श्री गणेशाच्या भक्त-ऋषींच्या संदर्भातील प्रसंग आणि श्री गणेशाच्या लीला यांच्यामागील अध्यात्मशास्त्र !

गणेशोत्सवाच्या निमित्ताने… 

‘२.९.२०२१ या दिवशी मी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी अत्यंत भावमय स्वरात श्री गणेशाच्या संदर्भात घेतलेला ‘ऑनलाईन’ भावसत्संग ऐकला. तेव्हा श्रीगणेशाची वैशिष्ट्ये आणि त्याची कृपा यांचे महत्त्व माझ्या मनावर कोरले गेले. त्यानंतर मला श्री गणेशाच्या विविध भक्त ऋषींच्या संदर्भात घडलेल्या विविध घटना आठवल्या आणि देवाच्या कृपेमुळे या घटनांमागील आध्यात्मिक कार्यकारणभावही उमजला. श्री गणेशाच्याच कृपेने त्याच्या जीवनातील ऋषींच्या संदर्भातील घटना आणि त्यातून शिकायला मिळालेली सूत्रे मी लेखबद्ध करून ही शब्दसुमने श्रीगणेशाच्या चरणी अर्पण करत आहे.

१. ‘मुद्गल ऋषि’ यांची अलौकिक गणेशभक्ती

१ अ. मुद्गल ऋषींची जन्मकथा आणि त्यांच्यावरील गणेशकृपा : महामुनी अंगिरस आणि त्यांची पत्नी देवी श्रुती यांच्या समोर एक तेजोवलय प्रकट झाले आणि त्यातून साक्षात् श्रीगणेशाचा अंश असलेल्या ‘मुद्गल’ ऋषींचा जन्म अयोनीसंभवाने झाला. हा दैवी चमत्कारच होता. महर्षी अंगिरसांनी बाल मुद्गलांना श्रीगणेशाच्या अद्वैत तत्त्वज्ञानाचा यथासांग आणि सांगोपांग उपदेश केला. बाल मुद्गलांनी विदर्भ प्रांती, भगवान श्री वक्रतुंडाच्या चरणी लीन होऊ श्रीक्षेत्र ‘अदोष’ येथे श्रीगणेशाची तपश्चर्या केली. श्री गणेशाने त्याच्यावर प्रसन्न होऊन दिलेल्या आशीर्वादामुळे बाल मुद्गल ‘गणेशाचार्य मुद्गल’ झाले. त्यानंतर त्यांना ‘धर्ममूर्तिपद’ (धर्ममार्तंडासारखे एक श्रेष्ठ पद) प्राप्त झाले. त्यांना महर्षि अत्री आणि अनसूया यांची मुलगी ‘अत्रेयी’ वधू म्हणून प्राप्त झाली. त्यांना ‘नाक’ नामक पुत्राची प्राप्ती झाल्यानंतर त्यांची वैरागी वृत्ती दृढ होऊ लागली. एकदा दुर्वास ऋषींनी त्यांची कठोर परीक्षा घेतली. या परिक्षेतही ते उत्तीर्ण झाले.

१ आ. नंदीच्या शापामुळे स्मृतीभ्रंश झालेल्या दक्ष प्रजापतीला मुद्गल ऋषींनी गणेशतत्त्वज्ञानाचा उपदेश करून ‘श्रीमुद्गल महापुराणा’ची रचना करणे : त्यानंतर त्यांनी श्रीगणेशाची घोर तपश्चर्या केली आणि त्यानंतर ते भारतभ्रमण करू लागले. काशीक्षेत्री शिवपत्नी सतीचे पिता दक्षप्रजापति निवास करत होते. दक्षाने शिवनिंदा केल्यामुळे ती सहन न झाल्यामुळे शिवपत्नी सतीने आत्मदहन केले होते. त्यामुळे क्रोधित झालेल्या शिवाने दक्षाचा वध केला. त्यानंतर ब्रह्मा आणि विष्णु यांनी सृष्टी चालवण्यासाठी दक्षप्रजापति जिवंत होणे आवश्यक असल्याचे सांगितल्यावर शिवाने दक्षाला बोकडाचे शिर लावून जिवंत केले. त्यानंतर काही काळानंतर शिवाच्या कृपेने दक्षाला मनुष्याचे मुख प्राप्त झाले; परंतु शिव आणि सती यांचा अपमान केल्यामुळे दक्षाला नंदीने दिलेला स्मृतीभ्रंश होण्याचा शाप अजूनही तसाच होता. त्यामुळे दक्षाला स्मृतीभ्रंश झाला होता. जेव्हा मुद्गल ऋषि भ्रमण करत काशीक्षेत्री पोचले, तेव्हा त्यांनी दक्ष प्रजापतीला गणेश तत्त्वज्ञानाचा उपदेश केला. त्यानंतर दक्षाचा स्मृतीभ्रंश दूर झाला. हाच उपदेश ‘श्रीमुद्गल महापुराण’ या नावाने विख्यात झाला. या पुराणात नऊ खंड असून यांतील आठ खंडांमध्ये अष्टविनायकांच्या कथा असून नवव्या खंडात योगमार्गाचे अभूतपूर्व विश्लेषण आहे.

कु. मधुरा भोसले

१ इ. सदेह स्वर्गात नेण्यासाठी आलेल्या देवदूतांना मुद्गल ऋषींनी परत पाठवणे (स्वर्गापेक्षा भारतभूमी ही कोटी कोटीपटींनी श्रेष्ठ असणे) : मुद्गल ऋषि गाणपत्य संप्रदायाचे प्रमुख आचार्य आणि विदर्भ राज्याचे राजगुरु होते. त्यांच्या साधनेमुळे देवदूत त्यांना सदेह स्वर्गात घेऊन जाण्यासाठी आले होते. तेव्हा ते देवदुतांना म्हणाले,‘‘जेथे तप, साधना, भक्ती आणि भगवंताची अर्चना नाही, अशा स्वर्गाचा काय उपयोग ? त्या स्वर्गापेक्षा माझी भारतभूमी ही कोटी कोटीपटींनी श्रेष्ठ आहे. या भारतभूमीत तप, संस्कार आणि स्वप्रयत्न यांनी ‘नराचा नारायण’ होतो. त्यामुळे मला ही पवित्र भारतभूमी स्वर्गाहून प्रिय आहे.’’ मुद्गल ऋषींचे भारतभूमीवरील प्रेम आणि आदर पाहून देवदूत थक्क झाले अन् त्यांना मनोमन वंदन करून स्वर्गाला परतले. स्वर्गसुख नाकारणार्‍या आणि दुर्वास मुनींच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या या थोर मुद्गल ऋषींच्या चरणी कोटीश: कृतज्ञता.

१ ई. प्रसंगातून शिकायला मिळालेले सूत्र : मुद्गल ऋषींनी श्री गणेशाची तपश्चर्या केल्याने त्यांच्यामध्ये तेजतत्त्व कार्यरत झाले. जेव्हा त्यांनी भारतभ्रमण करून गणेशभक्तीचा प्रसार केला. त्यामुळे त्यांच्यामध्ये ज्ञानशक्ती वृद्धींगत झाली. त्यांनी स्वर्गसुखाचा त्याग केला. यावरून ‘त्यांच्यामध्ये वैराग्य किती प्रबळ होते’, हे आपल्या लक्षात येते.

२. श्री गणेशाप्रमाणे सोंड असलेले भृशुंडी ऋषि !

२ अ १. श्री गणेशाचे परम भक्त ‘भृशुंडी ऋषी’ यांच्या निस्सीम गणेशभक्तीमुळे त्यांना श्री गणेशाप्रमाणे सोंड प्राप्त होणे : सत्ययुगात कश्यप ऋषि आणि माता अदिती यांच्या पोटी श्री गणेशाचा ‘महोत्कट विनायक’ हा अवतार प्रकट झाला. तेव्हा काशीराज विनायकाला काशीमध्ये घेऊन गेला. पहाटे उठल्यावर जेव्हा काशीराज विनायकाच्या कक्षात गेला, तेव्हा त्याला श्रीमहोत्कट विनायकाची साग्रसंगीत पूजा केलेली दिसली. ‘एका चक्रवर्ती सम्राटालाही शक्य होणार नाही अशा दिव्यातिदिव्य उपचारांनी एवढ्या पहाटे महोत्कट विनायकाची कुणी पूजा केली असेल ?’, असा प्रश्न जेव्हा काशीराजाला पडला. तेव्हा महोत्कट विनायकाने सांगितले की, ‘आज भाद्रपद शुक्ल चतुर्थी आहे. महाराष्ट्रातील ‘नामल’ क्षेत्री असणार्‍या माझ्या परम भक्ताने ब्राह्ममुहूर्तावर माझी मानसपूजा केली. त्यातील प्रत्येक उपचार माझ्यापर्यंत पोचला. त्या परमभक्ताचे नाव आहे ‘भृशुंडी ऋषि’. भृशुंडीचे आधीचे नाव ‘नामा’ होते. तो जंगलात राहून प्राण्यांची हत्या करत असे आणि वाटसरूंना लुटत असे. एकदा त्याला विदर्भ राज्याचे राजगुरु महर्षि मुद्गल भेटले. तेव्हा नामाची पापी वृत्ती आणि हिंसेचे विचार कुंठित होऊन तो ऋषींना शरण आला. तेव्हा ते त्याला श्रीगणेशाचा ‘ॐ गँ गणपतये नम: । ’ हा नामजप करण्यास सांगितला. त्यांनी तेथे झाडाची एक वाळलेली काटकी रोवली आणि सांगितले, ‘‘या काटकीला पालवी फुटेपर्यंत तू गणपतीचे अखंड नाम घे.’’ १२ वर्षांच्या घोर तपस्येनंतर नामाचे आमूलाग्र परिवर्तन झाले. त्याच्या दोन्ही भृकुटींमधून (भुवयांमधून) एक सोंड फुटली. त्यामुळे ‘नामाचे’ रूपांतर ‘भृशुंडी ऋषींमध्ये’ झाले. (‘भृ’ म्हणजे ‘भुवया’ आणि ‘शुंडी’ म्हणजे ‘सोंड’. भृशुंडी ऋषींच्या भुवयांच्यामधून सोंड आल्यामुळे त्यांचे नामकरण ‘भृशुंडी’ असे करण्यात आले.) आराध्य देवतेच्या अनुसंधानात अखंड रममाण होणारे शेकडो ऋषि होऊन गेले; परंतु आराध्य देवतेशी स्वरूपता प्राप्त करणारे आणि याची देही आराध्यरूप होऊन वावरणारे ‘भृशुंडी ऋषि’, हे विश्वातील एकमेवाद्वितीय उदाहरण होय. (क्रमशः)

– कु. मधुरा भोसले (६४ टक्के आध्यात्मिक पातळी) (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.