त्यानंतर ‘मंदार’ हा ‘मंदार वृक्ष’ झाला आणि ‘शमी’ ही ‘शमी वृक्ष’ झाली. या दोन्ही वृक्षांना अनेक काटे असल्यामुळे त्यांच्याजवळ कोणतेही पशूपक्षी जात नव्हते. या घटनेला काही दिवस लोटले. बर्‍याच दिवसांत आपला प्रिय शिष्य भेटीला न आल्यामुळे शौनक ऋषि मंदारच्या आश्रमात पहाण्यासाठी आले. तसेच औरव त्यांच्या कन्येला भेटण्यासाठी आश्रमात आले. तेव्हा औरव आणि शौनक ऋषि यांना मंदार आणि शमी न दिसल्यामुळे त्यांना पुष्कळ काळजी वाटली. त्यांनी अंतर्ध्यानाने पाहिले की, मंदार आणि शमी यांनी भृशुंडी ऋषींचा अपमान केल्यामुळे त्यांचे रूपांतर मंदार आणि शमी या वृक्षांमध्ये झाले आहे. तेव्हा ते दोघेही श्री गणेशाला शरण गेले आणि त्यांनी त्याची आराधना चालू केली. त्यांनी सलग १२ वर्षे तप केल्यावर श्री गणेशाने त्यांच्यावर प्रसन्न होऊन त्यांना दर्शन दिले. श्री गणेशाने सांगितले की, ‘‘मंदार आणि शमी यांनी त्याचे परमभक्त भृशुंडी ऋषि यांचा अपमान केल्यामुळे त्यांना भृशुंडी ऋषींनी दिलेला शाप भोगावाच लागेल ’’; परंतु त्यांच्यावर कृपावंत होऊन श्री गणेशाने त्यांना आशीर्वाद दिला, ‘‘माझे वास्तव्य सतत मंदार आणि शमी या वृक्षांमध्ये असेल. हे दोन्ही वृक्ष मनुष्याप्रमाणे देवतांनाही पूजनीय होतील. जो कुणी भक्तीभावाने मला मंदार आणि शमी यांची पाने वाहील, त्याला माझी कृपा आणि पुष्कळ पुण्य प्राप्त होईल. दूर्वा न मिळाल्यास मला मंदार वृक्षाची पाने आणि मंदाराची पाने न मिळाल्यास शमीची पाने वहावी. मला शमीची पाने वाहिल्यामुळे दूर्वा आणि मंदार या दोन्ही वृक्षांची पाने वाहिल्याचे फळ मिळेल.’’ अशा प्रकारे श्री गणेशाने मंदार आणि शमी यांचा उद्धार केला आणि त्यानंतर या देववृक्षांची पाने श्री गणेशाला वहाण्याची प्रथा चालू झाली.

४ आ. प्रसंगातून शिकायला मिळालेले सूत्र : मनुष्याचे अज्ञान आणि त्याचा अहंकार यांच्यामुळे त्याला भगवंत शाप देऊन किंवा अन्य प्रकारे शिक्षा करतो. जेव्हा मनुष्याला स्वत:ची चूक लक्षात येते, तेव्हा भगवंत त्याला क्षमा करून प्रायश्चित्त सांगून स्वत:मध्ये सुधारणा करण्याची संधी देतो. अशा प्रकारे भगवंत मनुष्याला त्याच्या जीवनात घडणार्‍या विविध प्रसंगांतून त्याला शिकवून त्याचा उद्धार करत असतो. त्यामुळे जर मनुष्य स्वत:च्या चुकांमधून शिकून चुका टाळण्यासाठी प्रयत्न करू लागला, तर तो एक-एक पाऊल भगवंताच्या जवळ जाऊ लागतो.

५. श्री गणेश आणि परशुराम यांच्यामध्ये युद्ध होऊन श्री गणेशाचा डावा दात तुटणे यामागील अध्यात्मशास्त्र

५ अ. श्री गणेशाने परशुरामाला समाधिस्थ शिवाला भेटू न दिल्याने त्यांच्यात युद्ध होणे, युद्धात परशुच्या प्रहारामुळे श्री गणेशाचा डावा दात तुटणे आणि या दाताचा उपयोग करून द्वापरयुगात महर्षि व्यासांच्या सांगण्यावरून श्री गणेशाने ‘महाभारत’या महाकाव्याची रचना करणे : एकदा शिव समाधिस्थ असतो. तेव्हा ‘त्याला समाधीतून कुणीही जागे करू नये’, यासाठी शिव श्री गणेशाला पहारा करण्यास सांगतो. त्यानंतर काही वेळाने तेथे श्रीविष्णूचा सहावा अवतार परशुराम हा त्याचे गुरु शिवाला भेटण्यासाठी येतो; परंतु श्री गणेश त्याला शिवाकडे न जाण्याविषयी सांगतो. परशुरामही शिवाला भेटायचा हट्ट सोडत नाही आणि श्री गणेश त्याला शिवाकडे जाऊ देत नाही. त्यामुळे दोघांमध्ये युद्ध चालू होते. तेव्हा परशुराम त्याच्या हातातील परशूने श्री गणेशावर वार करतो. श्री गणेश परशुरामाचा आदर राखण्यासाठी तो वार झेलतो; परंतु त्यामुळे श्री गणेशाचा डावा दात तुटतो. त्यानंतर शिव आणि पार्वती तेथे येतात. तेव्हा परशुरामाचा राग शांत होतो आणि तो श्री गणेशाला ‘‘भविष्यात तुझ्या तुटलेल्या दाताचा उपयोग लेखणीच्या स्वरूपात होणार असून एका दिव्य ग्रंथाची निर्मिती होणार आहे’’, असा आशीर्वाद देतो. त्यानुसार द्वापरयुगात जेव्हा महर्षि व्यास श्री गणेशाचे आवाहन करतात, तेव्हा त्यांच्यासमोर श्री गणेश प्रगट होतो. त्यानंतर महर्षि व्यास त्याला ‘महाभारतातील काव्यमयसूत्रे अविरत सांगतात आणि श्री गणेश त्याच्या तुटलेल्या दाताचा उपयोग लेखणीप्रमाणे करून तत्परतेने ‘महाभारत’ या महाकाव्याची अन् महान ग्रंथाची निर्मिती करतो.

५ आ. प्रसंगातून शिकायला मिळालेले सूत्र : भूतकाळात घडलेल्या एखाद्या घटनेचा संबंध भविष्यात घडणार्‍या एखाद्या घटनेशी असू शकतो. यावरून ‘भगवंताच्या लीला या मनोरंजनासाठी नसून त्यामागे काही ना काही कार्यकारणभाव दडलेला असतो’, हे सूत्र शिकायला मिळाले. त्यामुळे ‘कोणत्याही घटनेकडे केवळ वरवर न पहाता त्यामागील कार्यकारणभाव जाणून घेतला पाहिजे’, हे सूत्र लक्षात येते.

६. सोमकांत राजाची व्याधी आणि भृगु ऋषींनी श्री गणेश पुराण सांगण्याचे महत्त्व !

६ अ. व्याधीग्रस्त सोमकांत राजाची व्याधी भृगु ऋषींनी सांगितलेले ‘श्री गणेश पुराण’ भावपूर्णरित्या श्रवण केल्यामुळे पूर्णपणे निघून जाणे : सौराष्ट्रातील देवनगरात सोमकांत नावाचा राजा होता. तो अत्यंत धर्मपरायण होता आणि धर्माधिष्ठित राज्य करत होता. त्यामुळे त्याच्या कुटुंबासह त्याची प्रजाही त्याच्यावर पुष्कळ प्रसन्न होती. एके दिवशी सोमकांत राजाच्या देहात अनेक जखमा होऊन गळू झाले आणि त्यांतून सतत रक्त अन् पू वाहू लागले. अनेक वैद्यांचे उपचार करूनही ही व्याधी दूर होईना. त्यामुळे राजाने त्याचा राज्यकारभार त्याचा पुत्र हेमकंठाच्या हाती सोपवून तो पत्नीसह वनात गेला. तेथे त्याला भृगु ऋषींच्या आश्रमात आश्रय मिळाला. राजाच्या पूर्वजन्मातील पापकर्मामुळे त्याला हे दु:ख भोगावे लागत असल्याचे भृगु ऋषींनी त्याला सांगितले. त्यानंतर त्यांनी राजाला गणपतीचा ‘ॐ गँ गणपतये नम : ।’ हा नामजप करण्यास सांगितला आणि भृगु ऋषींनी त्याच्या अंगावर अभिमंत्रित केलेले जल शिंपडले. त्यानंतर राजाच्या नाकपुडीतून धूर बाहेर पडला आणि या धुरातून एका काळ्या रंगाच्या राक्षसाची आकृती निर्माण झाली. ही आकृती राजाचे पूर्वजन्माचे पापकर्म असल्याचे ऋषींनी सांगितले. ऋषींनी या राक्षसाला आश्रमाच्या समोरील आंब्याच्या ढोलीत रहाण्यास सांगितले. राक्षसाने झाडाच्या ढोलीत प्रवेश करताच संपूर्ण आंब्याचा वृक्ष जळून भस्मसात झाला. तेव्हा भृगु ऋषी राजाला म्हणाले, ‘‘मी तुला श्री गणेश पुराण सांगतो. जोपर्यंत या राखेतून पुन्हा आंब्याचे रोप उगवत नाही, तोपर्यंत तू या वृक्षाच्या राखेजवळ बसून हे ‘श्री गणेश पुराण’ भक्तीभावाने ऐक.’’ त्याप्रमाणे राजाने भक्तीभावाने भृगु ऋषींच्या मुखातून ‘श्री गणेशपुराण’ श्रवण केले आणि काही काळानंतर खरोखरच त्या राखेतून आंब्याचे रोप उगवले. त्याबरोबर राजाची व्याधी पूर्णपणे निघून गेली आणि तो पूर्ववत् निरोगी झाला. त्याने भृगु ऋषि आणि श्री गणेश यांच्या चरणी भावपूर्णरित्या कृतज्ञता व्यक्त केली. श्री गणेशपुराणाचे भावपूर्ण श्रवण केल्यामुळे सोमकांत राजा आणि त्याची पत्नी यांनी गणेशलोकात जाण्यासाठी श्री गणेशाचे दूत दिव्य विमान घेऊन आले. त्यानंतर सोमकांत राजा आणि त्याची पत्नी यांनी सदेह गणेशलोकात गमन केले.

६ आ. प्रसंगातून शिकायला मिळालेले सूत्र : मनुष्याने केलेल्या चांगल्या किंवा वाईट अशा प्रत्येक कर्माचे फळ त्याला चालू किंवा नंतरच्या जन्मात भोगावेच लागते. सत्कर्म केल्याने पापकर्माची तीव्रता न्यून होऊ लागते किंवा ते कर्म पूर्णपणे नष्ट होते; परंतु त्यासाठी काही काळ लागतो. या काळात व्यक्ती साधनारत असेल, तर तिचा प्रारब्ध भोगण्याचा काळ थोडा सुसह्य होतो. ऋषींच्या कृपेने ऋषिबळ आणि देवाच्या कृपेने देवबळ प्राप्त होऊन मनुष्याच्या पापकर्माचे संपूर्ण फळ नष्ट होते. यावरून ऋषींची भक्ती आणि देवाचे सामर्थ्य यांची आपल्याला प्रचीती येते.

७.  श्री गणेशाच्या कृपेने गणक ऋषींनी अथर्वशीर्षाची रचना करणे

७ अ. श्री गणेशाच्या कृपेने गणक ऋषींनी रचलेल्या अथर्वशीर्षाचे महत्त्व : जैमिनी ऋषींचे सामवेदीय शाखेतील शिष्य मुद्गल ऋषि यांचे शिष्य ‘गणक ऋषि’ यांनी ‘श्री गणपति अथर्वशीर्ष’ लिहिले. या स्तोत्रामध्ये श्री गणेशाचे अत्यंत सुंदर रितीने वर्णन केले आहे. हे वर्णन वाचल्यावर आपला श्री गणेशाप्रतीचा भाव जागृत होतो. अथर्ववेदात अथर्वशीर्षाचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे. अथर्वशीर्षाचे तीन प्रमुख भाग आहेत.

१. शांतीमंत्र

२. ध्यानविधी

३. फलश्रुती

हे स्तोत्र श्री गणेशाची मूर्ती किंवा ‘ॐ’  लिहिलेल्या अक्षराकडे पाहून म्हणावे. त्यामुळे आपल्या मनाची एकाग्रता वाढते आणि आपल्याला या स्तोत्रातील सात्त्विकता अन् चैतन्य ग्रहण करता येते.

७ आ. प्रसंगातून शिकायला मिळालेले सूत्र : देवाची भक्ती केल्यावर तो त्याचे ज्ञान त्याच्या भक्तांना देतो. त्यामुळे गणेशभक्त गणक ऋषि यांच्या भक्तीमुळे त्यांना श्री गणेशाचे ज्ञान झाले आणि त्यांनी ‘श्री गणेशअथर्वशीर्ष’ रचले. या स्तोत्रामध्ये ‘श्री गणेशतत्त्व आणि ऋषींचा संकल्प’, हे दोन्ही कार्यरत असल्यामुळे हे स्तोत्र म्हटल्यावर अनेक गणेशभक्तांना आजही विविध प्रकारच्या अनुभूती येतात.

८. कौैंडिण्य ऋषींची गणेशभक्ती

८ अ. गणेशभक्त कौैंडिण्य ऋषि यांना मरणोपरांत गणेशलोकाची प्राप्ती होणे : कौैंडिण्य ऋषि श्री गणेशाची भक्तीभावाने पूजा करून श्री गणेशाला दूर्वा वहायचे आणि श्री गणेशाचे अखंड नामस्मरण करायचे. त्यामुळे श्री गणेश त्यांच्यावर प्रसन्न झाला आणि कौैंडिण्य ऋषींच्या निस्सीम गणेशभक्तीमुळे त्यांना मरणोपरांत श्री गणेशलोकाची प्राप्ती झाली.

८ आ. प्रसंगातून शिकायला मिळालेले सूत्र : व्यक्ती ज्या देवतेची उपासना करते, तिच्यावर संबंधित देवतेची कृपा होऊन तिला मरणोपरांत संबंधित देवतेच्या लोकात स्थान मिळते. यालाच ‘सलोक मुक्ती मिळणे’, असे म्हणतात. याचा अर्थ भक्ताला त्याच्या उपास्य देवतेच्या लोकात रहाण्याचे भाग्य प्राप्त होते.

(वाचकांना सूचना : ‘या लेखातील काही प्रसंगांशी संबंधित नावे आणि घटना संकेतस्थळावरून अन् ‘गणेशपुराण’ आणि अन्य काही ग्रंथातून घेतलेली आहेत.’ – कु. मधुरा भोसले)

– कु. मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के) (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.९.२०२१)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.